मूर्तिजापूर - या पौराणिक आणि ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या शहराच्या जुन्या वस्तीतील हजारी गणपती मंदिराला २०० वर्षे, तर तेथील गणेशोत्सवाला शतकाची परंपरा लाभली आहे.पंचक्रोशीत हजारीचा गणपती म्हणून प्रख्यात असलेल्या या गणरायाचे मंदिर या शहराच्या जुन्या वस्तीतील मलईपुऱ्यात आहे. येथील किशोरचंद्र हजारी यांचे पणजोबा हरिसिंग हजारी यांनी हे मंदिर दोनशे वर्षापूर्वी उभारले आहे.
लोकमान्य टिळकांनी शतकापूर्वी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेश उत्सवापूर्वीपासूनच हजारीच्या गणपतीचा उत्सव पूर्वापार पद्धतीने आजही सुरू आहे. या वैशिष्टयपूर्ण मंदिरात सुखकर्ता दुःखहर्ता, चिंतामणी आणि विघ्नहर्ता अशा चार गणेशमूर्ती आहेत. दोन बाजूला दोन गणेशमूर्ती व मध्यभागी राधाकृष्णाची संगमरवरी मूर्ती अशी स्थापना करण्यात आली आहे. या चारही गणेशमूर्ती काष्ठरुपात आहेत. जन्माष्टमी पासून उत्सवाला सुरवात होते. गणेश चतुर्थीला मातीच्या छोट्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना व अनंत चतुर्दशीला त्याच मातीच्या गणेशमूर्तीचे विसर्जन होते.
पारंपरिक इकोफ्रेंडली गणेश
राधाकृष्णाच्या संगमरवरी मूर्तिच्या दोन्ही बाजुला असणाऱ्या चारही गणेशमूर्ती काष्ठरूप आहेत. दरवर्षी त्यांचे रंगकाम काम होते, मात्र हे रंगकाम बाजारातील रंग आणून किंवा व्यावसायिक रंगाऱ्याकडून होत नाही. रंगकामासाठी कुंचला वापरल्या जात नाही. साखर, लिंबू, जवस, डिंक व गोट्याची रंगीत पूड वापरून घरीच रंग तयार केला जातो. या साहित्यामधील साखर चमक निर्माण करते, लिंबू मळ काढून टाकते, डिंक चिकटपणा निर्माण करतो. अभ्रक आणि जवसाच्या पाण्यातून गणरायाला गौरवर्ण प्राप्त होतो. असा तयार झालेला हा रंग हा रंग कुंचल्याने नाही, तर हाताच्या बोटांनी काष्ठरूप मूर्तीना दिला जातो व शुद्धता जपली जाते. विसर्जन मिरवणुकीत पखवाज आणि ढोलाच्या तालावरील भजनीमंडळासह हा गणराय सहभागी होतो.
सामाजिक बांधिलकी
सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न या गणरायाच्या प्रभावळीत केला जातो. गरजू कुटुंबातील विवाहासाठी लागणाऱ्या खर्चाचा काही प्रमाणात भार उचलून किशोरचंद्र हजारी धार्मिक प्रथेला समाजकार्याची जोड देतात व एक आगळा वस्तूपाठ समाजाला घालून देतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.