अकोला : चार हजारांची लाच मागितल्याप्रकरणी अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील संतोष संपतराव निंबोळकर या मंडळ अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी संध्याकाळी अटक केली. शेती हक्क सोडण्याच्या अर्जासाठी अनुकूल अहवाल सादर करण्याच्या बदल्यात त्याने लाच मागितली होती.
लाच लुचपत विभागाचे पोलिस उपअधिक्षक मिलिंद बहाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष निंबोळकर यांनी सामाईक शेतीचे हक्क सोडण्याच्या अर्जावर तहसिलदारांकडे अनुकूल अहवाल सादर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली. त्यानुसार २ ऑगस्टरोजी लाच पडताळणीची कार्यवाही दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली.
त्यावेळी आरोपीने ४ हजार रुपयांची तडजोड करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले होते. मात्र, तक्रारदाराच्या हालचालीवर संशय आल्यामुळे आरोपीने लाच न स्वीकारता तक्रारदाराविरुद्ध पोलीस स्टेशन अकोट शहर येथे फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार आणि पडताळणी कार्यवाहीतून समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे संतोष निंबोळकर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधिक्षक मारूती जगताप, अपर पोलीस अधिक्षक सच्छिंद्र शिंदे आणि अपर पोलीस अधिक्षक अनिल पवार, पोलिस उपअधिक्षक मिलिंद बहाकर अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सावंत, पोलीस अंमलदार प्रदीप गावंडे, डिगांबर जाधव, श्रीकृष्ण पळसपगार, अभय बावस्कर आणि संदीप ताले यांनीही या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
तक्रारीसाठी पुढे याः मिलिंद बहाकर
जिल्हयात कोणत्याही ठिकाणी कोणत्याही शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास तक्रारीसाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे. लाचलुचपत विभाग आपल्या सोबत आहे. खालील क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा मिलींद बहाकर, पोलीस उपअधिक्षक, मोबाईल: ९१५८८२२६७६, सचिन सावंत, पोलीस निरीक्षक, मोबाईल: ८८५५८३०८३०, कार्यालय फोन: ०७२४-२४१५३७० टोल-फ्री क्रमांक: १०६४ यावर संपर्क साधावा असे आवाहन लाच लुचपत विभागाचे पोलिस उपअधिक्षक मिलिंद बहाकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.