अकोट : स्थानिक आगाराचे चालक अशोक अंबळकार यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने १४ जानेवारी रोजी रात्री निधन झाले. कामावर रुजू होण्यासाठी वरिष्ठ अधिकारी दबाव आणत असल्याचा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.
याबाबत दुखवट्यात सहभागी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने चक्क स्मशानभूमीतच अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकडे यांना निवेदन देण्यात आले. राज्य परिवन महामंडळाचे (Maharashtra State Road Transport Corporation) राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी गत दोन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यभर कामबंद आंदोलन चालू आहे.
शासन निलंबनाची कारवाई करणार नाही, कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे असे, आवाहन केल्यानंतर अकोट आगाराचे दोन कर्मचारी ११ जानेवारी रोजी कामावर हजरही झाले होते. परंतु, काही कर्मचारी जोवर विलीनीकरण होणार नाही तोवर कामावर न येण्याचा निर्णय घेतला होता. अशातच पालक अधिकारी, आगार व्यवस्थापक पर्यवेक्षकीय कर्मचारी हे मानसिक दबावात असलेल्या कर्मचाऱ्यांना घरी जाऊन आणि तेथील सरपंच, पोलिस पाटील, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींकडे जाऊन त्यांच्या मनात एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत गैरसमज पसरवत एक प्रकारे समाजात कर्मचाऱ्यांची बदनामी करीत असल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे.
यासर्व प्रकारामुळे कर्मचाऱ्यांवर मानसिक व शारीरिक दडपण निर्माण होत असल्यामुळे शुक्रवारी चालक अशोक अंबडकर यांचे मानसिक दडपणामुळे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. अगोदर आत्महत्या प्रवृत्तीच्या मानसिकतेत असलेल्या कर्मचाऱ्यांची मानसिकता आणखीन खालावत असल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे.
यापुढे आणखी कर्मचाऱ्यांनी असे कृत्य केल्यास किंवा त्यांच्या दबावामुळे एखाद्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यास सर्वस्वी जबाबदारी राज्य परिवहन प्रशासन व दडपशाही करणारे अधिकारी, पर्यवेक्षक कर्मचारी यांची राहणार असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.
'कामावर रुजू होण्यासाठी कुठलाही कर्मचाऱ्यांवर दबाव आणला नाही. स्वइच्छेने जे कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार झाले होते त्यांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्या कर्तव्यावर पाठवण्यात आले. कामावर हजर होण्यासाठी कुठलीही कर्मचाऱ्याला वैयक्तिक फोन अकोट आगाराच्या वतीने करण्यात आला नाही.'
-सुनील भालतीलक, आगार प्रमुख, अकोट.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.