साखरखेर्डा : येथील ३३ के. व्ही. वीज वितरण केंद्रांतून दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. महावितरणचे अधिकारी विद्युत पुरवठा का बंद आहे, याबाबत उत्तर देत नसून विद्युत पुरवठा केव्हा सुरळीत होईल, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
दरम्यान, शुक्रवारी बाजार असल्याने खंडित वीज पुरवठ्याचा व्यवसायावरही परिणाम झाला आहे. केवळ साखरखेर्डाच नव्हे तर पिंपळगाव काळे, हिवरा आश्रम हे दोन्ही उपकेंद्र बंद आहेत. त्यामुळे ६५ गावे अंधारात आहेत.
साखरखेर्डा विद्युत उपकेंद्राशी २४ गावे संलग्न आहेत. ११ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाला. नेहमीप्रमाणे वीजपुरवठा खंडित होत असल्याने ३० मिनिटांत वीज येईल, असे नागरिकांना वाटत होते.
परंतु रात्रभर वीजपुरवठा खंडितच होता. उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता मेहकर येथून पुरवठा बंद असल्याचे सांगितले. वरिष्ठ अधिकारी यांना सरपंच सुनील जगताप यांनी संपर्क साधला असता त्यांनी तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले.
१२ जुलै रोजी साडेअकरा वाजता वीजपुरवठा सुरू झाला आणि अवघ्या दोन तासांत पुन्हा बंद झाला. शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. सकाळी सहा वाजता शेतावर जावे लागते. सायंकाळी शेतातून घरी आले तर वीज गायब असते. पाणी भरावे कसे, दळण चक्कीत अडकले, भाकरी कशी करावी, असा प्रश्न पडला आहे.
विद्युत पुरवठा सुरळीत केव्हा होणार याबाबत येथील नागरिकांनी संबंधितांना विचारणा करण्यासाठी फोन केले. फोन बंद येत असल्याने नागरिक आणखी संतप्त झाले. ११ जुलै रोजी दुपारी ५ वाजता गायब झालेला विद्युत पुरवठा १२ चे दुपारी ५.४५ होऊनही सुरळीत झाला नाही.
संपूर्ण रात्र वीज पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे येथील व परिसरातील समस्त नागरिकांना पाणीटंचाई, डासांचा उपद्रव व उकाडा सहन करावा लागला. मात्र वीज कंपनी ग्राहकांच्या समस्येबाबत बेफिकीर असल्याचे आढळून आले.
मेहकर ते साखरखेर्डा वीज वाहक तारा व खांब सुमारे ५० वर्षांपासून उभे आहेत. तारा जीर्ण अवस्थेत असून खांबसुध्दा जीर्ण झाले आहेत. वादळवाऱ्यात तारा तुटुन मेहकर ते साखरखेर्डा या लाईनवर सातत्याने बिघाड होतो. याबाबत अधिकारी तथा पदाधिकारी यांनी ग्राहकांना वारंवार तक्रारी केल्या. मात्र सुधारणा करण्यासाठी कोणतेही पाऊल आत्तापर्यंत उचलले न गेल्याने समस्या कायम असून जनता त्रस्त आहे.
महावितरणचे कर्मचारी काम करीत आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत होईल.
-हिरालाल जांभूळकर, उपअभियंता, सिंदखेडराजा
साखरखेर्डा, पिंपळगाव काळे, हिवरा आश्रम येथील ३३ के. व्ही. उपकेंद्रातील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. तो सुरळीत झाला नाही तर सोमवारी १५ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने साखरखेर्डा उपकेंद्रावर डफडे बजाओ मोर्चा काढण्यात येईल.
-तेजराव देशमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.