Akola Crime News : फ्लॅट विक्रीच्या नावाखाली लाखो रुपयांनी फसवणूक केल्या प्रकरणी भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य व माजी जिल्हा परिषद सभापती विजय सोळंके याला मुंबईतील गावदेवी पोलिसांनी अटक केली. कुटासा येथे ही कारवाई करून सोळंके यांना मुंबईला नेण्यात आले आहे.
मुंबईतील गावदेवी पोलिसांच्या पथकाने मंगळवारी सकाळी अकोला जिल्ह्यातील कुटासा गावात जाऊन सोळंकेला ताब्यात घेतले. सोळंके याची नातेवाईकाकडून वारसा हक्काने मिळालेली मुंबईतील सायन-कोळीवाडा येथील शुभ कर्म गृह निर्माण सोसायटीतील कर्मक्षेत्र इमारतीत एक सदनिका ( फ्लॅट) होती.
वन बीएचके असेलली ही सदनिका ५० लाखात विकत घेण्यासाठी प्राप्तीकर (इंकम टॅक्स) विभागाचे तत्कालिन अधिकारी विजय कुमार कोहाड यांनी २०१३ मध्ये तयारी दर्शविली. त्यानुसार सप्टेंबर २०१३ मध्ये कोहाड आणि सोळंके यांच्यात सहमती झाल्यानंतर कोहाड यांनी सोळंकेला सदनिका विकत घेण्यासाठीची रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यास सुरूवात केली.
कोहाड यांनी ठरल्याप्रमाणे वर्षभरात अर्थात ऑगस्ट २०१४ पर्यंत सोळंके यांना ३२ लाख ५० हजार रुपये दिले. सदनिकेच्या मूळ मालक या सोळंके यांच्या मावशी होत्या. त्यांच्या मृत्यू नंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून व वारसा हक्क प्रक्रिये अंतर्गत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सोळंके यांना या सदनिकेचा ताबा मिळाला होता.
सोसायटीकडून या सदनिकेला ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ही सदनिका कोहाड यांच्या नावाने हस्तांतरित करून विक्री प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल,असे दोघांमध्ये ठरले होते. सोळंके यांच्याशी कोहाड यांचा जुना परिचय असल्याने ही सहमती मौखिक पातळीवर होती.
मात्र, त्यानंतर गेली १० वर्षे सदनिकेची विक्री करण्यास (रजिस्ट्री करण्यास) आणि ताबा देण्यास सोळंके यांनी टाळाटाळ सुरू केली. सोसायटीची एनओसी मिळाली नाही, असे कारण देत त्याने रजिस्ट्री करून देण्याबाबत जवळपास १० वर्षे चालढकल केली.
त्यानंतर ३० एप्रिल २०२२ ला पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात ही सदनिका आरोपी सोळंके यांनी २०१८ मध्ये परस्पर दुसऱ्याला विकल्याचे स्पष्ट झाले. यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सोळंके याच्या अटकेसाठी वरिष्ठांची परवानगी घेतली व गावदेवी पोलिसांनी अकोट तालुक्यातील कुटासा येथे दाखल होत सोळंकेला ताब्यात घेतले. सहायक पोलिस निरीक्षक रमेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
विजयसिंह शंकरसिंह सोळंके हा मूळ अकोला जिल्ह्यातील कुटासा येथील आहे. त्याचे मुंबईत व्यवसायानिमित्त जाणे येणे असते. सोळंके अकोला जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण समिती सभापती असून, सध्या भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीवर सदस्य आहेत.
विजयसिंह सोळंके याची भेट नातेवाईच्या माध्यमातून झाली होती. मुंबईत त्याचे माझ्या घरी येणे-जाणे होते. त्यातून त्याच्या मावशीचा एक प्लॅट जो त्याच्या नावावर झाला होता, तो विक्रीस असल्याची माहिती मिळाली. त्यातून व्यवहार झाला. जवळपास ३२.५० लाख रुपये दिले. मात्र, प्लॅट ताब्यात न दिल्याने सोळंके याच्या विरोधात पोलिस तक्रार दिली होती.
- विजय कुमार कोहाड, तक्रारदार
सनदिका फसवणूक प्रकरणात विजयसिंह सोळंके याच्या विरोधात भादंवि कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा गावदेवी पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात कुटसा येथून मंगळवारी पहाटे ताब्यात घेतला आहे.
- रमेश जाधव, सहायक पोलिस निरीक्षक, गावदेवी पोलिस स्टेशन, मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.