अवैध वाहतुकीची कायद्यासमोर दबंगगिरी; वाहतूक पोलिस सापडेना

मंगरुळपीर शहरातील मानोरा रोड हा अवैध प्रवाशी वाहतुकीचे वाहन स्थळ बनला आहे.
Traffic
Trafficsakal
Updated on

मंगरुळपीर (जि. वाशीम) - शहरातील मानोरा रोड हा अवैध प्रवाशी वाहतुकीचे वाहन स्थळ बनला आहे. या रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूकदार त्यांच्या मर्जीने त्यांची वाहाने उभी करतात. त्यांना पोलिसांचा धाक नाही. तासनतास त्यांची वाहने रस्त्याच्या मधोमध उभी असतात. याचा त्रास सामान्य माणसाला होतो. परंतु, यांच्या दादागिरीमुळे त्यांनाही चुप्पी साधून राहावे लागते. जे पोलिसांचेच ऐकत नाही ते कोणाचे ऐकणार? जिल्ह्याला लाभलेले नवीन पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांनीच स्वतः पुढाकार घेण्याची मागणी सर्वसामान्य माणसातून होत आहे.

मानोरा रस्त्यांवरील बेताल वाहतुकीमुळे दररोज लहान-मोठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत. दूपदरी रोड असला तरी, दोन्ही बाजूला या चौकातील दादागिरी करणाऱ्या दादा लोकांच्या ताब्यात हा रोड आहे. रस्त्यावर यांचे अवैध प्रवासी वाहनासोबतच हातगाड्या रस्त्यावर असतात. या रोडवरून जाणाऱ्या बाहेर गावच्या वाहनांना त्यांची वाहने मार्गस्थ करण्यासाठी काटेवरची कसरत करावी लागते. जर बाहेर गावातील वाहनाचा यांच्या वाहनांना किंवा हातगाडीला जरा सुद्धा धक्का लागला तर, झुंडशाहीने सदर वाहन चालकाला यांच्याकडून मारहाण करण्यात येते. या रोडवरून जावे तरी कसे, असा प्रश्‍न अनेकांसमोर उपस्थित झाला आहे.

येथील ठाणेदारांनी या रोडवर एका ट्रॅफिक पोलिसाची नियुक्ती सुद्धा केली नाही. त्यामुळे येथील ठाणेदार सुद्धा यांच्या दादागिरीसमोर कायदा गुंडाळून बसले काय, असा प्रश्न या परिसरातील व्यापाऱ्यांना पडला आहे. ठाणेदारांना याबाबत माहिती दिली असता बघतो, करतो असेही वेळकाढूपणाचे उत्तर देत असल्याचे बोलल्या जात आहे. या रोडवरील व्यापारी, यांच्या दादागिरीमुळे त्रस्त झाले आहेत. या दादा लोकांची वाहने व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर उभी करतात. याबाबत व्यापाऱ्यांनी त्यांना हरकत केली तर, झुंडशाही पद्धतीने त्यांच्याशी वाद घालून आवर्च भाषेत शिवीगाळ करतात.

Traffic
akola : बावन्न हजार नागरिकांसाठी एकच डाॅक्टर

वेळ पडल्यास हे प्रकरण मारहानीपर्यंत जाते आणि याबाबत पोलिसांत तक्रार देण्यास गेल्यावर पोलिस दोन्ही पार्टीवर गुन्हे दाखल करतात. ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत अशा दादा लोकांना याचे काही वाटत नाही. परंतु, व्यापारी कुठे चकरा मारायच्या, असेही अनेक व्यापाऱ्यांनी सांगितले. परंतु, हे नित्याचे समजून पोलिस दुर्लक्ष करीत असल्याने दादा लोकांच्या हिम्मतीत वाढ होत चालली असल्याचे चित्र आहे.

दर शनिवारी बाजाराच्या दिवशी या रस्त्यांवर चालायला नीट येत नाही तर, वाहन कसे चालवावे. वाहनांची भरमसाट गर्दी, वाहतुकीची गंभीर समस्या हे बघायचे असेल तर, दर शनिवारी मंगरुळपीरच्या मानोरा रोडवर येऊन पहावे, असे चित्र निर्माण होते. आता मानोरा रोडवरील बेताल वाहतुकीला व रोडवरील हातगाड्याना शिस्त लावायची तरी कुणी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलिसांनी या रोडवरील अवैद्य वाहनचालकांवर कारवाई केल्याचे साधे उदाहरणही नाही. पोलिसच नाही तर, कारवाई कुठली, असेही काही सूज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे. वृत्तपत्रांमध्ये याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यावर केव्हा तरी, पोलिस कारवाई करतात. परंतु, पोलिसांच्या कारवाईचा प्रभाव तात्पुरता असल्याने, पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती निर्माण होते. वाहन चालविताना मोबाइल फोनवर बोलणे, ट्रिपलसिट वाहन चालविणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे तसेच कर्कश आवाजात वाहन चालवून चिडीमारी करणे, वाहतूक नियमांचे नेहमीच होणारे अशा प्रकारचे उल्लंघन नित्याचे झाले आहे. नियमांचे सर्रास होणारे उल्लंघन वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या जीवावर बेतते.

मानोरा चौकात, उभे राहणारे ऑटोरिक्षा, अवैध प्रवासी वाहने, रस्त्यांवरील उभी केलेली वाहने, यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. मात्र, या चौकातील वाहतूक पोलिस कधीच कारवाई करताना दिसत नाहीत आणि दर शनिवारी अवैध प्रवाशी वाहन चालकांकडून हिशोब करताना जास्त दिसत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्याचा वाहनचालकांवर प्रभावी परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी पोलिसांनी कोणतेच नियोजन केलेले नाही. येथील पोलिस ठाण्याचे ठाणेदारांना याबाबत माहिती नाही असे नाही तर, ते चुप्पी साधून का आहेत, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. नव्यानेच जिल्ह्यात रुजू झालेले पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांनी याबाबत येथील ठाणेदारांना विचारणा करून या दादागिरी करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करून वठणीवर आणावे, अशी अपेक्षा येथील व्यापारी व नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

याबाबत मी सदर ठिकाणी कर्मचाऱ्यांना पाठवून त्यांना कारवाई करण्यास सांगतो.

- पोलिस निरीक्षक, धंनजय जगदाळे

याबाबत आम्ही पोलिस निरीक्षकांना माहिती दिली असता बघतो, सांगतो असे बेजबाबदारपणाचे उत्तर देऊन आपल्या कर्तव्यापासून ते हात झटकतात. कारवाई केली तरी ती तात्पुरती स्वरूपाची असते. पुन्हा जैसे थे परिस्थिती होते.

- परिसरातील व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.