अकोला : दोन-तीन दिवस पाऊस, दोन-तीन दिवस ऊन अन् बाकी दिवस ढगाळ, कोंदट वातावरण, असा अनुभव सध्या प्रत्येक आठवडात येत आहे. वातावरणातील अशा बदलामुळे सोयाबीन, मूग, उडीद, कपाशीसह सर्वच खरीप पिकांवर किडी, रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. संरक्षणात्मक उपाय म्हणून निंबोळी अर्काच्या फवारणीचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात दोन दिवस हजेरी लावल्यानंतर मॉन्सूनने दीर्घ दांडी मारली. त्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने काही प्रमाणात हजेरी लावली. परंतु, १० ते १५ दिवसांचा खंड पडत गेल्याने पीक वाढीसह पक्वतेवरही विपरीत परिणाम दिसून येत आहे. काही ठिकाणी मूग, उडीद, सोयाबीन आणि कापूस पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे तर, काही भागात अजूनही पिकांची अपेक्षित वाढ झालेली नाही.
तापमानात वाढ व जमिनीत ओल, कधी ढगाळ तर कधी उष्ण वातावरण, याचा प्रकाशसंश्लेषन क्रियेवर परिणाम होत आहे. त्यामुळे अन्नद्रव्ये निर्मितीमध्ये घट, पर्यायाने पिकांची वाढ खुंटत आहे. शिवाय पिके कमजोर पडल्याने रोगांचा तसेच वातावरण बदलामुळे किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. संरक्षणात्मक उपाय म्हणून निंबोळी अर्काच्या फवारणीचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
या किडींचा दिसतोय प्रादुर्भाव
सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी खरिपातील या प्रमुख पिकांवर फुलकिडे, तुडतुडे, खोंडमाशीमावा आणि पांढरी माशी या रस शोषण करणाऱ्या व रोगांच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या किडींमुळे तसेच बियाण्यातील दोषांमुळे काही भागात मुगावर लिफ क्रिनकल तसेच सोयाबीन पिकावर पिवळा व हिरवा मोझाईक व्हायरसचा तर कपाशीवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.
सोयाबीन, मुगावरील रस शोषक किडींचे नियंत्रण
सोयाबीन व मूग पिकावर मावा, पांढरी माशी व फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. काही ठिकाणी रस शोषण करणाऱ्या किडींच्या अधिक प्रादुर्भावामुळे मुगावर लिफ क्रिनकल तसेच सोयाबीन पिकावर पिवळा मोझाईक व्हायरसचा प्रसार झालेला आढळून आला आहे. या विषाणूंच्या प्रसाराला कारणीभूत मावा, पांढरी माशी व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी रामबाण उपाय म्हणजे एकरी सात पिवळे व चार निळे चिकट सापळे पिकाच्यावर लावावे. मावा, पांढरी माशी व फुलकिडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी फिप्रोनिल ५ टक्के एस.सी.२० मिली किंवा फ्लोनीकामाईड ५० डब्ल्यू.जी. ३ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड १७.८० टक्के एस.एल. २.५ मिली किंवा थायोमेथोक्झाम २५ टक्के डब्ल्यू.जी. ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरज वाटल्यास पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी करावी व फवारणी करताना कीटकनाशके आलटून-पालटून फवारणीचा सल्ला डॉ. पंजाबरावे देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे यांनी दिला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.