तरुणाईला खुणावतेय कृषी क्षेत्र, शेतीतून जातो शाश्‍वत रोजगाराचा राजमार्ग

Akola marks the youth of the agricultural sector, the highway of sustainable employment passes through agriculture
Akola marks the youth of the agricultural sector, the highway of sustainable employment passes through agriculture
Updated on

अकोला  ः शेती शिवाय गत्यंतर नाही असे आजपर्यंत बोलले जात होते मात्र, त्याची खरी प्रचिती ‘कोरोना’ या जागतिक संकटात मिळाली आहे. जगातील सर्वच क्षेत्र या संकटाने प्रभावित झाले असताना ‘कृषी’क्षेत्र मात्र, नोकरी, व्यवसायाचा भक्कम पाया ठरत आहे. त्यामुळेच ‘कृषी’ आणि ‘कृषी शिक्षण’ भविष्यात संधीचा मोठा खजिना ठरणार असल्याची जाणीव आता प्रत्येकाला झाली असून, तरुणाईचाही कृषी शिक्षणाकडे कल वाढला आहे.

देशाची अर्थव्यवस्था व विकास दर शेतीच्या उत्पादकतेवर अवलंबून आहे. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच कृषिसंलग्न व्यवसायाची भरभराट होण्यासाठी कृषी व कृषिसंलग्न विषयातील शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.

फळ उत्पादनाकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दुग्ध उत्पादन, कुक्कुटपालन, पशुसंवर्धन याकडे शेतीपूरक व्यवसाय म्हणून पाहिले जाते. शेतीमध्ये काम करण्यासाठी मजुरांची कमतरता भासू लागल्यामुळे कृषी अवजारांच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळून स्वयंचलित अवजारांचा शेती व्यवसायात वापर वाढलेला दिसून येतो. सूक्ष्मसिंचन पद्धतीचा वापर वाढलेला आहे.

या सर्व बाबींचा विचार करता उत्कृष्ट शेती व्यवसायासाठी कृषी व कृषिसंलग्न क्षेत्रात उदा. उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, अन्न-तंत्रज्ञान, कृषी जैवतंत्रज्ञान, मत्स्य विज्ञान, वनिकी व पशुसंवर्धन या विषयांतील प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे काळाची गरज आहे. या गरजेतूनच कृषी पदविका, पदवी, पदव्यूतर स्नातकांना कृषितील विविध क्षेत्रात रोजगार तसेच करिअर करण्याची संधी प्राप्त होणार आहे.


कृषी शिक्षणाची दालने
राज्याची वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती, हवामान व पीक पद्धतीचा विचार करून महाराष्ट्रात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला (१९६९), महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी (१९६९), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली (१९७२) आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी (१९७२) या चार कृषी विद्यापीठांची स्थापना झाली असून, या सर्व विद्यापीठांमधून कृषी क्षेत्रासाठी लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार केले जात आहे.


नोकरी/ व्यवसाय संधी
कृषी पदवीधारक कृषी विद्यापीठांतर्गत विद्यालय, महाविद्यालयांमध्ये शिक्षक, कृषी संशोधन केंद्रामध्ये शास्त्रज्ञ, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या विविध राष्ट्रीय संशोधन केंद्रांवर शास्त्रज्ञ म्हणून काम करू शकतात. त्यांना राज्य सरकारच्या कृषी विभागामध्ये विविध पदांवर, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कृषी अधिकारी/ ग्रामसेवक या पदांवर काम करण्याची संधी आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध विभागांमध्ये वर्ग-१, वर्ग-२ पर्यंतच्या सर्व पदांवर कृषी पदवीधारकांना नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे होणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी पदवीधर यशस्वी होत आहेत. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कृषी अधिकारी/ विकास अधिकारी तर, अन्न महामंडळ, पणन महामंडळ व खादी ग्रामोद्योग या ठिकाणीही कृषी पदवीधारकांना नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. राज्य व केंद्रस्तरीय विविध प्रयोगशाळांमध्येही तसेच कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषी पदवीधरांना विविध पदांवर काम करण्याच्या संधी आहेत.

खासगी क्षेत्रामध्ये संधी
खासगी क्षेत्रामध्येही कृषी पदवीधारकांना अनेक बियाणे, कीटकनाशके, खते, ठिबक व तुषार सिंचन कंपन्या, खासगी क्षेत्रातील बँका, प्रक्रिया उद्योग, तसेच कृषी सेवा सल्ला, विमा कंपन्या व खासगी क्षेत्रातील इतर विविध कंपन्या इत्यादी ठिकाणी काम करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. या पदवीधारकांना सहकारी व खासगी संस्थांच्या प्रक्षेत्र व्यवस्थापनाचे तसेच काटेकोर शेती व्यवस्थापनामध्ये काम करण्याच्या संधी आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी
कृषी पदवीधरांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याच्यासुद्धा संधी उपलब्ध आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय बँका, आशियाई विकास बँक, आंतरराष्ट्रीय वित्त, कॉर्पोरेशन, बहुराष्ट्रीय कंपन्या व कृषी आयात-निर्यातीमध्ये काम करण्याच्या संधी उपलब्ध आहेत.

उद्योग, व्यवसाय संधी
कृषी पदवीधर विविध उद्योग स्थापन करू शकतात. यामध्ये जैविक खतनिर्मिती, उच्च तंत्रज्ञान शेती, प्रक्रिया उद्योग, शेतीपूरक उद्योग, मशरूम उद्योग, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय, पशु-पक्षीपालन, रोपवाटिका, शेळी-मेंढीपालन, रेशीम उद्योग, बीजोत्पादन, दुग्धोत्पादन इत्यादी उद्योगांचा समावेश असून, त्याद्वारे स्वयंरोजगारनिर्मिती होऊ शकते.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.