वाशीम : जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा मतदारसंघांपैकी कारंजा विधानसभा मतदारसंघ (Karanja Assembly constituency) जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाचा ठरत आला आहे. याच कारंजा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress Party) काँग्रेसला (Congress) धोबीपछाड देत युसूफ पुंजाणीचा केलेला प्रवेश रिसोड पंचायत समितीतील सत्ताकारणानंतर काँग्रेससाठी दुसरा झटका ठरला आहे. पुंजाणीच्या (Yusuf Punjani) राष्ट्रवादी प्रवेशाने या मतदारसंघाची राजकीय गणितेच बदलली आहे. तिरंगी लढतीत बाजी मारणाऱ्या भाजपला आता घाम गाळल्याशिवाय पर्यायच उरला नसल्याची चर्चा आहे.
जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघ कायम जिल्ह्याच्या राजकीय पटलावर महत्त्वाचा राहिला आहे. या मतदारसंघात माजी आमदार प्रकाश डहाके यांचा अपवाद वगळता मतदारसंघाबाहेरील दिग्गजांनी या मतदारसंघाचे नेतृत्व करून जिल्ह्याचे राजकारण त्यांच्या मुठीत ठेवल्याचा इतिहास आहे. यामध्ये माजी मंत्री अनंतराव देशमुख, बाबासाहेब धाबेकर, गुलाबराव गावंडे व विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांचा समावेश आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सरळ सामना होईल अशी अटकळ असताना युसूफ पुंजाणी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या साथीने दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन भाजपचा विजय सुकर केला होता. नगर परिषद निवडणुकीतही युसूफ पुंजानी वंचित बहुजन आघाडीसोबत असल्याने कारंजा, मानोरा व मंगरूळपीर नगर परिषद वंचित बहुजन आघाडीकडे गेल्या होत्या. मात्र, वंचित बहुजन आघाडीने युसूफ पुंजाणी यांच्यासारखा जनाधार असणारा नेता गमावला.
सहा महिन्यांपूर्वी युसूफ पुंजाणी यांनी वंचितला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र, काँग्रेस साखरझोपेत असताना राष्ट्रवादीने काँग्रेसचा जनाधार असलेला मोहरा गळाला लावल्याने आता या मतदारसंघाच्या राजकीय गणिताची फेरमांडणी करावी लागणार आहे. भावी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एक्झिट घ्यावी लागणार आहे. सामना भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, असा होणार असला तरी तिरंगी लढतीवर दारोमदार असलेल्या भाजपला दुरंगी लढतीची तयारी करावी लागणार आहे.
नगर परिषद निवडणूक ठरणार निर्णायक
चार महिन्यांत जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे. मागील नगर परिषद निवडणुकीत युसूफ पुंजानी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दाखवून दिलेली मतांची टक्केवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात जाणार आहे. काँग्रेसेतर पक्षाची मतपेढी कायम असताना काँग्रेसला आता मुस्लिम मतांवर पाणी सोडावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.