रिसोड : नवसाला पावणारी ग्रामदेवता म्हणून वाशीम जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या श्रीपिंगलाक्षी देवी संस्थानमध्ये आजपासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात होत आहे. २६ सप्टेंबरला सुरू होणाऱ्या नवरात्र महोत्सवाची ५ ऑक्टोबर रोजी सांगता होणार आहे. नवरात्राचे दहा दिवस येथे भक्तांची मांदियाळी असते. राज्याच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनास येतात. शेंदुराचा मुखवटा असलेली श्रीपिंगलाक्षी देवी नवसाला पावणारी असल्याची भक्तांची श्रद्धा आहे.
रिसोड शहरापासून दक्षिणेला तीन किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य अशा १०० एकर तलावाच्या काठी श्रीपिंगलाक्षी देवीचे पुरातन मंदिर असून मंदिराच्या सभोवती पुरातन वटवृक्ष आहेत. ऋषीमुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व असून सध्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे.
सकाळी चार वाजतापासून भाविक दर्शनासाठी येतात. सकाळी पायी दर्शनाला येण्याची इथे प्रथा असून सकाळची काकड आरती व संध्याकाळची शेजारती तसेच नवरात्राच्या नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते.
मंदिर परिसरामध्ये पूजेच्या साहित्याची व प्रसादाची भरपूर दुकाने लागतात व या परिसराला यात्रेचे स्वरूप असते. मंदिर परिसरात वनभोजनाची प्रथा असून नागरिक या ठिकाणी नवरात्रामध्ये वनभोजनाचा आनंद घेतात. भाविकांच्या सोयीसाठी रिसोड नगरपरिषद शहरापासून ते मंदिरापर्यंत एलईडी लाईट लावते व स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने विविध सोयी सवलती देते. सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याची डागडुजी करते. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने रिसोड पोलिसांचा चोख बंदोबस्त व शहरापासून मंदिरापर्यंत पोलिसांची गस्त असते.
वाघमारे परिवाराकडे मंदिराच्या पूजेची जबाबदारी असून बगडिया परिवाराकडे वंशम परंपरेने मंदिराचे व्यवस्थापन आहे. मंदिर परिसरात भाविकांच्या सोयी सवलतीसाठी श्री पिंगलाक्षी देवी संस्थान कार्यरत असते. सकाळी मंदिर परिसरामध्ये भक्तांसाठी चहा फराळ व प्रसादाचे विविध संघटनाद्वारे वाटप होत असते. नवरात्र महोत्सव यशस्वी करण्यासाठी शहरातील विविध संघटना नागरिक व भाविक भक्तांचा मोठा सहभाग असतो. मालेगाव ः मालेगाव तालुक्यातील नागरतास येथील जगदंबादेवीची मूर्ती शेत नांगराताना नांगराच्या तासामध्ये मिळालेली आहे. ती स्वयंभू आहे. नागपूर-जालना-मुंबई राज्यमहामार्गालगत मालेगाव शहारापासून २ कि मी अंतारावर हे मंदिर आहे. ३५० वर्षापुर्वी शेत नांगरत असताना दशरूजी घुमशे यांना देवीची मूर्ती मिळाली.
त्यांनी गावाच्या इशान्येला मंदिर बांधून मूर्तूची स्थापना केली. श्री क्षेत्र तुळजापुर येथून श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती व श्रीक्षेत्र माहुर येथून श्रीरेणुकादेवीची मूर्ती आणल्या.मंदिरे बांधून मुर्तींची स्थापना केली . ही मंदिरे पूर्वाभिमुख आहेत. मंदिरासमोर दीपमाळ व यज्ञमंडप आहे. मंदिरालगत आसरामाता, श्री गणेश, श्री हनुमान, श्री ईसामाता यांची मंदिरे आहेत. मंदिरालगत विहीर आहे. संस्थान परिसरात तत्कालीन आमदार विजय जाधव तसेच विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या निधिमधून बांधण्यात आलेली सभागृहे आहेत.
सुधाकर देवळे यानी पं.स. सदस्य असताना सुचविलेले व १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून बांधलेले शॉपिंग कॉम्पलेक्स येथे आहे. संस्थान परिसरात आकर्षक बगीचा तयार करण्यात आला आहे. स्व.आमदार सुभाषराव झनक यांच्या स्थानिक विकास निधीमधून येथे स्वच्छ्तागृह बांधण्यात आलेले आहे. मंदिरालगत काटेपूर्णा नदी आहे. संस्थानवर शारदीय व चैत्र नवरात्र महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये देवीभागवत, श्रीहरिकीर्तन, देवीची जन्मकथा यांचा समावेश असतो.
श्री विठ्ठल रुख्मिणीचे भव्य मंदिर
संस्थान परिसरात श्री विठ्ठल रुख्मिणीचे भव्य मंदिर बांधूूून पूर्ण झाले आहे. त्यासमोर सभामंडप बांधण्यात येणार. या मंदिरात मूर्तीची स्थापना केल्यानंतर भाविकांना श्रीजगदंबे सोबत श्री विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन घेता येईल असे ह .भ.प.सुधाकर देवळे महाराज म्हणाले. नागरतास येथून श्री नाथनंगे महाराज संस्थान २ की मी अंतरावर आहे. जैनांची काशी शिरपुर जैन १० की मी अंतरावर, जउळका रेल्वे स्टेशन ७ की मी तर वाशीम हे जिल्ह्याचे ठिकाण २२ की मी अंतरावर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.