कम्प्युटर इंजिनिअरने नोकरीचा राजीनामा देवून सुरू केला मशरूम व्यवसाय

akola news The computer engineer started the mushroom business
akola news The computer engineer started the mushroom business
Updated on

अकोला: संगणक अभियांत्रिकी विषयात पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर तीन वर्षे नोकरी केलेल्या युवकाने मशरुम उत्पादनाचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. गेल्या चार वर्षात हा व्यवसाय आता स्थिरस्थावर बनविण्यात यशही मिळवले. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे या व्यवसायाला सुरुवात केली. कौटुंबिक पार्श्वभूमी कृषी क्षेत्राशी निगडित नाही. परंतु आई वडिलांनी निवृत्तीनंतर शेती करण्यास सुरुवात केली. हे बघून संकेत यानेही नोकरी काळातील अनुभवातून स्वतः काही तरी करण्याची प्रेरणा घेत मशरुम उत्पादन सुरू केले. पारपरिक पध्दतीऐवजी उत्पादनासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे.
................................
राजीनामा दिल्यानंतर पहिले काही दिवस संकेतने शेतीचा बारकाईने अभ्यास केला. कोरडवाहू शेतीमध्ये तूर, सोयाबीन किंवा ज्वारी ही पिके घेतली जातात. ती पूर्णपणे निसर्गाच्या भरवशावर असतात. दोन वर्षे शेतीतून म्हणावे तसे उत्पादन आले नाही. पहिल्या वर्षी कोरडा तर दुसऱ्या वर्षी ओला दुष्काळ अनुभवला. शेतीला जोडधंदा असेल तरच ती फायदेशीर ठरू शकते या विचाराला चालना मिळाली. त्यातून व्यवसायाचा शोध सुरु झाला. असा व्यवसाय करायचा ज्यावर हवामानाचा परिणाम होणार नाही. कमी जागेत, कमी पाण्यावर व कमी खर्चात सुरुवात करता येईल, आपल्याच शेतातील कच्च्या मालाची उपलब्धता राहील व उत्पादन फायदेशीर मिळू शकेल, अशा बाबींचा विचार करीत मशरूम व्यवसायाची निवड केली. या व्यवसायाची निवड केल्यानंतर यामध्ये कोण काम करीत आहे, याचा शोध घेतला. काही मशरूम प्लांटला भेटी दिल्या. प्रशिक्षणासाठी दुर्गापूर (जि. अमरावती) येथील कृषी विज्ञान केंद्र गाठले. पुढे अभ्यास सुरु असतानाच आपल्या भागातील कपाशी व सोयाबीनचे पीक हे फायदेशीर असल्याचे दिसले. मशरूम वाढण्यासाठी लागणारे सेल्युलोज (cellulose) व लिग्निन (ligning) हे घटक सर्वात जास्त प्रमाणात कपाशीच्या व त्या खालोखाल सोयाबीनच्या अवशेषांमध्ये सापडतात हे समजले. मशरूम साठी लागणारा असा उच्च प्रतिचा कच्चामाल विदर्भात विपुल प्रमाणात उपलब्ध असणे या व्यवसायासाठी संधी आहे हे जाणले.

