अकोला ः यावर्षी जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. काही गावांमध्ये अतिवृष्टी झाली. शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली.
त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत जाहीर केली होती. सदर मदतीच्या पहिला टप्प्याची रक्कम २६ कोटी ९४ लाख ३९ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला मिळाले आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वीच शासनाने शेतकऱ्यांना भेट देवून त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे.
यावर्षी झालेल्या सततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला मूग व उडीद पिकांचे नुकसान झाले. सोयाबीनला, तूर, कपाशीला सुद्धा अति पावसाचा फटका बसला. अतिवृष्टीमुळे कपाशीचे बोंड काळे पडले. झाडांची पडझड, फळ गळून पडल्याने बागायती शेतीचे सुद्धा चांगलेच नुकसान झाले.
अनेक शेतात पाणी साचल्यामुळे पिकं सडली. त्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले होते. त्याअंतर्गत जिल्ह्यातील नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात आल्यानंतर शासनाकडे मदतीची मागणी करण्यात आली होती. दरम्यान आता मदत निधीच्या पहिल्या टप्प्याचे २६ कोटी ९४ लाख ३९ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नुकसानग्रस्तांसाठी अशी मिळाली मदत
- मनुष्य हानी, जखमी तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्णतः क्षतीग्रस्त झाली असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी, वस्तुचे नुकसान झालेल्यांना मदत करण्यासाठी चार लाख ८६ हजार रुपये प्राप्त झाले आहेत.
- पावसामुळे मृत झालेल्या जनावरांसाठी १ लाख ५० हजार रुपयांची मदत मिळाली आहे.
- पुर्णतः नष्ट, अंशतः पडझड झालेली कच्ची, पक्की घरे, नष्ट झालेल्या झोपड्या व गोठ्यांसाठी ९ लाख ३० हजार रुपयांचे अनुदान जिल्ह्याला मिळाले आहे.
- शेतजमिनीच्या नुकसानासाठी ९९ लाख ९९ हजार रुपये मिळाले आहेत.
- एसडीआरएफच्या दराने ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर व बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये प्रतिहेक्टर मदत देण्यासाठी १७ कोटी ५३ लाख ५८ हजार रुपये मिळाले आहेत.
- वाढीव दराने शेतीपिकांसाठी ३ हजार २०० रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी ७ हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्यासाठी ८ कोटी २५ लाख १६ हजार रुपयांची मदत मिळाली आहे.
- अशा प्रकारे सर्व प्रकारच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी २६ कोटी ९४ लाख ३९ हजार रुपयांची मदत शासनाकडून पहिल्या टप्प्यासाठी जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे.
अशी मिळणार मदत
अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान ३३ टक्के नुकसान झाले आहे अशा बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या (जिरायती व आश्वासित सिंचनाखालील पिके) नुकसानीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर या दराने दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येईल. त्यासाठीचा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) मधून खर्च करण्यात येईल व वाढीव दरानुसार होणारा खर्च राज्य शासनाच्या निधीतून देण्यात येईल.
अतिवृष्टी व पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाच्या महसूल व वन विभागाने मदत जाहीर केली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २६ कोटी ९४ लाख ३९ हजार रुपयांच्या मदत निधीचा पहिला टप्पा मिळाला आहे. सदर मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. त्यासाठी याद्या तयार करण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू करण्यात आले आहे.
- प्रा. संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला
(संपादन - विवेक मेतकर)
|