शिरपूर जैन - बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागला असून पारंपारिक अभ्यासक्रमाची नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरू असून, लवकरच नवीन शैक्षणिक वर्षही सुरू होईल, मात्र वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, औषध निर्माणसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटी विना अडकून बसले आहेत. बारावीचा निकाल लागूनही उच्च शैक्षणिक वर्ष गुणवत्ता सिद्ध न करता आल्यास अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक करिअर भरकटण्याची भीती आहे.
दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे शैक्षणिक कामकाज पुर्णतः बिघडले होते. बोर्ड परीक्षा रद्द झाल्याने निकाल प्रक्रियेला उशीर झाला होता. सर्व शिक्षण ऑनलाईन असल्याने प्रवेश परीक्षा ऑफलाईन घेण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे मागील दोन वर्ष अनुक्रमे नोव्हेंबर, ऑक्टोबर मध्ये नीटच्या परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील प्रवेश प्रक्रियाही उशीरा सुरू झाल्या.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन जूनअखेर ते संपवण्यात आले आणि अवघ्या सहा महिन्यांमध्ये संपूर्ण शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करताना शिक्षक विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागली. केवळ परीक्षेपुरता अभ्यास झाल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत साशंकता निर्माण झाली होती, मात्र या वर्षी कोरोना कमी झाल्याने नियमित शाळा कॉलेजेस सुरू झाल्याने बोर्ड परीक्षाही ऑफलाइन पद्धतीने वेळेवर पार पडल्यात.
बारावीचा निकाल जूनच्या पहिल्याच आठवड्यात लागला. त्यामुळे पारंपारिक अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल. मात्र वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, औषध निर्माण सह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे केली जाते. या प्रवेश परीक्षा काही तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत .नीटची परीक्षा जुलैअखेर होणार असल्याने सीईटी परीक्षा ऑगस्टमध्ये होणार आहे. या परीक्षांच्या निकालानंतरच व्यावसायिक अभ्यासक्रमातील उच्च शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.
बारावीचा निकाल लागला तरी प्रवेश परीक्षा न झाल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष आता रखडले आहे. प्रवेश परीक्षेत गुणवत्ता सिद्ध न करता येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होणार असल्याने त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याच्या शक्यतेने विद्यार्थी व पालकात चिंता निर्माण झाली आहे. शैक्षणिक भविष्याची चिंता त्यांना सतावू लागली आहे.
प्रवेश लांबणीवर
विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांचा कल हा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे असतो. या वर्षी सर्वच परीक्षा रखडल्या आहेत. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश हे लांबणीवर पडले आहेत. पारंपरिक अभ्यासक्रमांचा शैक्षणिक वर्षारंभ तोंडावर आला आहे, सीईटीत कमी गुण मिळाले तर सोयीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण होणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून बीए, बीकॉम, बीएस्सी या पारंपरिक अभ्यासक्रमाकडे आपला कल वळवला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.