अकोट (जि. अकोला) - अकोट तालुका सहकारी सुतगिरणी अवसायनात निघाली आहे. त्यामुळे विस्थापित झालेल्या कामगारांनी न्याय हक्कासाठी आंदोलन सुरू केले. मात्र,त्याचा दखल घेतली जात नसल्याने चार कामगारांनी मंगळवारी थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाबाबत स्थानिक प्रशासनाने हात वर केल्याने रात्री उशिरापर्यंत कामगार पाण्याच्या टाकीवरच बसून होते, तर समर्थकांनी परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले.
अकोट तालुका सहकारी सूतगिरणी संस्था सन २००७ साली महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेने ताब्यात घेतली. त्यानंतर २०१० साली ही संस्था अवसायनात काढली. संस्थेतील थकीत वसुली मिळणेकरिता बँकेने संस्था भाडेपट्ट्यावर अथवा मालकी हक्काने देण्याचा प्रयत्न सुरू केला.
याच दरम्यान संस्था बंद पडल्याने बेरोजगार झालेल्या कामगारांनी आपले घेणे मिळणेकरिता विविध मार्गाने लढा सुरू केला. त्यांनी कामगार न्यायालय, उच्च न्यायालय येथेही दावे दाखल केले. त्या लढ्यात कामगारांची सरशी झाली. न्यायालयाने सर्व बाजू तपासल्या आणि सूतगिरणीकडून कामगारांना प्रॉव्हिडंट फंड ५३ लाख ६६ हजार २९८ रुपये तर कामगार वेतन १४ कोटी ८५ लाख, असे एकूण १५ कोटी ३८ लाख ६६ हजार २९८ रुपये घेणे असल्याचा निर्वाळा दिला.
त्यावर आपले हे घेणे वसूल करणेकरिता कामगारांनी बरेचदा मोर्चेही काढले. या दरम्यान बँकेने ५ जानेवारी २०२२ रोजी २४ वी जाहीर सूचना प्रसिद्ध केली. त्याला प्रतिसाद म्हणून बँकेकडे दोन निविदा प्राप्त झाल्या. त्यातील सर्वाधिक दराची निविदा सौ. राधा दीपक मंत्री अमरावती यांचे नावे होती.
शासनाची ६१ लाखांची विविध देणी व कामगारांची १५ कोटी ३८ लाख ६६ हजार २९८ रुपयांची विविध देणी फेडण्याची हमी घेऊन सौ. मंत्री यांनी ही संस्था ११ कोटी ६७ लाख ११ हजार १११ रुपयांना खरेदी केली. सौ. राधा मंत्री यांचे नावे फेरफार व सातबारा नोंद घेण्यात आली. ही नोंद घेण्यापूर्वी खरेदीदारांनी शासनाची सर्व देणी चुकती केली. परंतु प्रथम प्राधान्याने देणे असणारे कामगारांचे देणे मात्र बाकी ठेवले. कामगारांचे देणे देण्यासंदर्भात कुणीही पहिलं पाऊल उचलण्यास तयार नाही.
परिणामी घामाचा आणि हक्काच्या रकमेसाठी कामगार त्यापासून अद्यापही वंचितच राहिले आहेत. परिणामी कामगारांनी १ मे रोजी जल आंदोलन व १७ नोव्हेंबर रोजी आत्मदहान आंदोलनाचा प्रयत्न केला. परंतु, प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे कामगारांनी टोकाची भूमिका घेत पाण्याच्या टाकीवर चढून कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे.
तहसीलदारांनी हात केले वर
सुतगिरणीच्या कामगारांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. त्याबाबतची माहिती अकोट तहसीलदारांना देण्यात आली. मात्र, त्यांनी याबाबत माझ्या अधिकारात काहीही नसल्याने वरिष्ठ निर्णय घेतील, असे सांगून हात वर केले.
मागण्यापूर्ण होईपर्यंत टाकीवरच मुक्काम
सुतगिरणी कामगारांच्या न्याय मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरच मुक्काम करण्याचा निर्धार आंदोलक कामगारांचे प्रतिनिधी किशोर भगत, मुकुंद खनके, राजकुमार मेंढे, शिवदास खराटे यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.