Summer Heat : ४५ डिग्री तापमानातही बियाणे खरेदीसाठी रांगा; सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी

४५ अंश सेल्सियस तापमानात शेतकरी उन्हाचे चटके खात बियाण्यांसाठी रांगेत लागल्याचे दिसून आले.
seeds purchasing crowd farmer line
seeds purchasing crowd farmer linesakal
Updated on

अकोला - वाढत्या उष्णतेचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यात ३१ मेपर्यंत कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहे. उन्हापासून नागरिकांचे रक्षण व्हावे यासाठी सदर उपाययोजना लागू करण्यात आल्या असल्या तरी रविवारी (ता. २६) मात्र या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे शहरातील कृषी सेवा केंद्रांबाहेर उल्लंघन होताना दिसून आले.

४५ अंश सेल्सियस तापमानात शेतकरी उन्हाचे चटके खात बियाण्यांसाठी रांगेत लागल्याचे दिसून आले. तीव्र उन्हामुळे थकवा आल्याने काही शेतकऱ्यांना चक्कर आल्याचा प्रकार सुद्धा निदर्शनास आला. कृषी सेवा केंद्राजवळ गडबड होऊ नये यासाठी पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त लावण्यात आला होता.

यंदा हवामान विभागाने पावसाचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये पावसाळ्यात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला असून जूनच्या पंधरवड्यात चांगला पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना पेरणी करता येणार आहे. यंदा सोयाबीननंतर कपाशीचा पेरा जिल्ह्यात वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त असून कपाशीची लागवड १ लाख ३५ हजार हेक्टरवर होण्याचा अंदाज आहे.

त्यासाठी खासगी कंपनीचे तीन हजार ३८८ पॅकेट्‍स/क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दरम्यान लवकरच मॉन्सूनचे आगमन होणार असल्याने शेतकऱ्यांनी मात्र आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यानुसार कृषी केंद्रावर पसंतीचे बियाणे घेण्यासाठी शेतकरी पहाटे पासूनच रांगा लावत आहेत. परंतु सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

त्यासोबतच उन्हात काम करणाऱ्यांसाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सूचना सुद्धा जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. परंतु त्यानंतर सुद्धा रविवारी (ता. २६) शहरातील काही कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. प्रखर उन्हात शेतकऱ्यांची पिण्याच्या पाण्याशिवाय बियाणे खरेदी करण्यासाठी लगबग दिसून आली.

केंद्र उघडण्यास विलंब

२६ मे रोजी सकाळी ६ वाजतापासून अनेक कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. सकाळी १० व ११ वाजतानंतर उन्हाचा कडाका वाढला तरी अनेक कृषी केंद्र उघडली नाही. त्यामुळे सम्राट अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विजय आठवले यांनी कृषी केंद्राकडे धाव घेत केंद्र उघडण्यास दिरंगाई का होत आहे, असे म्हणत संचालकांना धारेवर धरले. शहरात शेकडो शेतकरी कडक उन्हात रांगेत उभे असल्यानंतर सुद्धा त्यांच्यासाठी काही केंद्रांवर मंडप सुद्धा उपलब्ध नव्हता.

शेतकऱ्यांमध्ये रोष; उपाययोजना शून्य

बियाण्यांसाठी युवा शेतकऱ्यांसह वृद्ध शेतकरी देखील रांगेमध्ये उभे असल्याचे दिसून आले. काही शेतकऱ्यांना थकवा जाणवल्याने ते रांगेत खाली बसल्याचे यावेळी निदर्शनास आले. इथे उन्हापासून बचाव म्हणून शेतकऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारचा मंडप उभारण्यात आला नव्हता. पहाटे ६ वाजतापासून बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागले. परंतु तीव्र वेदना सहन केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती केवळ दोन किंवा तीन पॅकेटच बियाणे देण्यात आले.

अजित बियाण्यांसाठी कसरत

कापसाचे बियाणे घेण्यासाठी रविवारी (ता. २६) भर उन्हात शेतकऱ्यांच्या टिळक रोडवरील कृषी सेवा केंद्रा समोर मोठ्या रांगा लागल्या. कपाशीचे अजित १५५ बियाणे मिळावे यासाठीच शेतकऱ्यांची जिवाची कसरत दिसून आली. कृषी केंद्रांसमोर शेतकरी सकाळपासून शेतकरी रांगेत उभे राहिल्याचे त्यांचे प्रचंड हाल झाले. तीव्र ऊन आणि पाण्याविना शेतकऱ्यांची बियाण्यासाठी जिवघेणी कसरत दिसून आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.