वाशीम ः जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इतर जिल्ह्यामध्ये आमदार व खासदर निधीतून कोट्यवधी रुपये प्राप्त होत असताना वाशीम जिल्ह्यामध्ये दोन खासदार, सहा आमदार व पालकमंत्र्याचा भार असताना एकाही लोकप्रतिनिधीने कोरोना रुग्णांसाठी छद्दामही दिला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या नागरिकांनी मतदान केले त्यांचा श्वास गुदमरला असताना, हे लोकप्रतिनिधी मात्र शासनाला उपदेशाचे डोज पाजून आपली जबाबदारी झटकण्याचे काम करीत आहेत. रेडमेसिव्हिर, ऑक्सिजन बेड व कोविड केअर सेंटरसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या स्थानिक विकास निधीतून मदत करणे गरजेचे असताना जिल्ह्यातील जनता, मात्र या लोकप्रतिनिधींबाबत कपाळकरंटी ठरली आहे.
जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करती असताना, रुग्णांची वाढ मात्र झपाट्याने सुरु आहे. परिणामी, शासकीय व खासगी कोविड केअर सेंटरमध्ये कधी प्राणवायूचा तुटवडा, तर कधी आवश्यक औषधांचा तुटवडा भासत आहे. शासनस्तरावर पाठपुरावा करून जिल्ह्याला मदत मिळवून देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असताना याबाबत, मात्र जिल्हावासियांची निराशा होत आहे.
जिल्ह्यामध्ये सध्या खासदार भावना गवळी, खासदार संजय धोत्रे हे दोन खासदार, तर आमदार अमित झनक, आमदार राजेंद्र पाटणी व आमदार लखन मलिक हे विधानसभेचे, तर आमदार अॅड. किरणराव सरनाईक, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार गोपीकिशन बाजोरीया हे विधान परिषदेचे लोकप्रतिनिधी आहेत. सध्या खासदारांचा स्थानिक विकास निधी वितरीत केला नसला, तरी या सहा आमदारांनी जिल्ह्याला आतापर्यंत एक छद्दामही दिला नाही. प्रशासकीय स्तरावर ऑक्सिजन तयार करण्याचे एक युनिट जिल्ह्यात तयार झाले आहे. एका ऑक्सिजन युनिटसाठी दीड कोटी रुपये खर्च येतो.
या लोकप्रतिनिधींनी आपल्या स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी २५ लाख रुपये दिले असते, तर दीड कोटीचा निधी उभा राहून जिल्ह्यातील जनतेचा श्वास कोंडला नसता. कृती करण्याचे सोडून हे लोकप्रतिनिधी प्रशासनालाच सुविधा पुरविण्याचे फर्मान सोडत असल्याचे चित्र आहे. नागरिकांना सावगिरी बाळगण्याचे आवाहन करणे गैर नाही, मात्र हे आवाहन करताना आपल्या राजधर्माचे पालन होते की नाही? हे बघायलाही या लोकप्रतिनिधींना सवड नसणे हे जिल्ह्याचे दुर्देव आहे.
पालकत्वा बाबतही घोर निराशाच
जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधींनी तोंड फिरवल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या बाबत जिल्ह्यातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. शंभुराज देसाई हे सातारा जिल्ह्यातील पाटणचे आमदार आहेत. या भागामध्ये त्यांनी लक्ष देणे हा त्यांचा राजधर्म आहे, मात्र घेतलेली जबाबदारी पेलता येत नसेल, तर किंवा तिला न्याय देता येत नसेल, तर या उसण्या पालकत्वा पेक्षा पोरके बरे अशी भावना जनतेच्या मनात येत आहे. सातऱ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बसून फर्मान सोडणारे पालकमंत्री, तसेच स्वत:चे घरात बसून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करणारे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्याबाबत जनतेचा आता भ्रमनिरास झाला आहे. कोरडी आश्वासने देवून किंवा आवाहनाचा रतिब घालून कोरोनासी मुकाबला करणे कठीण असून, या लोकप्रतिनिधींनी जनतेच्या करातून जमा होणारा जनतेचाच स्थानिक विकास निधी जनतेसाठी वापरावा अशी जनभावना बळावू लागली आहे. कारण लोकप्रतिनिधींना मिळणारा विकास निधी हा त्यांचा वैयक्तिक निधी नसून तो शेवटी जनतेचाच पैसा आहे. हा जनतेचा पैसा जीव गेल्यानंतर काय कामाचा असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
या आर्थिक वर्षामध्ये जिल्ह्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधीने कोविडवर खर्च करण्याबाबतचे कोणतेही पत्र जिल्हा नियोजन विभागाला दिले नाही. सध्या नियोजन विभागाकडे तसा लेखी वा तोंडी कोणताही प्रस्ताव आला नाही.
- सुनिता आम्रे, जिल्हा नियोजन अधिकारी, वाशीम.
संपादन - विवेक मेतकर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.