शिरपूर जैन : पावसाळा आला की पावसाचे पाणी बिळात शिरल्यानंतर सरपटणारे प्राणी बाहेर येतात, पावसाळ्यात दरवर्षी सर्पदंशाने अनेक लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यापासून जवळपास हिवाळा संपेपर्यंत काळजी व खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्पदंश होऊ नये यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगावी.
भारतात दरवर्षी ५० हजार लोक सर्पदंशाने मृत्युमुखी पडतात. हा आकडा धक्कादायक आहे. याला अनेक कारणे आहेत, सर्पदंश झाल्यावर वेळेवर उपचार न मिळणे, दवाखाना लांब असणे, दवाखान्यात सर्पदंशावरील लस उपलब्ध नसणे, डॉक्टर हजर नसणे अशा कारणांनी नागरिकांना आपले प्राण गमवावे लागतात. सर्पदंश ही फार मोठी समस्या असून याबाबत व्यापक जनजागृतीची गरज आहे. सर्पदंश होऊच नये यासाठी काळजी घेतली, तर सर्पदंश टाळता येऊ शकतो.
ग्रामीण भागात सापाविषयी खूप गैरसमज आहेत. नागरिकांमध्ये व्यापक जनजागृतीची करून सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी करता येईल. वृक्षवल्ली व वन्य जीव संरक्षण संस्थेने मिशन झिरो स्नेक बाईट अंतर्गत शाळा, महाविद्यालयात, सार्वजनिक कार्यक्रमात लोकांपर्यंत जनजागृतीची माहिती पोहोचवली आहे. वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था यासाठी सतत काम करीत असतात.
अशी घ्यावी काळजी
घरा जवळील परिसर स्वच्छ ठेवावा, शिळे, खरकटे अन्न घराजवळ टाकू नये ,अंधारात एखादी वस्तू शोधताना बॅटरीचा किंवा काठीचा आधार घ्यावा. वाटेत दिसलेल्या सापाला उगाच मारण्याचा प्रयत्न करू नये. शेतामध्ये कापणीच्या हंगामात काठीचा आधार घेऊन शहानिशा करूनच पिकांची कापणी करावी. विटा व दगडाचे ढिगारे, पालापाचोळा साफ करताना विशेष काळजी घ्यावी, पाळीव प्राणी, पक्षी सुरक्षित जागी ठेवावेत. शेतामध्ये, घराबाहेर लोकांनी जमिनीवर झोपू नये.
कृषी विभागाची मदत
शेतकरी शेतमजूर आपल्या शेतात काम करताना कोणताही अपघात झाल्यास त्याला दोन लाख रुपयांची मदत कृषी विभागाकडून दिली जाते. या योजनेत सापाचा देखील समावेश आहे, सर्पदंशाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येतो. मात्र ग्रामीण भागातील लोकांना या योजनेची माहिती नसल्यामुळे या योजनेचा लाभ नागरिकांना होत नाही. या योजनेअंतर्गत शेतकरी, शेतमजूर यांना जंगली प्राणी वाघ, अस्वल, साप, विंचू यामुळे मृत्यू झाल्यास किंवा रस्ता व रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, वीज पडून मृत्यू, विजेचा धक्का लागून मृत्यू, कीटकनाशक फवारणी करताना मृत्यू ,झाडावरून पडून मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना या योजनेचा लाभ घेता येतो. याकरिता आवश्यक कागदपत्रांसह सदर अर्ज कृषी विभागाकडे सादर करावा या योजनेचा लाभ १० ते ७५ वयोगटातील लोक घेऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.