अकोट : तालुक्यातील उमरा सर्कलमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या बेमुदत उपोषणाला अखेर यश आले असून, राम पाटील मंगळे यांनी सुरू केलेले उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
दिवाळीच्या दिवशी प्रशासनाच्या यशस्वी मध्यस्थीने नारळ पाणी देऊन राम पाटील मंगळे यांच्या उपोषणाची सांगता करण्यात आली. ता.१० व १२ ऑक्टोबर रोजी उमरा सर्कलमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने उमरा, बेलुरा, जीतापूर-माऊली, मक्रमपूर, शिवपूर, शहापूर, बोर्डी, लाडेगाव, खैरखेड, पिंप्री (खु.), पिंपरी जैनपूर, एदलापूर, चोरवड, जितापूर या १४ गावांना फटका बसला होता. अतिवृष्टीमुळे अनेकांच्या शेतजमीन खरडून उभे पीक वाहून गेले होते, तर काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अन्न धान्याची नासाडी झाली होती.
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सरसकट मदत मिळावी या मागणीसाठी सरपंच राम पाटील मंगळे यांनी स्थानिक प्रशासनाला निवेदन देऊन मदतीची मागणी केली. दिवाळी आधी मदत न मिळाल्यास आपण ता. २१ ऑक्टोबरपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनातून दिला होता. उपोषण सुरू झाल्यानंतर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन आपला पाठींबा दर्शविला.
यानंतर विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत मंडळींनी उपोषण स्थळाला भेट देऊन राम पाटील मंगळे यांची मागणी रास्त असल्याचे सांगत आपला पाठींबा दर्शविला होता, उपोषणाला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद बघता खडबडून जागे झालेल्या स्थानिक प्रशासनाने राम पाटील मंगळे यांच्या उपोषणाची दखल घेत शासनाकडे अनुदान मागणी करत प्राप्त झालेले अनुदान विनाविलंब शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर वितरित करणार असल्याचे लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली. काही शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वितरित झाल्यानंतर अखेर राम पाटील मंगळे यांनी आपण उपोषण मागे घेणार असल्याची घोषणा केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे, तहसीलदार नीलेश मडके, मंडळ अधिकारी श्री.भारसाकडे, प्रहार प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू, शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष ललित बहाळे, श्री.तायडे, सुशील पुंडकर, तुषार पाचकोर, सागर उकर्डे, शेख बल्ली, समिर जमादार, गौरव अरबट, अंकित लोखंडे, पांडू खवले, श्रीहरी मंगळे, दिवाकर मंगळे, संदीप मंगळे, अंकित मंगळे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या मदतीला धावले राम पाटील मंगळे
शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसडले असतांना कुठलाही लोकनियुक्त प्रतिनिधी/ प्रशासनाचा अधिकाऱ्याने उमरा सर्कलमध्ये येऊन फुंकर घालण्याचा, तसेच शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला नाही. अशावेळी बेलुरा येथील प्रहारचे कर्तव्यदक्ष सरपंच राम पाटील मंगळे यांनी स्वखर्चातून सतत दोन दिवस शेतकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.