बुलडाणा : गेल्या काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होत आहे. जिल्ह्याचे तापमान हे ३९ ते ४० अंशापर्यंत वाढत आहे. या वाढत्या तापमानामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी नागरिकांनी उपायांचा अवलंब करावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.
उष्माघाताची लक्षणे ही उन्हाळा सुरू झाल्यानंतर उन्हात फिरल्यामुळे डोकेदुखी, ताप, जास्त घाम येणे आणि बेशुद्ध पडणे, अशक्तपणा जाणवणे, शरीरात पेटके येणे, नाडी असामान्य होणे ही लक्षणे दिसून येतात.
उष्माघाताची लक्षणे आढळल्यास व्यक्तीला सावलीच्या ठिकाणी झोपवावे, व्यक्तीचे कापडे सैल करावे, त्याला द्रव पदार्थ, कैरीचे पन्हे पाजावे, तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, बाधीत व्यक्तीला तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा.
नागरिकांनी उष्ण उन्हात बाहेर पडणे टाळावे, विशेषतः दुपारी १२ ते दुपारी ३ यावेळेत बाहेर असताना कठोर परिश्रम टाळावे. उष्माघातामुळे त्रास झाल्यास प्रथमोपचारामध्ये त्रास झालेल्या मुला, मुलींना लगेच घरात, सावलीत आणावे, संवेदनशील राहून त्यांचे कपडे सैल, ढिले करावेत, नळाच्या पाण्याने ओल्या केलेल्या पट्ट्या शरीरावर ठेवाव्यात,
उलटी होत असल्यास त्यांना एका कुशीवर वळवावे, जेणेकरून ते गुदमरून जाणार नाहीत. हवा येण्यासाठी पंख्याचा वापर करावा, पायाखाली उशी किंवा तत्सम काही ठेऊन त्यांना आडवे पडायला सांगावे, मुले जागे असल्यास वारंवार साफ आणि थंड पाण्याचे घोट पाजावे. मुल बेशुद्ध असल्यास त्यांना खायला, प्यायला काहीही देण्याचा प्रयत्न करू नये.
उष्माघाताची प्रौढांमध्ये शरीराचे तापमान १०४ फॅरन्हाईटपर्यंत पोहोचल्यास स्नायूंचे आखडणे, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे व चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे व धडधडणे ही लक्षणे दिसून येतात.उष्माघाताची लहान मुलांमध्ये आहार घेण्यास नकार देणे, नियमीत चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, कुठूनही रक्तस्राव होणे, तोंडाची त्वचा कोरडी होणे, डोळे शुष्क होणे ही लक्षणे दिसतात.
उष्णतेच्या लाटे दरम्यान नागरिकांनी हलके अन्न खावे, फळे आणि सलाडसारखे पचायला हलके असणारे अन्न खावे, पुरेसे पाणी प्यावे, सैल, हलके, फिक्या रंगाचे आणि सुती कपडे परिधान करावेत. गॉगल, छत्री, टोपी, बूट, चप्पल, घालूनच घराबाहेर पडावे. प्रवास करताना पाण्याची बाटली आपल्याजवळ बाळगावी. थंड पाण्याने अंघोळ करावी, घराबाहेरील उपक्रम, मैदानी उपक्रमादरम्यान थोड्या-थोड्या वेळाने विश्रांती घेत चला व विश्रांतीची वारंवारिता वाढवावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.