बाळापूर : ज्यांनी आपल्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, त्या आई-वडिलांना त्यांच्या वृद्धावस्थेत आधार देणं हे मुला-मुलींचं कर्तव्य असते; मात्र आई-वडिलांना आधार न देता त्यांना त्रास देण्यातच धन्यता मानणाऱ्या मुलगा व सुनेला बाळापूर उपविभागीय अधिकाऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे.
वृद्ध आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलगा व सुनेला घर सोडण्याचा आदेश बाळापूर उपविभागीय अधिकाऱ्यांनी नुकताच एका प्रकरणात दिला आहे. उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांनी शुक्रवारी (ता.२१) एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून, यामुळे वृद्ध आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलांना चांगलीच चपराक बसली आहे.
वृद्धांना कोणत्याही त्रासाविना सामान्य जीवन जगण्यासाठी असणाऱ्या गरजा पुरविण्याची जबाबदारी ज्येष्ठ नागरिक कायद्याप्रमाणे पोटच्या मुलांची आहे, त्यामुळे आई-वडिलांना त्रास देणाऱ्या लोहारा येथील मुलाला व सुनेला घर सोडण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोहारा येथील साहेबराव मोरे व त्यांची पत्नी शांताबाई मोरे यांनी त्यांचा मुलगा कुलदीप मोरे व सुन ज्योत्स्ना मोरे यांच्याविरुद्ध अर्ज दाखल केला होता.
कुलदीप मोरे हा घरात आई-वडिलांना मारहाण व शिविगाळ करत असून, सुन जोत्सना हि सुद्धा अंगावर घासलेट टाकून पेटवून घेण्याची धमकी देते व आम्ही आणलेल्या किराण्यातील कोणतीही वस्तू न देता आम्हाला जेवणही देत नाही, अशी तक्रार ता.४ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आली.
या अर्जाच अवलोकन केले असता, त्यामधे आई-वडिलांनी घर बांधले तेव्हा त्यांच्या मुलांनी कोणत्याही प्रकारचा पैसा लावलेला नसून, उलट आई-वडिलांनाच मुलगा व सुनेकडून त्रास होतो, आई-वडिलांचे वृद्धत्व व आजार पाहता त्यांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ व त्याखालील नियम २०१० चे प्रकरण ६ नुसार ज्येष्ठ नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण व्हावे म्हणून गैरअर्जदाराविरुद्ध आदेश देणे योग्य होईल, असे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी काढले.
मुलाकडून वृद्ध आई-वडिलांच्या किमान अपेक्षाही पूर्ण होऊ नयेत हे दुःखद आहे. आई-वडिलांच्या घरात मुलगा आणि सुनेने रहाणे व त्यांनाच त्रास देणे, यामुळे त्यांच्या जगण्याच्या अधिकारावर गदा येते, अशा प्रकारचा त्रास गेली अनेक वर्षं सोसत असलेल्या अनेक वृद्ध दाम्पत्यांसाठी आशेचा एक किरण या आदेशातून निर्माण झाला आहे.
- डॉ. रामेश्वर पुरी, उपविभागीय अधिकारी, बाळापूर.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.