मोरगाव (भाकरे) : दादा तू आताच बोलून घे... पुन्हा कॉल करू नको, कारण मी झोपल्यानंतर तुझा फोन उचलणार नाही...! जम्मू-काश्मीर मधील कुलगाम जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात वीरमरण प्राप्त झालेले जवान यांचा शेवटचा फोन त्यांचा मोठा भाऊ सचिन यांना आला होता, अशी माहिती जंजाळ कुटुंबातील एका व्यक्तीने दिली. तर पत्नी पल्लवी सोबत त्यांचे शेवटचे बोलणे झाले त्यावेळी त्या अकोला येथे होत्या.
मोरगाव भाकरे गावचे सुपूत्र प्रवीण (वय २४ ) जंजाळ हे जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे अतिरेकी हल्ल्यात शनिवारी सायंकाळी हुतात्मा झाले. २०१९ मध्ये ते सैन्य दलात भरती झाले होते. त्यांच्या हुतात्मा होण्याची बातमी समजताच मोरगाव भाकरे गावावर शोककळा पसरली.
जंजाळ हे दोन महार बटालियनमध्ये कार्यरत होते. त्यांनी शनिवारी दुपारी भाऊ सचिन जंजाळ यांना फोन केला होता. यावेळी त्यांनी घरगुती कामासाठी सचिनला ऑनलाईन पेमेंट देखील केल्याचे कुटुंबीय सांगतात. त्यांचे ते शेवटचे बोलणे ठरले.
दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास बोलणे झाल्यानंतर सचिन यांना आपला भाऊ शहीद झाल्याची बातमी समजली. यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्यानंतर रात्री त्यांना खात्री झाली. प्रवीण जंजाळ यांची पोस्टिंग मणिपूरमध्ये होती.
मात्र चार महिन्यांपूर्वी सैन्यदलाच्या राष्ट्रीय रायफलच्या (विशेष दस्ता) क्रमांक एकच्या तुकडीत कुलगाम जिल्ह्यात त्यांना पाठवण्यात आले होते. याच तुकडीचा सामना दहशतवाद्यांसोबत झाला. यात प्रवीण यांच्या डोक्याला गोळी लागल्याने त्यांना वीरमरण आल्याची माहिती समोर आली आहे. प्रवीण यांचे मोठे भाऊ सचिन यांच्याशिवाय कुटुंबातील इतरांना याबाबत उशीरापर्यंत माहिती कळू दिलेली नव्हती.
जम्मू-काश्मीरमधून रविवारी (ता. ७) रात्री शहीद जवानाचे पार्थिव नागपूर येथे येणार असल्याची माहिती सैनिक बोर्डाकडून प्राप्त झाली आहे. पार्थिवासोबत शहीद जवानाचे खंडारे नामक आतेभाऊ असल्याची माहिती आहे.
मोरगाव ते भौरद रस्त्यावर असलेल्या शासनाच्या जागेवर प्रवीण यांच्यावर सोमवारी (ता. ८) अंत्यसंस्कार होणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेत अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण केली आहे. सरपंच उमाताई माळी यांनी ही माहिती दिली आहे.
प्रवीण यांचा जन्म मोरगाव येथेच सामान्य कुटुंबात झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावात आणि माध्यमिक शिक्षण गायगाव येथील म. फुले विद्यालयात झाले. मागील वर्षी त्यांचे गायगाव येथील श्यामबाला उर्फ पल्लवी हिच्याशी लग्न झाले.
त्यांच्या अचानकपणे सोडून जाण्याने पत्नीसह आई, वडील आणि भावाला धक्काच बसला. या घटनेमुळे ग्रामस्थ आणि प्रवीण यांच्या मित्रांना देखील धक्का बसला आहे. प्रवीण मनमिळाऊ स्वभावाचा होता, अशी आठवण त्यांच्या मित्रांनी सांगितली. त्यांच्या पश्चात वडील प्रभाकर जंजाळ, आई शालूबाई, भाऊ सचिन, पत्नी श्यामबाला उर्फ पल्लवी असा परिवार आहे.
जेमतेम एक ते दोन हजार वस्तीच्या या गावात आजी-माजी सैनिकांची संख्या दोनशेहून अधीक आहे. सैन्यदलात शिपायापासून हवालदार, नायक, कॅप्टन पदापर्यंत बऱ्याच माजी सैनिकांनी देशसेवा केली. स्वातंत्र्य लढ्यापासून आजतागायत देशाच्या सीमेच्या रक्षणाकरिता लढणारे सैनिकांचे गाव म्हणजे मोरगाव अशी ओळख असलेले जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. सध्या शंभरच्या जवळपास येथील जवान भारतमातेचे रक्षण करीत आहेत. देशसेवेसाठी भारतीय सैन्यदलात भरती होण्याकरिता तरूणांचा ओढा कायम आहे.
शहीद प्रवीण यांनी आपल्या पत्नीला शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास व्हिडिओ कॉल केला होता. यावेळी त्यांनी तू नवीन ड्रेस घालून मला दाखव अशी आर्जव पतीने केली. पत्नीनेही नवीन ड्रेस घालून दाखवला. त्यानंतर पुन्हा पत्नी पल्लवीने कॉल केला तर मोबाईल स्विच ऑफ येत असल्याने तिने प्रवीणच्या मित्राला कॉल केला. समोरची बातमी ऐकून पत्नी क्षणार्धात तुटली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.