अकोला - ज्या भागात पावसाचे प्रमाण ५०० मिमीपर्यंत आहे, अशा भागात खरीप कांदा उत्पादन चांगले होते. गतवर्षी जिल्ह्यात ७०० मिमीपर्यंत पाऊस पडला होता. यंदाही भरपूर पावसाची शक्यता आहे. या वातावरणात योग्य व्यवस्थापन केले तर, हेक्टरी १५ टण कांदा उत्पादन घेता येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या संधिचा लाभ घेऊन व योग्य व्यवस्थापन करून खरीप कांदा लागवड करावी, असा सल्ला अकोला कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ प्रा.तुपकर यांनी दिला.
लागवड तंत्र
खरीप हंगामात १५ बाय १० सेमी अंतरावर कांदा रोपे लागवड करावी. ती अंगठ्याने न दाबता अंगठ्याजवळील पहिल्या बोटाबरोबर जमिनीत घुसवावी. रोप उपटल्यानंतर पानाचा १/३ भाग कापून मुळ पाण्यात धुवून घ्यावीत. मुळे कार्बेन्दाझीम १ ग्राम अथवा क्लोरोथालोनील २ ग्राम प्रतिलिटर पाण्यात १० ते १५ मिनिटे बुडवून लागवडीसाठी वापरावी.
तण व्यवस्थापन
कांद्यामध्ये गोल किवा बासालीन तणनाशकाचा चांगला उपयोग होतो. दोन्ही तननाशक तणांचे बी रुजण्यापूर्वी मारावी. रोपे लावण्यापूर्वी कोरड्या वाफ्यात १५ मिली गोल किवा बासालीन १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. फवारणीनंतर पाणी देऊन लागवड करावी.
लागवडीपूर्वी प्रक्रिया आवश्यक
महाराष्ट्रात खरीप, रांगडा, रब्बी व उन्हाळी कांदा लागवडीतून उत्पादन घेतले जाते. विदर्भात मॉन्सूनचा ७०० ते ७५० मिमी पाऊस पडतो. मात्र, जास्त पाऊस झाल्यास उगवण क्षमतेवर परिणाम होते. त्यामुळे रुंदवरंबा पद्धतीने व रोपांच्या मुळाशी राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र राजगुरूनगर यांच्या शिफारसीनुसार कारबोसल्फान २ मिली आणि कार्बेंडेझिन १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात द्रावणात प्रक्रिया करून लागवड करण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.
या कांदा वाणाची शिफारस
खरीप हंगामासाठी बसवंत-७८०, एन-५३, अग्रीफाउंड डार्क-रेड, अर्क कल्याण, भीमा रेड, भीमा शुभ्र इत्यादी वाण उपयुक्त आहेत. रबी हंगामातल्या जाती या काळात लावल्यास उत्पादन कमी होते व डेंगळे, जोड कांदे याचे प्रमाण जास्त निघते. बियाणे पेरणीपासून खरीप हंगामात ६-८ आठवड्यानी रोपे लागवडीस योग्य होतात.
रोपे लावण्यासाठी २०-२५ सेमी उंच, ०.८ ते ०.९ सेमी जाडीची रोपे स्थलांतर करण्यापूर्वी ७-८ दिवसाआधी पासून हळूहळू पाणी तोडावे म्हणजे रोपे काटक बनतात आणि पुनर्लागवडनंतर रोपे मरण्याचे प्रमाण अतिशय नगण्य असते. मात्र, रोप उपटण्यापूर्वी २४ तास आधी वाफ्यांना भरपूर पाणी द्यावे म्हणजे रोपे उपटताना मुळे तुटून मुळांना इजा होणार नाही. रांगडा कांद्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये बी पेरून रोपांची पुनर्लागवड ऑक्टोबरमध्ये किवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात केली जाते.
लागवड ते काढणी कालावधी
खरीप कांदा प्रामुख्याने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटकमध्ये घेतला जातो. महाराष्ट्रामध्ये कांद्याचे बी मे-जूनमध्ये रोपवाटिकेत पेरून जुलै-ऑगस्टमध्ये रोपांची लागवड केली जाते. कांदा काढणीसाठी, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तयार होतो.
खत व्यवस्थापन
प्रतिहेक्टरी २० ते २५ टन चांगले कुजलेले शेणखत वापरावे. कांदा रोपे लावल्यानंतर दोन महिन्यापर्यंत नत्राची गरज जास्त असते. नत्र विभागून २-३ टप्प्यात दिल्यास त्याचा चांगला फायदा होतो. कांदा पूर्ण वाढल्यानंतर नत्राची आवश्यकता नसते. खरीप हंगामासाठी हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद, ५० किलो पालाश देण्याची शिफारस आहे. खते देतांना निम्मे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी आणि राहिलेले नत्र दोन हफ्त्यात विभागून द्यावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.