अकोला : एकाच व्यवसायाशी निगडीत उद्योग करणाऱ्या लहान लहान उद्योग एककांना एकत्र आणून ‘कापूस ते कापड’ या प्रक्रियेचे चक्र जिल्ह्यात गतिमान झाले आहे. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत या २७ उद्योग एककांचे एकत्रिकरण ‘दि संघा टेक्सटाईल डेव्हलपमेंट असोसिएशन अकोला’ या नावाने तयार करण्यात आले असून, त्यांचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले आहे. नुकतेच बंगलोर येथील एजन्सी मार्फत दोन लाख टी शर्टस बनविण्याची ऑर्डर या उद्योगास मिळाली आहे.
कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या अकोला जिल्ह्यात कापसावर प्रक्रिया उद्योग होऊन ‘कापूस ते कापड’ येथेच तयार व्हावे, अशी ही संकल्पना आहे. या संकल्पनेला जिल्ह्यात ‘एक गाव एक उत्पादन’, हे रुप देऊन पालकमंत्री बच्चू कडू यांनी चालना दिली. त्यानुसार जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कापूस प्रक्रिया करणाऱ्या एककांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे ‘दि संघा टेक्सटाईल डेव्हलपमेंट असोसिएशन अकोला’ या उद्योग समुहाचे एकत्रिकरण करण्यात आले.
आता सद्यस्थितीत शेलापूर व बोरगाव मंजू येथील युनिट्स मिळून २७ युनिट कार्यरत आहेत. सुक्ष्म व लघु उद्योग एकक विकास कार्यक्रमात हे क्लस्टर विकसित करण्यात आले. प्रत्येकी ५० लक्ष रुपये भांडवलातून ही युनिट्स उभी राहिली आहेत.
२७ जणांचा सहभाग
चिखलगाव येथील जिनिंग उद्योगाचे चालक कश्यप जगताप यांनी माहिती दिली की, या उपक्रमाला चालना देत जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी एकूण ३० जणांना एकत्र आणून त्यांना टेक्सटाईल उद्योगाचे प्रशिक्षण तसेच उद्योगांना भेटी आयोजित केल्या. त्यातून २७ जणांनी यात सहभाग घेतला असून, हे सर्व उद्योजक अनुसूचित जातीतील आहेत.
साडेतेरा कोटींचे भांडवल व दहा कोटींची यंत्रसामुग्री
प्रत्येक उद्योजकास ५० लक्ष रुपये भांडवल, असे साडेतेरा कोटी रुपयांचे कर्ज जिल्हा उद्योग केंद्राच्या शिफारशीनुसार, युनियन बॅंकेने दिले आहे. या शिवाय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत १० कोटी रुपये किमतीचे अत्याधुनिक यंत्रे या युनिटला अनुदानावर मंजूर झाले आहेत. साडेपाच कोटी रुपये निधी हा या परिसरातल्या रस्ते, पाणी आणि वीज या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रस्तावित आहेत.
कापूस ते कापड
या उद्योगात कापसाच्या गाठी बनविणे, त्याचे धागे, धागे आवश्यकतेनुसार रंगविणे, धाग्याचे कापड बनविणे आणि कापडाचे परिधाने बनविणे, अशा सर्व प्रक्रिया केल्या जातात. साधारण दिवसाला अडीच टन कापसाची प्रक्रिया या ठिकाणी होते. ६०० महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून, सद्यस्थितीत प्रकल्पाच्या सुरुवातीच्या अवस्थेत ११० कर्मचारी/कामगार काम करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.