अकोला ः लहान मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बरेचदा कळत-नकळत त्यांच्याकडून गुन्हे घडतात. त्यांना गुन्ह्यांमध्ये अडकवले जाते.
अगदी लहान वयातच होत असलेल्या या अन्याय, अत्याचारामुळे ते भविष्यात वाईट मार्गाला लागतात किंवा त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. बाल गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता अकोल्यात चाईल्ड फ्रेंडली पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात येत आहे.
घरगुती हिंसाचार, लैंगिक शोषण, गुन्हेगारांना मदत असो किंवा अपंग बनवून भीक मागायला लावणे अशा विविध प्रकारे बालकांना गुन्हेगार केले जाते किंवा त्यांच्याकडून गुन्हे करवून घेतल्या जातात.
बालवयातच या सर्व प्रकारामुळे ते गुन्हेगारी जगतात इच्छा नसतानाही खेचले जातात ज्याचा त्यांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होतो. बालकांची या गुन्हेगारी जगतातून सुटका व्हावी, त्यांना इतरांसारखे शिक्षण घेता यावे म्हणून पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी ही अभिनव संकल्पना अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनच्या आवारात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या दृष्टीने पोलिस स्टेशनची रंगरंगोटी व आवश्यक ते बदल करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या राज्यात पुणे शहरात असे चाईल्ड फ्रेंडली पोलिस ठाणे कार्यान्वित करण्यात आले आहे. विदर्भातील किंवा ग्रामीण विभागातील हा राज्यातील पहिलाच प्रयोग असणार आहे.
असे असेल पोलिस ठाणे
मुलांना विश्वासात घेऊन होणार मार्गदर्शन
सहसा पोलिस स्टेशनमधील वातावरणाला लहान मुले घाबरतात. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन त्यांना धीर देऊन बोलणे गरजेचे असते. चुकून किंवा हेतूपुरस्पर गुन्हेगारीकडे वळलेल्या बालकांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा चाईल्ड फ्रेंडली प्रकल्प आहे.
तिथे मुलांना अगदी प्रेमाने हाताळून त्यांच्याकडून घडलेल्या गुन्ह्यासंदर्भात माहिती करून घेतली जाईल व त्यांना समुपदेशकांमार्फत मार्गदर्शन करून भविष्यात त्यांच्याकडून गुन्हे घडणार नाही असा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने पोलिस प्रशासन करीत आहे.
वकरच जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा चाईल्ड फ्रेंडली पोलिस ठाण्याची निर्मिती करण्याचा आमचा मानस आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.
(संपादन - विवेक मेतकर)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.