अकोला : मंगळवारी संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडाली. जिल्ह्यातील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता तर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी तातडीने दाखल घेत यंत्रेला नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले तर पोलीस यंत्रणे सुद्धा विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. जिल्ह्यात सर्वाधिक फटका तेल्हारा, अकोट बाळापुर व मुर्तीजापुर तालुक्याला बसला आहे. मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागला.
जिल्ह्यात सुमारे ५५० हेक्टरवरील ज्वारी पिकाचे नुकसान झाले. बाळापुरात लिंबूचा बहार गळाल्याची प्राथमिक माहिती आहे. गारपीटमुळे शेतकर्यांच्या तोंडचा घास हिरावल्या गेला आहे. कांदा, भुईमूग, भाजीपाल्यासह लिंबू व फळबागा उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतात उभी असलेली गहू, ज्वारी, कांदा, तिळ ही पिके पुर्णत: उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी रब्बी व उन्हाळी कांदा, गहू, ज्वारी, भुईमूग, तीळ, भुईमूग, मूग व भाजीवर्गीय पिके तसेच लिंबू, आंबा या पिकांचे अवकाळी वादळासह पाऊस व गारपिटीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
बाळापुरात गारपिटीचा तडाखा
गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असून अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. तर तालुक्यातील काही भागात गारपीटीचा तडाखा बसला. यामुळे सोंगणीला आलेले, ज्वारी, कांदा आणि गहु या पिकांचे अतोनात नुकसान झाले. तर फळबागांनाही अवकाळीचा फटका बसला आहे. निंबा, उरळ, हाता, अंदुरा, टाकळी (खोजबोळ), मोरगाव (सादिजन) या भागातही पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजतापासून अचानक गारपीट सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मका, ज्वारी, कांदा, गहु, फळ बागांचे नुकसान झाले. गहू, ज्वारी, मका सोंगणीला आले आहे. काही शेतकर्यांची सोंगणी आटोपली असून, बहूतांश शेतकऱ्यांची सोंगणी बाकी आहे. आठ दिवसात पीक घरामध्ये येणार होते. मात्र त्यापूर्वीच झालेल्या गारपीटीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला.
अकोटात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानूसार अकोट शहरासह परिसरात सायंकाळी वादळी वारा,आणि मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्धा तास वीजांच्या कडकडाट पहायला मिळाला.सर्वदूर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. मागील काही दिवसांत तापमानाचा पारा चाळिशी पार गेलेला असताना आज सकाळपासून उन्हाची तीव्रता कमी कानावर होती. मात्र दिवसभर कडक ऊन पडलेले असताना वातावरणात उष्माही कायम होता. एकीकडे नागरिक उष्णतेने हैराण झालेले असताना अचानक सायंकाळी आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. कारण गुढीपाडवा सणानिमित्त अनेकांनी घरांच्या गच्चीवर गुढ्या उभारल्या होत्या. सायंकाळी अचानक मेघगर्जनेसह वादळी वारा व जोरदार पाऊस आल्याने गुढ्यांना बांधलेल्या साड्या व इतर वस्त्रे भिजली. काही नागरिक भर पावसात गुढी उतरवण्यासाठी छत्री घेवून कसरत करताना दिसून आले.
उत्पादनात घट होण्याची शक्यता
शेतकरी व फळ उत्पादक चिंतेत पडले आहे. त्यामुळे उत्पादनात घट येणार आहे. या आठवड्यात तीन ते चार दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे पिकांवर किडी, अळ्यांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. संकटांची मालिका शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. अवकाळीने पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने परिसरातील शेतकरी शेतकरी हैराण झाले आहेत.
लिंबूचा बहर गळून पडला
लिंबू उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील वाडेगाव परिसरामधील लिंबू बागा वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अडचणीत आल्या आहेत. पाऊस व वादळाचा मोठा फटका या बागांना बसला आहे. तर पाऊस पुन्हा बरसला तर पुढचा बहार संकटात येण्याची शक्यता आहे. वाडेगाव, देगाव परीसरात पारंपरिक लिंबू रोपांच्या बागा शेतकऱ्यांनी वाढविल्या आहेत. कमी पाण्यात येणारे पीक म्हणून लिंबूची ओळख आहे. परंतु अवकाळी पाऊस बरसल्याने लिंबूचा बहार गळाला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.