Soybean Rate : सोयाबीनचे दर हमी भावापेक्षाही खाली;खरीप हंगाम तोंडावर, सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत

मान्सून उंबरठ्यावर दाखल झाला असून लवकरच खरीप हंगामाला सुरवात होणार आहे. सोयाबीनचे भाव मात्र हमी भावापेक्षाही कमी आहेत. परिणामी सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बियाणाचे भाव मात्र दीडपटीने वाढले आहेत. मागील तीन-चार दशकांपासून सोयाबीन हे शेतकऱ्यांचे मुख्य पीक झाले आहे.
Soybean Rate
Soybean Rate sakal
Updated on

रिसोड : मान्सून उंबरठ्यावर दाखल झाला असून लवकरच खरीप हंगामाला सुरवात होणार आहे. सोयाबीनचे भाव मात्र हमी भावापेक्षाही कमी आहेत. परिणामी सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बियाणाचे भाव मात्र दीडपटीने वाढले आहेत. मागील तीन-चार दशकांपासून सोयाबीन हे शेतकऱ्यांचे मुख्य पीक झाले आहे. कापूस या नगदी पिकाला फाटा देत शेतकरी सोयाबीन या पिकाकडे वळला आहे, परंतु यावर्षी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीनची भाव वाढ होत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे तसेच यावर्षी समाधानकारक पाऊस होणार असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज असल्यामुळे सोयाबीनचे भाव वाढण्याची आशा धुसर झाली आहे. मिळेल त्या भावात शेतकरी सोयाबीनची विक्री करत आहे. त्यामुळे बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढली आहे. येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनला ४५०० पर्यंत भाव मिळत आहे. हा भाव हमीभावापेक्षाही कमी असून उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

गतवर्षी सोयाबीन बाजारपेठेत दाखल होताच पाच हजाराच्या पुढे भाव मिळाला होता. त्यानंतर आता जवळपास आठ ते दहा महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा कमीच आहेत. खरीप हंगाम तोंडावर आला असल्यामुळे शेतकऱ्यांना पैशाची जुळवाजुळव करावी लागत आहे. सोयाबीनला मिळणाऱ्या भावातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. भाव वाढीची आशा धुसर झाल्यामुळे तसेच खरीपासाठी पैसा आवश्यक असल्यामुळे नाईलाजाने शेतकरी सोयाबीनची विक्री करत आहेत. परिणामी बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढली आहे.

हमीभाव कायदा कुचकामी

सरकारने शेतमालाच्या आधारभूत किमतीचा हमीभाव कायदा केला आहे, मात्र सोयाबीन हमीभावापेक्षाही कमी दराने विकले जात आहे. केंद्र सरकारकारच्या आयात धोरणाने सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. हमीभाव देण्यासाठी सरकारने नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.

सोयाबीनला आजही ४५०० पर्यंत भाव

दहा वर्षांपूर्वी सोयाबीनला चार हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. तब्बल दहा वर्षापासून खते बी बियाणे कीटकनाशके तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये दुपटीपेक्षाही जास्त वाढ झाली आहे, मात्र सोयाबीनला आजही ४५०० पर्यंत भाव मिळत आहे. गतवर्षीच्या हंगामात अतिवृष्टी येल्लो मोझ्याक इत्यादी कारणामुळे सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. उत्पादन कमी व भावही मिळत नसल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे. बियाणे कंपन्यांनी मात्र बियाण्याचे भाव दीडपटीने वाढवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.