अकोला : कोरोनाचे चक्र सुरू झाल्यापासून शेतमाल विक्रीत अनेक अडचणी उभ्या राहिल्या. मात्र, शेतकऱ्यांनी यातून मार्ग शोधण्याची धडपड सोडली नाही. या भागात काही शेतकऱ्यांनी स्वतः सीताफळ विक्रीसाठी पुढाकार घेत ग्राहकांना दर्जेदार फळे पोहचविण्यात यश मिळवले आहे. यातून साहजिकच बाजारपेठेपेक्षा दरही जास्त मिळत आहेत.
सीताफळाचा हंगाम सुरू होऊन आता १५ दिवसांचा कालावधी लोटला आहे. सततच्या पावसामुळे यंदा फळगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. यातून जी फळे वाचली त्यांची आता काढणी सुरू झालेली आहे. अकोल्यात पातूर तालुक्यातील युवा शेतकरी श्रीकांत व हरीष धोत्रे या दोघा भावांनी पहिल्यांदा फळ विक्री सुरू केली. अकोल्यापासून साधारणतः ५० किलोमीटरवर त्यांचे शेत आहे. तेथून आदल्या दिवशी फळे तोडून आणत दुसऱ्या दिवशी पहाटेच ते अकोल्यात गौरक्षण रोडवर विक्रीसाठी स्टॉल सुरू करतात.
गेल्या काही वर्षात हे दोघे भाऊ थेट विक्री करीत असल्याने ग्राहकांची नाळ त्यांच्याशी जुळली असल्याचे ते सांगतात. आता असंख्य ग्राहक मोबाईलवरूनच ऑर्डर देतात. एक भाऊ व वडील स्टॉलवरून विक्री करतात तर एक भाऊ ग्राहकांना घरपोच ऑर्डर पोहचवून देतो. १५ दिवसांत एक लाखांवर विक्री झाल्याचे श्रीकांतने सांगितले.
खामगाव तालुक्यातील वळजी येथील संतोष पवार या युवकाने थेट विक्रीचा उपक्रम सुरू केला. खामगाव शहरात प्रामुख्याने ते ग्राहकांना सीताफळ पोहचवीत आहेत. याला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे तालुका कृषी अधिकारी जी. बी. गिरी यांनी सांगितले. बुलडाणा जिल्ह्यातीलच मेहकरमध्ये भोसा येथील शेतकरी प्रभाकर खुरद यांच्या शेतातील सीताफळाची थेट विक्री सुरू करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांना माल देण्याऐवजी ते ग्राहकांना अवघ्या ६० रुपये किलोने फळे विकत आहेत.
दरही चांगला
अकोला, बुलडाणा, वाशीम या तिन्ही जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सीताफळ विक्रीसाठी एक पाऊल पुढे उचलले आहे. शेतकरी उच्चतम दर्जाची फळे ८० ते १०० रुपये आणि दुय्यम दर्जाची फळे ५० ते ६० रुपये प्रतिकिलोने विकत आहेत.
युवाराष्ट्र संघटना आली धावून
सामाजिक कार्यात अकोल्यात अग्रेसर असलेल्या युवाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. निलेश पाटील, विलास ताथोड यांनी ग्राहकांना थेट एक किलोच्या बॉक्समध्ये सीताफळ पोहचवून देण्याची साखळी तयार केली. पातूर तालुक्यातील एका शेतकऱ्यांकडून ते ही फळे घेतात. अकोल्यात विविध शासकीय कार्यालयांमध्ये दोघे मिळून फळे पोहचवून देतात.
वाशीम-रिसोडमध्येही विक्री
बाळखेड येथील शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विलास गायकवाड यांनी वाशीम व रिसोड शहरात थेट सीताफळ विक्रीची व्यवस्था उभी केली. दिवसाला पाच ते सहा क्विंटल सीताफळ या माध्यमातून विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.