मूर्तिजापूर (जि.अकोला) ः अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या कोरोनामुळे लांबलेल्या निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर ही निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या भाऊगर्दीची लगबग वाढली असून शिक्षकांच्या प्रश्नावर आता नव्याने आश्वासनांच्या फैरी झडतील आणि त्यातून योग्य उमेदवाराला कौल देताना मात्र शिक्षक मतदारांची कसोटी लागेल.
गेल्या वेळच्या म्हणजे २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदारसंख्या तब्बल १० हजाराने घटली आहे, तर उमेदवारांची संख्या दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी मतदारांची संख्या ४४ हजार ५२६ होती. यावेळी २५५७८ पुरूष व ९ हजार १११ महिलांसह ३४ हजार ६९० मतदार आहेत. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक १० हजार ८८, तर वाशीम जिल्ह्यात सर्वात कमी ३ हजार ७७३ मतदार आहेत. अकोला, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यातील मतदारांची संख्या अनुक्रमे ६ हजार, ७ हजार ४२२ व ७ हजार ४०७ आहे.
शिक्षकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. एकीकडे शासन आणि दुसरीकडे संस्थाचालक असा कचाट्यात सापडलेला शिक्षकवर्ग पेंशनसह विविध समस्यांनी ग्रस्त आहे. जुनी पेंशनयोजना सुरू ठेवण्याबाबत आग्रही असणारा शिक्षकवर्ग संख्येने मोठा आहे.
स्वयंअर्थशासीत शाळांची प्रचंड वाढती समस्या अनुदानित शाळांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लावणारी आहे. विनाअनुदानीत शाळा आणि तुकड्यांवरील शिक्षक अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा एक ना अनेक प्रश्नांच्या गर्तेत सापडलेल्या शिक्षकांच्या सेवेच्या संरक्षणाचा प्रश्न महत्वपूर्ण आहे.
अशा स्थितीत शिक्षकांच्या समस्या सभागृहात प्रभाविपणे मांडून त्या सोडवून घेण्याची धमक आणि त्यासाठी लागणारा अभ्यास व सकारात्मक मानसिकता असणारा उमेदवार या निवडणुकीत बाजी मारू शकतो. साधारणतः शिक्षकांच्या विविध संघटनांच्या दरम्यान होणाऱ्या लढतींना अलिकडे राजकीय पक्षांची दावण आकर्षित करताना दिसते, परंतु आपापल्या क्षमतेनुसार मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीतून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न सातत्याने करणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी आहे.
त्यातही अमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यात तगडा संपर्क असणारा आणि शिक्षकांना जवळचा वाटणारा उमेदवार बाजी मारू शकतो, परंतु पहिल्या पसंतीत विजयश्री खेचून आणण्याची क्षमता उमेदवारांच्या अपेक्षित मोठ्या संख्येमुळे धूसर वाटते.
विद्यमान प्रतिनिधी श्रीकांत देशपांडे यांची गेल्यावेळी दमछाक झाली होती. यावेळी ते रिंगणात आहेतच. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रकाश काळबांडे, पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे विकास सावरकर, विज्युक्टाचे प्रा. अविनाश बोर्डे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राजकुमार बोनकीले, अमरावती विभागीय शिक्षक संघाचे किरण सरनाईक, शिक्षक संघर्ष समितीच्या संगिता शिंदे, महाराष्ट्र शिक्षक आघाडीचे निलेश गावंडे, शेखर भोयर, प्रा. धांडे अशी इच्छुक उमेदवारांची यादी मोठी आहे.
निश्चित संख्या आर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी (ता.१५) कळेलच. सर्वांनीच जवळपास मतदारसंघ पिंजून काढला आहे. मोर्चेबांधणी झाली आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीशी या निवडणुकीचे रुणानुबंध असतातच, तो परिणाम आणि माजी आमदार वसंतराव खोटरे यांची भूमिका नक्कीच या निवडणुकीची दिशा निश्चित करू शकते.
(संपादन - विवेक मेतकर)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.