बुलडाणा : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह शुक्रवार व शनिवारी विजांच्या कडकडाटसह वादळी वारा व जोरदार पाऊस झाला. या पावसाने नांदुरा, संग्रमापूर तालुक्यासह खामगाव तालुक्यातील काही भागातील शेतीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.
नांदुरा तालुक्यातील पिके उद्धवस्त
नांदुरा तालुक्यात मका, ज्वारी,कपाशी व इतर पिके जमीनदोस्त झाली आहेत. नांदुरा तालुक्यात शुक्रवारी व पुन्हा शनिवारी दि.१९ रोजी दुपारपासूनच पाऊस झाला. पाऊण ते एक तास पडलेल्या या पावसाने शेतातील खरीप पिकांचे नुकसान झाले. त्यात सर्वाधिक फटका हा मका, हायब्रीड, कापूस, तूर, सोयाबीन, उडीद या पिकांना बसला. मागील वर्षी खरिपात यावेळेसच पाऊस सुरू राहिल्याने सोंगुण ठेवलेल्या सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले होते.रब्बीतही मका गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले होते.यावर्षी पण आता वादळी वाऱ्यासह खरीप हंगाम काढणीच्या वेळेसच हा नुकसानकारक पाऊस झाल्याने तिसरे लगातर पीक काढणीच्या वेळेसच संकट कोसळल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.यासाठी शासनाने आताही नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
पिंपळगाव राजा परिसरातील कापूस-सोयाबीनचे नुकसान
शनिवारी सायंकाळी पिंपळगाव परिसरात आलेल्या परतीच्या पावसाने व सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने कपाशी, सोयाबीन, ज्वारी व मका पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. शेतकऱ्यांनी शेतात कापनी करून गंजी उभी करून ठेवलेल्या तीळही मातीत मिसळला आहे.
कोंद्री शिवारात पावसाचा फटका
संग्रामपूर तालुक्यातील कोद्री शिवारात ता. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. त्यात अनेक शेतातील पिकांचे नुकसान झाले. परिसरात वादळी वारा व दमदार पाऊस पडला. त्यात कोद्री या शिवारातील शेतकऱ्याचे कपाशी व ज्वारी पीक उद्ध्वस्त झाले. ज्ञानदेव प्रल्हाद खोंड (गट न.७ आणि १९८) यांचे कपाशी व ज्वारी, प्रल्हाद खोंड यांच्या शेतातील कपाशी (गट न. १९७), गोदावरी रामकृष्ण खोंड (गट न. १५३) यांची कपाशी तर रामराव नागोराव खोंड यांच्या शेतातील कपाशीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मांगणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मी माझ्या पाच एकरातील उडीद पिकाची सोंगणी दोन दिवसांपासून करत असून, काल झालेल्या पावसामुळे सोंगुण पडलेला उडीद पूर्ण भिजला आहे.
- एस.एम.जाधव.शेतकरी,टाकरखेड.
ठिबक सिंचनवर आधारित कपाशी वेचणीवर आली होती. काही कापूस घरात आणून वाळू घातला असता तो तर भिजलाच सोबतच शेतातील वेचणीचा बाकी असलेला कापूस भिजल्याने या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
- श्रीकृष्ण पाटील,शेतकरी,शेंबा.
मी यावर्षी बागायती कपाशी पिकाची लागवड केली होती,मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सर्वच काही हिरावून घेतले आहे. आम्हा शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे.
- गजाननआप्पा वानखडे, नुकसानग्रस्त शेतकरी,पिंपळगाव राजा
(संपादन - विवेक मेतकर)
|