खामगाव - गेल्या अनेक वर्षांपासून खामगाव जिल्हा करण्याची मागणी होत आहे. तसा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला असून अद्यापही याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र शासनाचे खामगाव जिल्ह्या होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असून गुरुवारी ता. ३ ऑक्टोबर रोजी खामगाव येथे एमएच ५६ या नोंदणी क्रमांकासह उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्याबाबत शासन निर्णय झाला आहे. त्यामुळे आता एम एच २८ नव्हे तर एम एच ५६ लागणार आहे.
खामगाव येथील वाहन नोंदणी संख्या, एकूण लोकसंख्या यांचा विचार करता स्वतंत्र उप प्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करणेबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याला आज मान्यता देण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार खामगाव, जि. बुलढाणा येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे MH 56 या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय सुरु करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.
बुलढाणा जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्यामुळे जिल्ह्याचे घाटावर व घाटाखाली असे दोन भाग विभागले गेले आहेत. घाटाखालील लोकांच्या सोयीचे होण्यासाठी खामगाव जिल्हा निर्मितीची मागणी अनेक वर्षांपासून होत आली आहे. प्रस्तावित खामगाव जिल्ह्यात मलकापूर, नांदुरा, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर खामगाव तालुक्यातील गावांचा समावेश राहणार आहे. तसेच नवीन लाखनवाडा तालुक्याची मागणी होत आहे.
खामगाव नवीन जिल्ह्याबाबत सरकारकडे प्रस्ताव देखिल पाठविण्यात आला आहे. याबाबत अनेक बड्या नेत्यांनी आश्वासने सुद्धा दिली आहेत. तर राज्याचे दिवंगत कृषी मंत्री स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर, खामगाव मतदार संघाचे आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर, काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे देखील खामगाव जिल्हा निर्मिती बाबत पाठपुरावा करत आले आहेत.
तर पत्रकार बांधवांसह अनेक संघटना, पक्ष, संस्थांनी आंदोलने देखील केली आहेत. जिल्हा निर्मिती बाबत अद्याप कोणतीही घोषणा झाली नसली तरी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मंजूर झाल्यामुळे जिल्हा निर्मितीच्या दृष्टीने हे एक आश्वासक पाऊल मानल्या जात आहे. तर या सोबतच अनेक प्रमूख कार्यालय या आधीच खामगाव शहरात असून प्रशासकीय दृष्टीने भव्य इमारत देखील आहे.
शासन निर्णयात काय आहे नमूद
शासन निर्णयानुसार खामगाव, जि. बुलढाणा येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे MH 56 या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय सुरु करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे. याबाबत शासनाच्या प्रचलित धोरणानुसार नवनिर्मित उप प्रादेशिक परिवहन अधिकारी खामगाव या कार्यालयासाठी आवश्यक पदे निर्माण करण्यात येतील, तुर्तास सदर कार्यालयासाठी विहीत मानांकनानुसार आवश्यक पदे इतर कार्यालयातून समायोजित करण्याची पुढील कार्यवाही परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी नियमानुसार करावी. सदरील नवीन कार्यालय सुरु करण्यासाठी शासकीय/खाजगी मालकीची जागा भाडे तत्वावर घेण्याची पुढील कार्यवाही परिवहन आयुक्तांनी तात्काळ करावी.
सदर नवनिर्मित कार्यालयासाठी १ इंटरसेप्टर वाहनास मंजूरी देण्यात येत आहे. सदर वाहन घेण्यापूर्वी वाहन आढावा समितीची मान्यता घेण्यात यावी. सदर कार्यालयासाठी देणारा अंदाजित आवर्ती खर्च व जनावर्ती खर्चाची तरतूद आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे करुन देण्यात येईल, याबाबतया प्रस्ताव परिवहन आयुक्तांनी शासनास सादर करावा. तोपर्यंत सदर खर्च उपलब्ध कार्यालयीन खर्चातून भागविण्यात यावा.
खामगाव येथे नवीन होणाऱ्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकरीता एमएच- ५६ (MH-56) हा कार्यालय नोंदणी क्रमांक देण्यात येत आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, खामगाव यांना सदर 'कार्यालयाचे प्रमुख' तसेच 'आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून मुंबई वित्तीय नियमावली, १९५९ व महाराष्ट्र नियम, १९६८ नियम १५ (३) मध्ये नमूद केलेल्या अधिकारांचा त्यांना वापर करता येईल.
मोटार वाहन कायदा व नियमातंर्गत नोंदणी प्राधिकारी, अनुज्ञप्ती प्राधिकारी तसेच महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम अंतर्गत 'कराधान प्राधिकारी म्हणून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना घोषित करण्यात येत असल्याचे शासन निर्णयात नमूद आहे.
आमदार ऍड आकाश फुंडकर यांनी विधानसभेत उठवला होता आवाज
खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार एडवोकेट आकाश फुंडकर यांनी खामगाव येथे आरटीओ कार्यालय होण्याबाबत विधानसभेत आवाज उचलून सरकारकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर आज शासनाने उपप्रादेशिक कार्यालयाला मंजूर दिल्यामुळे आकाश फुंडकर यांच्या मागणीला खऱ्या अर्थाने यश आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.