अकोला : नागपूर ‘हिट अँड रन’ प्रकरणाच्या तपासात आपण कोणताही हस्तक्षेप केला नसल्याचा पुनरुच्चार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी भाजपने अकोल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित आरक्षण विरोधी विधानाविरोधात निदर्शने केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी उपरोक्त दावा केला.
ते म्हणाले की, मी माझ्या मुलासाठी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही. मी दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत होतो. पण त्यांच्याशीही हा विषय छेडला नाही. नागपूर येथील अपघाताप्रकरणी पोलिस चौकशीवर कोणताही दबाव येणार नाही. मी केव्हाही पोलिसांना फोन केला नाही. फक्त एकदा माहिती घेतली. काही दिवासांपूर्वी अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. मी त्यांच्यापुढेही हा विषय काढला नाही. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी कुणाचाही मुलगा असला तरी त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी. आता फक्त गाडी चालवणारा व गाडीत बसणाऱ्यांवर कोणते गुन्हे दाखल होणार? हा प्रश्न उरला आहे.