मलकापूर (जि. बुलडाणा) : ऑक्टोबर महिन्यात नऊ हजार रुपयांपर्यंत प्रति क्विंटल भाव गाठलेल्या कापसाच्या भावात सध्या मागील पंधरवाड्यापासून सतत घसरण होत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत. शेतकऱ्यांनी आणखी भाव वाढेल म्हणून कापूस घरातच साठवून ठेवला आहे. परंतु, मंगळवारी मलकापूर येथील बाजारपेठेत खासगी व्यापाऱ्यांकडून ७ हजार ७०० रूपये प्रति क्विंटलप्रमाणे कापसाची खरेदी करण्यात आली. अगोदरच यंदा मलकापूर तालुक्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे कापसाचे पीक हातचे गेले आहे. त्यात आता आणखी दिवसेंदिवस कमी होत असलेले कापसाचे भाव हे नक्कीच शेतकऱ्यांची चिंता वाढविणारे आहे. दरम्यान कापसाच्या भावात आठ दिवसात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.
तालुक्यातील शेतकरी दरवर्षी नगदी पीक म्हणून कापसाचे उत्पादन घेत असतो. परंतु ऐन कपाशीला कैऱ्या लागण्याच्या काळातच सततधार पावसाने सुरूवात केल्याने कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. शिवाय अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या शेतात तुंबलेले पाणी मोटारीद्वारे बाहेर काढुन कपाशी पीक जगविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत कपाशीचे पीक हातात आणले. परंतु, त्यातही कापुस वेचायलाही मजुर सापडत नसल्याने शेतकऱ्यांनी अतिरिक्त भाडे देत विदर्भातील मजुर आयात करीत पाच ते सहा रुपये किलो प्रमाणे मजुरी देत कापूस घरात आणला आहे.
अनेक ठिकाणी तर एका वेचणीत कपाशीची उलगंवाडी झाली आहे. ज्या ठिकाणी पंचवीस क्विंटल कापूस व्हायचा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दहा क्विंटलवरच समाधान मानावे लागले आहे. दिवाळीच्या अगोदर खासगी व्यापाऱ्यांकडून कापुस खरेदीला सुरूवात करण्यात आली होती. सुरूवातीला पाच हजार रुपये प्रति क्विंटल खरेदी होणाऱ्या कापसाचे भाव नऊ हजार रुपयापर्यंत जाऊन पोहचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाचे आणखी भाव वाढतील म्हणून कापुस घरातच साठवून ठेवला आहे.
परंतु सध्या दिवसेंदिवस कापसाच्या भावात घसरण होत चालली असल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सुर उमटत आहे. शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेले हे पांढरे सोने घरी आणण्याकरिता शेतकऱ्यांना लागवडीपासून ते कापूस घरी आणेपर्यंत मोठा खटाटोप करावा लागला आहे. मजुरांची विनवणी करुन कापुस वेचावा लागला आहे. यातच अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात देखील घट झाली आहे.
आठ दिवसांत दरात दहा रुपयांची घसरण
दिवसेंदिवस कापसाचे बाजार शंभर-दोनशे रुपयाने तुटत चालले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. शिवाय घरात माल असल्यावर भाव वाढत नाही मात्र विकल्यावर शेती मालाचे भाव वाढतात, याचा प्रत्यय शेतकऱ्यांना दरवर्षी येऊ लागला आहे.
-अशोक रवणकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.