अकोला : खरिपातील मूग, उडीद व सोयाबीनची काढणी जवळपास संपत आली असून, बहुतांश शेतकरी रब्बी पीक पेरणीकरिता शेत मशागतीच्या कामात व्यस्त झाले आहेत. दरम्यान ऑक्टोबरमध्ये सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. दर वर्षीच्या तुलनेत या वर्षी रब्बी पेऱ्यामध्ये निश्चित वाढ होण्याचा अंदाज आहे. परंतु, सततच्या पावसामुळे जमिनीत जास्त ओलावा असल्यामुळे बुरशीची सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, पेरणीपूर्वी बियाण्यास रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया केली तर, हाच ओलावा रब्बीसाठी लाख मोलाचा ठरू शकेल.
चना, गहू, सोयाबीन, धान पिकांमध्ये शेतकऱ्यांचा स्वतःचे बियाणे वापरण्याचा जास्त भर असतो. अशा बियाण्यावर प्रक्रिया न केल्यास जमिनीतून व बियाण्याद्वारे होणाऱ्या रोगांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा पीक संरक्षणावरील खर्च वाढतो, पिकाच्या उत्पादन खर्चात वाढ होते व उत्पादनही घटते. त्यामुळे घरगुती बियाणे पेरण्यापूर्वी शेतकऱ्यांनी त्यांची बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. शिवाय यावर्षी अतिवृष्टी व परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जमिनीत अधिक ओल आहे. त्यामुळे बुरशीची सुद्धा वाढ होण्याची व बुरशीजन्य आजारांच्या विळख्यात पिके सापडून रब्बी हंगाम धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे विकतच्या बियाण्यांना सुद्धा पेरणीपूर्वी रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सूचवले आहे. शिवाय बीजप्रक्रिया केल्यानंतर उत्पादनात व गुणवत्तेतही वाढ होत असल्याचे खरीप तसेच गत रब्बीमध्ये दिसून आले आहे.
बीजप्रक्रियेचे फायदे
बीजप्रक्रिया केल्यावर त्यांपासून वाढीव दर्जेदार उत्पन्न अवश्य मिळते. ही लागवडीपूर्व करावयाची एक सोपी व परिणामकारक प्रक्रिया आहे. योग्य प्रक्रिया केलेले बियाणे पेरल्याने कमी अथवा जास्त ओलाव्यातही पीक एकसारखे उगवते. बीजप्रक्रिया केल्यामुळे पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते, पीक जोमदार येते, जमिनीत नत्राचे स्थिरीकरण होते व जमिनीतील अपायकारक जीवाणूंपासून पिकाचे संरक्षण करते.
विदर्भात यावर्षी काही ठिकाणी सरासरीपेक्षा दीड तर, काही ठिकाणी दोन पट जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे उपलब्ध झालेल्या ओलीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त रब्बी हंगामाची पेरणी करावी. मॉइश्चर कॉन्झरव्हेशन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे. वेळोवेळी कोळपणी केली तर, मॉइश्चर कॉन्झरव्हेशनला मदत होईल. त्यासाठी टायकोडर्माची ट्रिटमेंट दिल्या पीक संरक्षण होईल व उत्पादकता वाढविता येईल.
- डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ.पंदेकृवि, अकोला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.