अकोला : बदलीच्या आदेशाने शिक्षकांचा जीव टांगणीला!

शिक्षकांचा पदस्थापनेचा मार्ग खडतर
Teacher
Teachersakal
Updated on

अकोला : आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात रुजू झालेल्या शिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये समायोजन केल्यानंतर जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने रुजू होण्यासाठी येणाऱ्या शिक्षकांना पदस्थापना न देण्याचे आदेश शासनानाच्या ग्रामविकास विभागाचे उपसचिव का.गो. वळवी यांनी दिले आहेत. सदर शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी जिल्हाअंतर्गत बदलीची कार्यवाही पूर्ण करावी, असेही आदेशात नमूद आहे. त्यामुळे यानंतर जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना पदस्थापना मिळण्याचा मार्ग खडतर झाला आहे.

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे आंतरजिल्हा बदल्यांबाबत २२ ऑगस्ट २०२२ रोजी आदेश निर्गमित झाल्याने प्रथम टप्पा पूर्ण झाला आहे. सदर आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना ५ सप्टेंबर २०२२ पर्यंत कार्यमुक्त करण्याच्या सूचना शासनामार्फत देण्यात आल्या होत्या. त्यास अनुसरून आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांना संबंधित जिल्हा परिषदांनी शासन निर्णयातील तरतुदीनुसार पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही जिल्हा परिषदेत सुरु आहे.

परंतु शासनाने आता जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हाअंतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सेवानिवृत्त, निधन किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेली पदे त्याचप्रमाणे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर झालेल्या रिक्त जागा तसेच आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांच्या समायोजनानंतर उर्वरित रिक्त पदे, संभाव्य रिक्त पदे याबाबतचा संपूर्ण तपशील ऑनलाईन बदली प्रणालीवर अद्ययावत करावा, असे आदेश शासनाने दिले आहेत.

३१ ऑगस्ट पर्यंतची रिक्त पदांची माहिती ऑनलाईन संगणकीय प्रणालीवर अद्ययावत केल्यानंतर आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांना पदस्थापना न देता जिल्हाअंतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर शासन निर्णयातील तरतुदीनुसार समयोजनाने पदस्थापना देण्याची कार्यवाही करावी, असे आदेश शासनाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे ३१ ऑगस्ट नंतर आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांना जिल्ह्यात पदस्थापना मिळण्याचा मार्ग खडतर झाला आहे.

बदलीने आलेल्या शिक्षकांची पंचाईत

शासन निर्णय सात एप्रिल २०२१ नुसार सहा सप्टेंबर २०२२ व १३ सप्टेंबर २०२२ रोजी रिक्त जागा प्रसिद्ध करुन शिक्षकांना पदस्थापना देणे आवश्यक होते. परंतु शिक्षण विभागाने यासंबंधीची कार्यवाही केली नाही. परंतु आता १९ सप्टेंबर २०२२ रोजी ग्रामविकास विभागाने पत्र काढल्याने आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची पंचाईत झाली. त्यामुळे जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियापूर्ण होण्यापूर्वीच पदस्थापना मिळाली पाहिजे, अशी मागणी शिक्षकांद्वारे करण्यात येत आहे. किमान १३ सप्टेंबर पूर्वी रुजू झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्यात यावी, अशी मागणीही शिक्षकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.