बुलडाणा : प्रेमीयुगुलाची विहिरीत बुडून आत्महत्या

युवक युवतीच्या प्रेमप्रकरणाचा करुण अंत झाला
couple commits suicide
couple commits suicide sakal
Updated on

मोताळा (जि. बुलडाणा) : एका प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (ता. २२) सकाळी सात वाजताच्या सुमारास नांदुरा तालुक्यातील गोसिंग शिवारात उघडकीस आली. मृतकांमध्ये शेख अलताफ शेख शकील (२२ रा. गोसिंग) व मोताळा तालुक्यातील तरोडानाथ येथील १७ वर्षीय युवतीचा समावेश आहे.

नांदुरा तालुक्यातील गोसिंग येथील शेख अलताफ शेख शकील (२२) आणि तरोडानाथ येथील संबंधित १७ वर्षीय अल्पवयीन युवती या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. दरम्यान, शेख अलताफ हा सोमवारी सकाळी शेतातून बकऱ्यांकरिता चारा घेऊन येतो, असे म्हणून दुचाकी घेऊन शेतात निघून गेला. त्याने शेतातील धुऱ्यावर दुचाकी उभी केली होती. मात्र तो घरी परत आला नाही. दरम्यान, नातेवाइकांनी त्याचा परिसरात शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. त्यामुळे अलताफचे वडील शेख शकील शेख गिलानी (५०) यांनी सोमवारी सायंकाळी बोराखेडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अलताफ बेपत्ता झाल्याची नोंद केली.

दरम्यान, अलताफचा मोठा भाऊ शेख इम्रान व सहकाऱ्यांनी मंगळवारी (ता.२२) सकाळी गोसिंग शिवारात अलताफचा शोध घेतला असता, वेरुळकर पटवारी यांच्या विहिरीच्या काठावर दोन मोबाईल व चष्मा दिसून आला. सदर वस्तू अलताफची असल्याची ओळख पटल्याने त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीत खाट टाकली व विहिरीत उतरून शोध घेतला असता, शेख अलताफ व संबंधित १७ वर्षीय अल्पवयीन युवती या दोघांचे मृतदेह मिळून आले.शेख अलताफ व संबंधित युवतीने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची खबर शेख गणी शेख इमाम (६५, रा. गोसिंग) यांनी बोराखेडी पोलिसांत दिली.

माहिती मिळताच बोराखेडीचे ठाणेदारांसह नापोकाँ विजय पैठणे, पोहेकाँ नंदकिशोर धांडे, पोहेकाँ सुपडासिंग चव्हाण, पोकाँ गणेश वाघ, पोकाँ अभिनंदन शिंदे, पोकाँ गणेश बरडे व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शेख गणी शेख इमाम (६५, रा. गोसिंग) यांच्या खबरीवरून बोराखेडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पीएसआय अशोक रोकडे करीत आहेत.

प्रेमप्रकरणाचा करुण अंत झाला

शेख अल्ताफ व संबंधित १७ वर्षीय युवतीच्या प्रेमप्रकरणाचा करुण अंत झाला आहे. मात्र या प्रेमीयुगुलाने आत्महत्या का केली, हे अद्याप कळू शकले नाही. याबाबत परिसरात विविध चर्चांना पेव फुटले आहे. दरम्यान, मृतकांचा शवविच्छेदन अहवाल व पोलिस तपासात काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.