Shravan somvar 2022 : सूर्यमुखी शिवलिंगामुळे आगळा ठरणारा ‘लक्षेश्वर’!

ब्रम्हा मंदिर आणि साडेअकरा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची श्रावणात गर्दी
Shravan somvar 2022 Lakseshwar stands out due to  Surya Mukhi Shivlinga
Shravan somvar 2022 Lakseshwar stands out due to Surya Mukhi Shivlinga
Updated on

मूर्तिजापूर - सूर्यमुखी शिवलिंग, साडेअकरा ज्योतिर्लिंगे, पुष्करनंतर भारतातील दुसरे ब्रम्हदेवाचे मंदिर आणि लक्ष्मणाच्या तपश्चर्येनंतर प्रसन्न होऊन महादेवाने दिलेले वरदान! अशा एक ना अनेक पौराणिक संदर्भांमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरलेले आणि मनोरथ पूर्ण होत असल्याची भाविकांच्या मनात ओतप्रोत श्रद्धा असलेले मूर्तिजापूर तालुक्यातील ‘श्री क्षेत्र लाखपुरीचे लक्षेश्वर संस्थान’ महाशिवरात्रीला भाविकांच्या गर्दीने फुलून जाते. यंदा सलग तिसऱ्या वर्षी यात्रा भरणार नाही, मात्र शिवभक्तांना दर्शनासाठी मंदिर दिवसभर खुले राहील.

महाशिवरात्रीच्या पर्वावर पंचक्रोषीतील भाविकांची पावले आपसूकच लक्षेश्वराच्या दर्शनाच्या ओढीने लाखपुरीची वाट चालू लागतात. महाशिवरात्री यात्रा महोत्सवाने परिसर दुमदूमतो. दर्यापूर व मूर्तिजापूर तालुक्यातील शिवभक्त दर्शनाचा लाभ घेतात. मूर्तिजापूर ते दर्यापूर रस्त्यावर पयोष्णी (पूर्णा नदी)च्या काठावर वसलेले हे तीर्थक्षेत्र पुरातन आहे. येथील सूर्यमूखी शिवलिंग दूर्मिळ मानल्या जाते, मात्र या तीर्थक्षेत्राचे वेगळेपण व माहात्म्य तेथील सूर्यमूखी शिवलिंगात आहे.

शिवाय काशीला बारा ज्योतिर्लिंगांमुळे जे अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे, ते महत्त्व या तीर्थक्षेत्राला प्राप्त होण्यात एक अडसर आला. घडले असे, की या तीर्थक्षेत्री प्राचिन काळी बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना करण्याची विधी सुरू आसतांना गर्दभ ओरडले व विधी साडेअकरावर थांबून अर्धकाशीचे महत्त्व या तीर्थक्षेत्राला प्राप्त झाले. श्रावणात, महाशिवरात्रीच्या पर्वावर आणि सोमवती आमावस्येला या तीर्थक्षेत्री शिवभक्तांची प्रचंड गर्दी असते. पोलिस बंदोबस्त ठेवावा लागतो. श्रावणात पहिल्या सप्ताहात अखंडपणे टाळ मृदंगाच्या गजरात शिव आराधना चालते. पावसाने दडी मारली असेल, तर शिवलिंगावर पयोष्णीच्या जलाचा अभिषेक केला जातो. या जलाचा लोट पयोष्णीत पोचताच मेघगर्जनेसह जलधारा बरसण्याची अनुभूती ग्रामस्थांनी घेतली आहे.

अशी आहे मंदिराची आख्यायिका

लक्षेश्वराच्या या मंदिराचा पौराणिक उल्लेख चमत्कारिक आहे. त्रेतायुगात प्रभू श्रीरामाचे लव आणि कुश या आपल्या पुत्रद्वयांसोबत नकळत युद्ध झाले. ‘पित्यासोबत तुम्ही युद्ध केल्यामुळे तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावे लागेल’, या शब्दात महर्षी नारदांनी दोघा भावंडांना सूचित केले. पवित्र तीर्थस्थळाच्या शोधात लव-कुश पयोष्णी तिरावरील एका टेकडीवर पोचले. तेथे प्रगाट झालेल्या महादेवाशी संवाद सुरू असतांना लक्ष्मण तिथे पोचले. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन, ‘आपण जिथे आहोत, त्या स्थळाला श्री क्षेत्र लक्षेश्वर संबोधण्यात येईल, असे वरदान महादेवाने दिले. तेथे लक्ष्मणाने स्वहस्ते शिवलिंग स्थापन केले, तेच हे सूर्यमूखी शिवलिंग ! आजचे हेमाडपंती पद्धतीचे लक्षेश्वर मंदिर त्या पौराणिक उल्लेखाची साक्ष देते.

मंदिराचा होऊ शकतो कायापालट

वर्षभरातील तीन उत्सवांना लाखो शिवभक्त हजेरी लावतात. राजूभाऊ दहापूतेंसह विश्वस्त मंडळ त्यांना सुविधा पुरविण्याचा लोकसहभागातून प्रयत्न करतात. या तीर्थक्षेत्राचा शासन दरबारी दर्जा ‘क’ असल्याने निधी मिळण्यासंदर्भात मर्यादा येतात. तो उंचावून धार्मिक पर्यटन स्थळाचा ‘ब’ दर्जा या तीर्थक्षेत्राला मिळावा, यासाठी विश्वस्तमंडळ शासनाचे उंबरठे झिजवित आहेत. ज्या अकोला जिल्ह्यात हे तीर्थक्षेत्र आहे, त्या जिल्ह्यातील सात आमदारांनी मनावर घेतल्यास या तीर्थक्षेत्राचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही, एवढे मात्र निश्चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.