दुर्गापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत मशरूम उत्पादक प्रशिक्षणाबद्दल माहिती मिळाली व तत्काळ प्रशिक्षणासाठी प्रवेश अर्ज भरून घेण्यात आला. प्रशिक्षणामध्ये भारतात व इतर देशांमध्ये उत्पादित केल्या जाणाऱ्या बहुतांश मशरूमची ओळख, माहिती, उत्पादन व उत्पादन पश्चात प्रक्रियांचा अभ्यास केला. कृषी विज्ञान केंद्रातील बटन मशरूम प्लांटमधे प्रत्यक्ष कार्याचा अभ्यास झाला. या प्रशिक्षणामध्ये तज्ज्ञांनी माहिती दिली. आता अनुभव संपन्न झालेला संकेत हा बचत गट, शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील महिलांना या व्यवसायाचे प्रशिक्षण देतो.
..........................
ऑटोमायझेशनचा वापर
प्रायोगिक तत्वावर सुरुवात केलेल्या या मशरुम उत्पादनाला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. पहिल्या वर्षात उत्पादकता वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यावर जास्त भर दिला. त्यातून मार्गदर्शक अनुभव मिळाल्याचे संकेत सांगतो. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी कोणते घटक महत्वाची भूमिका बजावतात याची संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात जमा केली. वातावरण निर्मिती व नियंत्रणासाठी संगणक अभियांत्रिकीच्या अनुभवाचा उपयोग करून १०० टक्के ऑटोमायझेशनचा प्रयोग यशस्वी केला. याठिकाणी निर्माण केलेल्या ईनक्युबिशन रुममध्ये स्वयंचलीत प्रणालीने काम चालते. तापमान २५ पेक्षा जास्त झाले तर फॉगर आपोआप सुरु होतात. आर्द्रता ७० ते ९० दरम्यान ठेवण्याचे हीच यंत्रणा करते. या यंत्रणेच्या वापरामुळे आपल्याला इनक्युबीशन कालावधी १० ते २० दिवसादरम्यान आणता आल्याचा दावा संकेत आता आत्मविश्‍वासाने करतो.
................................
मार्केटींग
मशरूममध्ये विविध पोषणमुल्ये आहेत. ही बाब पटवून देण्यास सुरुवात केली. तयार मशरूम आठवडी बाजारात विकल्या जाऊ लागले. यासाठी मूर्तीजापूर येथील भाजी विक्रेत्यांची मदत घेतली. हॉटेलमध्ये जाऊन नवीन व्यंजनाची ओळख करून दिली. मशरूम सेवनाचे महत्व समजावे यासाठी शाळा कॉलेजमधील औद्योगिक सहलींचे आयोजन करण्यात आले. बचतगट व महिलांच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांना हाताशी धरून प्रबोधन सुरु केले. शाळा, कॉलेजमधे जाऊन शिक्षक व विद्यार्थ्यांना मशरूम व मशरूम उद्योगाची ओळख करून देण्यात आली. कृषी विभागातर्फे शेतकरी भेटीचे आयोजन करून प्रबोधन करण्यात आले. आता मार्केटिंगची समस्या निकालात निघाली.
........................................
कच्चा माल कसा उपलब्ध केला जातो ?
शेतातील अवशेष हाच मशरूम व्यवसायातील कच्चा माल असल्याने त्याची कमतरता भासत नाही. अगदी कमी खर्चात किंवा मोफत कच्चा माल उपलब्ध होतो. मशरूमचे बियाणे (Spawn) मिळवणे थोडे कठीण असल्याने त्याबद्दल कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर, अमरावती यांची मदत होते. इंटरनेटच्या माध्यमातून बियाणे वितरकांचा संपर्क तयार झाला असल्याने आता तत्पर व किफायतशीर किमतीमधे उपलब्ध होत आहे.
..................
पोषणमूल्यांचे आगार-मशरूम !
संकेत म्हणतो, मशरूमबाबत प्रबोधनाची आत्यंतिक गरज आहे. मशरूम सर्वात उत्तम आहारामध्ये समाविष्ट केल्या गेले आहे. भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये व्हिटॅमिनची कमतरता आढळते. शरीरात कॅल्सिअमचा हाडांना मजबुती मिळण्यासाठी उपयोग होतो. मशरूममध्ये विशिष्ट प्रकारचे प्रथिने आहे. ज्यामुळे आठवड्यातून २ ते ३ वेळा आहारात समावेश केल्यास मोठ्या आजारांचा धोका कमी होतो. फॉलीक ऍसिड, अँटिऑक्सिडेंट्स, बी-कॉम्प्लेक्सचे अतिशय दुर्मिळ घटक मशरूममध्ये आढळतात. मशरूममधील जीवनसत्वांची व गुणधर्माची बरोबरी होऊ शकत नाही. सुकवलेल्या मशरूमला चांगली मागणी आहे.
.................
खर्च व मिळणारे उत्पादन
मशरूमच्या एका बॅचचा कालावधी हा सामान्यपणे २ महिन्यांचा राहतो. यामध्ये सुरुवातीचे १० ते २० दिवसांचा काळ म्हणजे हा अत्यंत महत्वाचा असतो. कारण याच काळात त्यावर रोगराई व संसर्गाची शक्यता जास्त असते. त्याबाबत योग्य ती काळजी घेणे अनिवार्य असते. २० दिवसानंतर बेड पांढरे झाल्यानंतर ते सूर्यप्रकाश व खेळत्या हवेच्या खोलीमध्ये ठेवले जातात. काही दिवसात त्यावर कोंब दिसू लागतात. नंतर २ ते ३ दिवसात मशरूम काढणीसाठी तयार होतात. अशाप्रकारे पुढील १ महिन्याच्या कालावधी टप्प्याटप्याने मशरूम काढणी केली जाते. १० बेडसाठीचा खर्च साधारणतः ६०० रुपयांपर्यंत येतो. त्यातून १० ते २० किलोपर्यंत मशरूम मिळते. त्याची विक्री २०० ते ३०० रुपये प्रतिकिलो केली जाते. उत्पादन खर्च वगळता कमीत कमी १५०० रुपयांपर्यंत नफा मिळतो. दुसरा पर्याय म्हणजे मशरूम वेगवेगळे करून कडक उन्हामध्ये सुकवून हवाबंद पॅकिंग करून ठेवले तर असे मशरूम ६ ते ८ महिने टिकू शकते.
..अकोला.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.