अकोला : एकेकाळी महाराष्ट्रातील आणि त्यातही विदर्भातील प्रमुख पीक म्हणून ज्वारीची ओळख होती. मात्र गेल्या काही दशकांपासून ज्वारीला असलेली प्रमुख पिकाची ओळख तर सोडाच, या पिकाचे अस्तित्वही धूसर झाले आहे. परंतु, अकोल्यातील काही शेतकऱ्यांनी उन्हाळी ज्वारीची पेरणी करत पुन्हा एकदा ज्वारीच्या पिकाला उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे.
अधिक उत्पादन मिळविण्याच्या कयासापोटी रसायनयुक्त शेतीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत गेले आणि त्याचा परिणाम मानवाला आता विविध शारीरिक समस्यांच्या माध्यमांतून चुकवावा लागत आहेत. शारीरिक समस्या, आजारांचे मुळ पोट आणि पचनक्रिया समजली जाते आणि त्यासाठी आपण घेत असलेला आहार महत्त्वाची भूमीका बजावतो. त्यामुळे आता डॉक्टर तसेच आहारतज्ज्ञ हलका व पचनीय आहार घेण्याचा सल्ला सर्वांना देत असतात. या सल्लामध्ये सर्वप्रथम येणारे खाद्य म्हणजे ‘ज्वारी’; त्यामुळेच आता अनेकांनी त्यांच्या दैनंदिन भोजनात ज्वारीच्या पदार्थांना प्रामुख्याने भाकरीला विशेष स्थान देणे चालु केले आहे.
मात्र, मिळणारा कमी भाव, वन्यप्राण्यांमुळे होणारे पिकाचे नुकसान इत्यादी कारणामुळे जिल्ह्यासह विदर्भात आता ज्वारीचे पीक मोजक्याच क्षेत्रावर घेतले जाते. परंतु, पीक घेण्यासाठी येणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करीत आता अकोल्यातील शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन देणाऱ्या, पक्षांपासून सुरक्षित व नैसर्गिक आपत्तीचा सुद्धा फटका बसणार नाही अशा वाणांचा शोध घेत उन्हाळी ज्वारी पीक पेरणी सुरू केली आहे. त्यामुळे लवकरच अकोल्यासह विदर्भात ज्वारीला पुन्हा सुगिचे दिवस येण्याची शक्यता आहे.
गोरेगाव शिवारात सव्वाशे एकरावर पेरणी
अकोला तालुक्यातील गोरेगाव येथील शेतकरी विवेक गावंडे यांनी या वर्षीपासून चार एकरावर उन्हाळी ज्वारीची पेरणी केली आहे. पक्षांच्या त्रासामुळे व त्यांच्यामुळे होणाऱ्या नुकसानामुळे शेतकरी ज्वारीचे पीक घेणे टाळत होते. मात्र, विवेक गावंडे यांचेमते त्यांनी निवडलेले ज्वारी वाण सुरक्षित वाण असून, या ज्वारीच्या कंसाला दाण्यांच्या वरून केसाळ कवच येते. त्यामुळे पक्षी दाणे खाऊ शकत नाहीत व नुकसान टळते. उन्हाळ्यात पीक घेतल्यास अतिवृष्टी, कीड, रोग व इतर नैसर्गिक आपत्तीचा धोका कमी असतो. शिवाय या वाणापासून एकरी २० ते २५ क्विंटल हमखास उत्पादन मिळते व खर्चही कमी येत असल्याचे ते सांगतात. त्यांच्या मार्गदर्शनानुसार व इतरत्र मिळालेल्या माहितीनुसार गोरेगाव शिवारातील शेतकऱ्यांनी यावर्षी जवळपास सव्वाशे एकराहून अधिक क्षेत्रावर उन्हाळी ज्वारीची लागवड केली आहे.
निवडलेले वाण आरोग्यदायी व चवदार
उन्हाळी लागवडीसाठी विवेक गावंडे व गोरेगाव शेतशिवारातील शेतकऱ्यांनी निवडलेले हायब्रीड ज्वारीचे वाण हे अधिक रुचकर, चवदार असल्याचे ते सांगतात. शिवाय या ज्वारीचा आहारातील वापर प्रामुख्याने मधुमेह रुग्णांसाठी सुद्धा सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षीपासून उन्हाळी ज्वारीला जोर
अकोला, बार्शीटाकळी, बाळापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी उन्हाळी ज्वारीची पेरणी केली होती आणि त्यांना ८५ ते ९० दिवसात एकरी २० क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळाले. त्यामुळे यावर्षी तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनी सुद्धा उन्हाळी ज्वारीचे पीक घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, उन्हाळी ज्वारी घेण्यासाठी पाणी आवश्यक असून, साधारणतः तीन ते चार पाणी देणे गरजेचे असल्याचे शेतकरी विवेक गावंडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.