Akola Weather Update
Akola Weather UpdateSakal

Akola Weather Update : उष्म्याने जिवाची लाही-लाही! अकोल्यात सर्वाधिक ४५.५ सेल्सिअस तापमानाची नोंद

सूर्याच्या प्रखरतेमुळे गुरुवारी (ता. २३) राज्यातील सर्वाधित कमाल ४५.५ अंश सेल्सिअस अकोल्यात नोंदवण्यात आले.
Published on

अकोला : सध्या राज्यात सर्वत्र नागरिकांना तीव्र उन्हाच्या चटक्यांचा सामना करावा लागत आहे. सकाळी ८ वाजतापासूनच उन्हाचे चटके नागरिकांना जाणवत आहेत. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या उन्हामुळे नागरिकांच्या जिवाची मात्र लाही-लाही होत आहे.

सूर्याच्या प्रखरतेमुळे गुरुवारी (ता. २३) राज्यातील सर्वाधित कमाल ४५.५ अंश सेल्सिअस अकोल्यात नोंदवण्यात आले. हे तापमान यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक असून याआधी मे महिन्यातच सन २०२२ मध्ये ४५.८ आणि सन २०१६, सन २०१७ व सन २०१८ मध्ये ४५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते.

यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र हाेईल, असा अंदाज हवामान विभागातील तज्ज्ञांनी वर्तविला हाेता. मात्र जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अवकाळी पाऊस झाला हाेता. काही ठिकाणी गारपीटही झाली हाेती. परिणामी वातावरणात बदल झाला हाेता.

मार्च महिन्यात दुसऱ्या पंधरवाड्यात व अखेरीस तर उन्हाच्या झळा जास्तच वाढल्या हाेत्या. त्यानंतर एप्रिलमध्ये ही जास्त तापमान नाेंदविण्यात आले. त्यासोबतच अवकाळी पावसाने सुद्धा हजेरी लावली. त्यामुळे तापमान कमी झाले होते.

दरम्यान आता पुन्हा सूर्याच्या प्रखर किरणांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे भर दुपारी घराबाहेर पडताना नागरिकांना दुपट्टा, टोपी शिवाय बाहेर पडणे अवघड झाले आहे. तीव्र उन्हापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

दरम्यान गत दोन तीन दिवसांपासून अकोल्यात सूर्याच्या प्रखरतेचा सामना नागरिकांना करावा लागत असून दररोज ४२ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान नोंदवण्यात येत आहे. उन्हाच्या कहरामुळे गुरुवारी (ता. २३) जिल्ह्यात ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

पाऱ्याची चाळीशी रोजचीच

जिल्ह्यात उन्हाचा कहर सतत वाढत आहे. त्यामुळे नागरिक दुपारी घराबाहेर जाणे टाळत आहेत. पाऱ्याची चाळीशी दररोजचीच झाली आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार १३ मे रोजी जिल्ह्याचे तापमान ४१.५ अंश सेल्सिअस, १४ मे ४१.८, १५ मे ४०.९, १६ मे ४२.४, १७ मे ४०.२, १८ मे ४२.०, १९ मे ४३.२, २० मे ४३.८, २१ मे ४३.८, २२ मे ४४.८ तर २३ मे रोजी सर्वाधिक ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

विदर्भातील सर्वाधिक तापमान अकोल्यात

सध्या विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आहे. परंतु अकोल्यात मात्र उन्हाची तीव्रता सर्वाधिक नोंदवण्यात येत असल्याने अकोला सर्वात उष्ण शहर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

२३ मे रोजी अकोल्यात सर्वाधिक ४५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. त्यासोबतच अमरावती ४३.२, भंडारा ४०.२, बुलढाणा ४२, ब्रह्मपुरी ४३.२, चंद्रपूर ४३.२, गडचिरोली ४२.६, गोंदिया ४०.४, नागपूर ४१.९, वर्धा येथे ४३.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

उद्यापासून नवतपा

मान्यतेनुसार, सूर्य जेव्हा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा नवतपाला सुरुवात होते. सूर्य या नक्षत्रात १५ दिवसांसाठी येतो. या १५ दिवसांतील सुरुवातीचे ९ दिवस नवतपा म्हणून ओळखले जाते. दरवर्षी मे आणि जून महिन्याच्या दरम्यान नवतपा येतो. यंदा २५ मे पासून ३ जून पर्यंत नवतपा राहिल. त्यामुळे या काळात उन्हाची तीव्रता अधिक वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.