बळीराजा आपली जातच लढवय्यी....

आत्महत्येने प्रश्न सुटत नाहीत, ते अधिक बिकट होतात
farmer
farmer
Updated on

प्रिय बळीराजा,

भारतीय अर्थव्यवस्थाच संपूर्णतः कृषीवर आधारित आहे. त्यामुळे जरी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलो आणि साहित्य क्षेत्रात वावर असला तरी शेतीशी माझी नाळ जुळलेलीच आहे. त्यामुळेच शाळेतही एफ.एफ.आय. क्लब (फ्युचर फार्मर ऑफ इंडिया) नावाचा क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना शेतीविषयक बाबींशी जुळवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. ‘शेती देखील जगण्याचे व जगविण्याचे साधन होऊ शकते’, हा मूलमंत्र बालपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा हा प्रयत्न आहे, असं मला वाटतं.

शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाण आज समाजातील प्रत्येक घटकालाच असली पाहिजे. शेती जर पिकली नाही तर आपण काय खाणार? हा प्रश्न प्रत्येकालाच विचारला जावा. मॉन्सूनच्या जुगाराशी लढत, पिकांवरील वेगवेगळ्या रोगराईशी लढत आणि कसाबसा माल तयार झालाच तर व्यापाऱ्यांशी लढत तू काही थोडेफार पैसे मिळवित असतो. त्या तुझ्या अपार कष्टाचे मोल होत नाही हीच खरी खंत आहे आणि त्यासाठीच श्रमाचे मोल पुढील पिढीत रुजविण्याचा छोटेखानी प्रयत्नही मी करीत असतो.

मला माहिती आहे निवडणुका जवळ आल्यात ही कर्जमाफीच्या घोषणा होतात. पण तुझ्या पदरात काहीच पडत नाही. त्यासाठी देखील जागरूक झालं पाहिजे, सत्ताधाऱ्यांना जाब विचारणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. शेतकरी विरोधी वैचारिक मांडणीला तेवढेच सडेतोड उत्तर दिल्या गेले पाहिजे. तुझ्या आत्महत्यांविषयी वाईट बोलणारीही मंडळी समाजात आहेत. त्यांनाही सडेतोड उत्तर दिल्या गेलं पाहिजे आणि त्यासाठी तुझं सक्षम असणं गरजेचं आहे. म्हणूनच त्यासाठी पुढची पिढी अधिक सुशिक्षित घडविणे आपण आपलं कर्तव्य समजलं पाहिजे.

परिस्थिती कितीही बिकट असली, गंभीर असली तरीही, हताश होणं आणि आत्महत्येसारखा अंतिम पर्याय निवडणे योग्य नाहीच. अनेक सकारात्मक बाबींची माहिती घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. मुलांना शिकवणे आणि त्यासोबतच व्यवहारवादही शिकवणे आज आवश्यक झाले आहे. पुढच्या पिढीला व्यवहार समजला नाही तर, आपली लूट अजून वाढू शकते. त्यामुळे खचून न जाता आपल्या अनुभवातून पुढची पिढी अधिक सक्षम घडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. आत्महत्याने प्रश्न सुटत नाहीत तर, ते अधिक बिकट होतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे.

प्रत्येक प्रश्नावर तोडगा असतोच. आपली जातच लढवय्यी आहे. त्यामुळे लढणे हे आपल्या रक्तातच आहे. आपण संघटित होऊन व्यवस्थेविरुद्ध लढू शकतो आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी करू शकतो. आपण सरकारी योजना डोळसपणे समजावून घेऊन त्याचा फायदा मिळवू शकतो. गटशेती सारखे प्रयोगही करू शकतो. तू म्हणशील, हे सर्व सांगणं सोपं आहे... मला माहिती आहे कारण हे करणं कठीण आहेच.

पण कठीण आहे म्हणूनच करण्यात मजा आहे. येणाऱ्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देऊन नैराश्य टाळता येतं आणि तेच आपण करावं एवढीच अपेक्षा. आम्ही सर्व आपल्या पाठीशी आहोतच. शेती उद्योगाला सकारात्मक पाठिंबा देणाऱ्या सकाळ, ॲग्रोवन सारख्या चळवळीशी जुळलात तर कार्य करण्याची अजून चांगली ऊर्जा मिळेल आणि ‘हरायचं नाही, लढायचं’ ही भावना वृद्धिंगत होईल, असं मला वाटतं.

- संचालक, प्रभात किड्स अकोला तथा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यकारिणी सदस्य

(संकलन : अनुप ताले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.