सदर फसवणूक प्रकरणाची तक्रार फिर्यादी यांनी सर्वप्रथम मे २०२३ मध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत दिली होती.
अकोला : शहरातील रामदास पेठ पोलिस स्टेशनअंतर्गत (Ramdas Peth Police Station) येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Krushi Utpanna Bazar Samiti) आवारात फिर्यादी गणेश सीताराम जाजू यांची अकोल्यातील दोन धान्य दलालांनी तब्बल सव्वा दोन कोटींची फसवणूक केली असल्याची फिर्याद रामदास पेठ पोलीस ठाण्यात दिली. तब्बल १२ महिन्यांच्या चौकशीनंतर रामदास पेठ पोलिसांनी दोन धान्य दलालांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत.
कैलास अग्रवाल आणि हरगोविंद जाजू असे गुन्हा दाखल केलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी गणेश सीताराम जाजू यांची अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आरती ट्रेडिंग कंपनी नावाची फर्म आहे. ते या फर्मच्या माध्यमातून विविध गावाच्या शेतकऱ्यांचे (Farmers) धान्य, माल विकत घेत ते स्टॉक करून ठेवतात. बाजारात तेजी आल्यास ते माल विकतात. याच कालावधीत सण २०१७ मध्ये त्यांची ओळख बाबा असोसिएटचे संचालक कैलास अग्रवाल यांच्याशी झाली. तेव्हापासून त्यांच्याशी व्यवहार सुरू झाला.
सण २०२२ मध्ये व्यवहाराचे ऑडिट केल्यास त्यांना ८६ लाख ६४ हजार ८५२ रुपयांची तफावत आढळून आली असून ती रक्कम त्यांना कैलास अग्रवाल यांच्याकडून घेणे निघत होती. तद्नंतर कैलास अग्रवाल यांनी फिर्यादीला आगामी काळात सोयाबिनला मोठा भाव येणार आहे असे म्हणत सोयाबीन साठवून ठेवण्याचा सल्ला दिला. तब्बल १७ शेतकऱ्यांकडून फिर्यादीने १२७१ क्विंटल सोयाबीन विकत घेतले आणि पूर्वीचे साठविलेले १३१४ क्विंटल सोयाबीन असे एकूण २५८६.७० क्विंटल सोयाबीन हरगोविंद जाजू यांच्या रिशी वेअर हाऊस गोडाऊनमध्ये साठवून ठेवला. त्याच्या रितसर पावत्या सुद्धा फिर्यादीकडे आहेत.
यासोबतच विविध माल वेळोवेळी शेतकऱ्यांकडून खरेदी करत कैलास अग्रवाल यांच्या सांगण्यावरून विविध गोडाऊन, वेअर हाऊसमध्ये साठवून ठेवला. त्या मालाची दोन्ही संशयित आरोपी यांनी परस्पर उचल करीत विल्हेवाट लावल्याची माहिती फिर्यादीला मिळाली. एवढेच नव्हे, तर फिर्यादीच्या नावे खोटे बिल सुद्धा बनविले असल्याचे तक्रारीत नमूद आहे. सदर तक्रारीवरून रामदास पेठ पोलिसांनी दोन्ही संशयित कैलास अग्रवाल आणि हरगोविंद जाजू यांच्याविरुद्ध भांदवी कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ आणि ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. सद्यस्थितीत दोन्ही संशयित अटक नसल्याची माहिती रामदास पेठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी दिली.
सदर फसवणूक प्रकरणाची तक्रार फिर्यादी यांनी सर्वप्रथम मे २०२३ मध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत दिली होती. तदनंतर रामदास पेठ पोलीस स्टेशन येथे १५ जून २०२३ रोजी दिली. त्यावेळी रामदास पेठ पोलिसांनी तब्बल ६५ दिवस फिर्यादिला टाळाटाळ केली असल्याचा आरोप फिर्यादीने केला. तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना भेटून सदर प्रकरण सांगितले, त्यावेळी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर यांच्याकडे तक्रार वर्ग करण्यात आली.
सदर प्रकरणी त्यांनी चौकशी अहवाल सुद्धा पोलीस अधीक्षक यांना सादर केला होता. मात्र, पुन्हा सदर चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी चौकशी करून अहवाल ३१ डिसेंबर २०२३ रोजी पोलीस अधीक्षक यांना सादर केला होता. तरी मात्र सदर प्रकरण आतापर्यंत चौकशीत ठेवण्यात आले होते. फिर्यादीने अखेर या प्रकरणी अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांची भेट घेत त्यांना तक्रार अर्ज सादर केला. अखेर मंगळवारी सदर प्रकरणी रामदास पेठ पोलीस ठाण्यात तब्बल १२ महिने चाललेल्या चौकशीनंतर गुन्हे दाखल करण्यात आले.
याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल असताना संशयित आरोपींना अटक करण्यात आली का? असा प्रश्न पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांना विचारला असता त्यांनी याप्रकरणी चौकशी करून अटक करू अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे आता या प्रकरणी आता पोलिसांना आणखीन काय चौकशी करायची आहे असा यक्ष प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.