वाशीम - शहरातील अंतर्गत भागात तस्करीच्या गुटख्याची साठवणूक व विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. या अवैध गुटख्याच्या व्यापारातील स्पर्धा धोकादायक पातळीवर पोचली असून या व्यापारातील अवैध अर्थकारण गुन्हेगारी वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे. पोलिस व अन्न औषधी प्रशासन विभागाने दक्ष देण्याची गरज आहे.
वाशीम शहरात गुटख्याची दररोज लाखोंची उलाढाल होत असताना कारवाई का होत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरमहा दोन कोटींच्या या अवैध व्यवसायाने अनेक तरुणांना गुटखा तस्करीत ढकलले असून, यामधून गुन्हेगारी वाढीस लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुचाकीवर कुरिअरच्या मोठ्या थैलीत गुटखा भरून दररोज तो पानटपरीपर्यंत पोचविला जातो. या एका खेपेला दुचाकीस्वारास पाचशे रूपये दिले जातात. दररोज पाच ते सात चकरा होत असल्याने या व्यवसायात स्पर्धा निर्माण होवून गुन्हेगारी वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.
मागील चार महिन्यापूर्वी पोलिस प्रशासनाने कारंजा व मालेगाव येथे अवैध गुटखा व्यवसाय करणारावर छापेमारी केली होती. यामध्ये लाखो रुपयांचा गुटखा व वाहने जप्त केली होती. ही कारवाई झाल्यानंतर नेहमीप्रमाणे अन्न व औषध प्रशासन विभागाने फिर्यादीचा सोपस्कार आटोपला होता.
ही कारवाई जेथे गुटख्याचे मुख्य ठिकाण आहे त्या मुख्य वितरकावर होईल अशी अटकळ असताना जिल्ह्यातील गुटख्याचा मुख्य सूत्रधार मात्र, कारवाईच्या कक्षेत येत नाही. पिकअप वाहनातून भरदिवसा वाशीम शहरात गुटखा दाखल होतो. एका वाहनात दहा लाखाचा गुटखा असतो.
या गुटख्याच्या वितरणासाठी सुशिक्षित बेरोजगार तरुणांना जास्त पैशाचे अमिष दाखवून दुचाकीवर गुटख्याची विल्हेवाट लावली जाते. हे तरुण भरदिवसा गुटख्याच्या खेपा रिचवतात, याला कोणताही अटकाव राहिला नाही. या अवैध व्यवसायाचे अर्थचक्र मोठे असून, दरमहा दोन ते अडीच कोटींची उलाढाल केली जाते. कमी वेळात, कमी श्रमात दररोज हजारो रुपये मिळत असल्याने अनेक बेरोजगार तरुण या दलदलीत फसले आहेत.
या अवैध अर्थचक्रातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अवैध गुटखा व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आहे. मात्र, या विभागाचे कार्यालय अकोला येथे आहे. पोलिस कारवाई करतात त्यानंतर अत्र व औषध प्रशासन विभाग फिर्यादीचे सोपस्कार पार पाडतो. या अवैध व्यवसायातून निर्माण होणारे असामाजिक तत्व पोलिस प्रशासनासाठी डोकेदुखी ठरतात त्यामुळे पोलिस प्रशासनाने कारवाई करणे आवश्यक आहे.
शहराबाहेर साठविला जातो गुटखा
कारंजावरून लाखो रुपयांचा गुटखा दाखल झाल्यानंतर शहराबाहेर बिलालनगर परिसरात गुटखा माफियाकडे हा गुटखा साठविला जातो. तसेच जुन्या शहरातही गुटखा साठविला जातो भरदिवसा हा अवैध व्यवसाय फुलत असतांना पोलिस प्रशासन, स्थानिक गुन्हे शाखा, अन्न व औषध प्रशासन कारवाई का करत नाही याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.