अकोला : गत काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसामुळे पिके कोमेजली असतानाचा गुरुवारी (ता. २१) दुपारी १२ वाजता व चार वाजता दरम्यान झालेल्या जोरदार पावसाने सर्व पिकांना संजीवनी मिळाली.
त्यामुळे पिकांना जीवनदान मिळाले असून शेतकरी सुखावला आहे. दुसरीकडे जोरदार पावसासह अंगावर वीज पडल्यामुळे बाळापूर तालुक्यातील टाकळी खुरेशी येथील शेतकरी पद्माकर आत्माराम घोगरे (वय ४५) यांचा मृत्यू झाला.
खरीप हंगामातील मोठ्या खंडानंतर जवळपास ४० दिवसांनी ५ सप्टेंबर रोजी रात्री पावसाने जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती. कुठे रिमझिम तर कुठे मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला होता.
काही मिनिट झालेल्या या पावसाने कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, काढणीवर आलेल्या सोयाबीनला या पावसाचा कोणताही फायदा झाला नाही. याआधी २७ जुलै रोजी जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस पडला होता.
त्यानंतर एक-दोन ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. मात्र, त्याचा पिकांना कोणताही फायदा झाला नाही. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडाच गेला. श्रावण महिना लागल्यानंतरही पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाला फटका बसला.
जवळपास सर्व मंडळात सोयाबीन उत्पादन घटले. दरम्यान गुरुवारी (ता. २१) जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी सुखावला असून पावसाचा फायदा कपाशी व तूर पिकांना होईल. जिल्ह्यासह बाळापूर तालुक्यात गुरुवारी (ता. २१) वीजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
त्यामुळे शेतात काम करण्यासाठी गेलेले बाळापूर तालुक्यातील टाकळी खुरेशी येथील शेतकरी पद्माकर आत्माराम घोगरे (वय ४५) हे शेतात काम करत असताना त्यांच्यावर अचानक वीज कोसळली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती बाळापूरचे तहसिलदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळविली आहे.
जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होत आहे. या हवामानाचा महाराष्ट्रावरही परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे गत दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे.
दरम्यान हवामान विभागाच्या नागपूर कार्यालयाने अकोला जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २२) ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांनी सतर्क रहावे व पूर परिस्थितीमध्ये नाला, नदीच्या पात्रातून जाऊ नये, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
जून ते १९ सप्टेंबरपर्यंत झालेला एकूण पाऊस
तालुका पाऊस (मिमीमध्ये)
अकोट ६७९.९
तेल्हारा ६६४.५
बाळापूर ६१४.२
पातूर ८०१.२
अकोला ७०३.४
बार्शीटाकळी ६९९.६
मूर्तिजापूर ७११.२
एकूण सरासरी ६९३.७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.