घरातील प्रत्येक माणूस शेतात काम करतो, त्यामुळे शेतीबद्दल आपुलकी वाटते आणि कुटुंबात एकी राहत असल्याचे अनिल चेळकर सांगतात. 
अ‍ॅग्रो

दुष्काळ, आपत्तीवर चेळकर कुटुंबीयांची एकीतून मात

रमेश चिल्ले

लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील चेळकर कुटुंबीयांची वीस वर्षांपूर्वी अजिबात पत नव्हती. मात्र, शेती व्यवसायात दाखवलेली जिद्द, चिकाटी, एकी, निर्व्यसनीपणा, वेळेचे व पैशांचे काटेकोर नियोजन यांतून चेळकर कुटुंबीयांनी दुष्काळ आणि आपत्तीवर मात केली आहे. त्यांचे यश उल्लेखनीय आहे. 

लातूर जिल्ह्यातील किल्लारी (ता. औसा) येथील चेळकर कुटुंबीयांची सुरवातीला केवळ १२ एकर शेती होती. मात्र, अनिल यांच्या आजी अत्यंत खंबीर. त्यांनी भाजीपाला लागवडीतून शेतीचे नियोजन तर केलेच; पण गावोगावच्या आठवडी बाजारांत त्याची विक्रीही केली. त्यातून मोठ्या कुटुंबाचा प्रपंच चालवतानाच सुमारे ५० एकर शेती खरेदी केली. त्यातील २५ एकर शेती काशिनाथ यांच्या वाट्याला आली. त्यांना अनिल, सुनील व श्याम अशी तीन मुले असून, एकत्र कुटुंब आहे. 

द्राक्ष शेती 
सन २००१ मध्ये चेळकर कुटुंबीयांनी दोन एकरवर द्राक्ष लागवडीचा निर्णय घेतला. एकरी सुमारे सहा लाख रुपये खर्च येतो. त्यासाठी धाडस करत राष्ट्रीयीकृत बॅंकेचे दीर्घ मुदतीचे कर्ज काढले. पहिली दोन वर्षे उत्पादन येईपर्यंत अत्यंत तारांबळीची गेली. कर्ज, व्याज, हप्ते यासोबतच काही प्रमाणात सावकारी कर्ज झाले. न डगमगता काम करत राहिल्याने निर्यातक्षम उत्पादन मिळू लागले. मग हळूहळू द्राक्षाखालील क्षेत्र वाढवत आता ते ८ एकरपर्यंत आले आहे. तेव्हापासून एकरी १२ ते १४ टन द्राक्ष उत्पादन सातत्याने घेत आहेत. त्याला सरासरी दर ५० ते ८० रुपये प्रतिकिलो इतका दर मिळतो. नवीन लागवड वगळता जुन्या द्राक्ष बागेसाठी एकरी ३ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. 

टोमॅटो व भाजीपाला शेती 
भाजीपाल्यामध्ये टोमॅटो, खरबूज, कलिंगड यासह अन्य हंगामी पिके असतात. टोमॅटो साधारणपणे दोन एकर क्षेत्रावर असतो. त्यातही अस्मानी संकटे असतात. उदा. २०१६ मध्ये झालेल्या पावसामुळे सुमारे एक एकर टोमॅटो झाडांचे नुकसान झाले. दरवर्षी २० टनांपर्यंत येणारे उत्पादन केवळ १२ टन मिळाले. मात्र, दर चांगला मिळाल्याने २ लाख रु. उत्पादन खर्च वजा जाता ४ लाख रु. निव्वळ नफा झाला. गेल्या वर्षी एकरी २० टन उत्पादन मिळाले असले तरी प्रतिक्रेट (२५ किलोंचा एक क्रेट) ६० ते ७० रुपये दर मिळाला. उत्पादन आणि तोडणीचा खर्च धरला तर तोटा झाला. मात्र, अशा बाबी शेतीत चालूच असतात. त्यासाठी तयार असलेच पाहिजे, असे अनिल चेळकर सांगतात.  

अशी असते कामांची वाटणी
एकूण २५ एकर शेतीपैकी आठ एकर द्राक्ष, चार एकर भाजीपाला व उर्वरित हंगामी पिके घेतात. द्राक्षाचे संपूर्ण नियोजन लहान बंधू श्याम यांच्याकडे, तर सुनील यांच्याकडे हंगामी पिके, भाजीपाला आणि ट्रॅक्‍टरचे नियोजन असते. संपूर्ण कौटुंबिक, शेती यांचे नियोजन आणि आर्थिक बाबी याकडे अनिल चेळकर यांचे लक्ष असते. गरजेच्या वेळी एकमेकांना मदत केली जाते. 

आर्थिक नियोजन...
दरवर्षी तीस लाख रुपयांपर्यंत लागवडीचा खर्च असतो. त्यासाठी दरवर्षी बारा-चौदा लाख रुपये पीक कर्जातून उभे केले जातात, तर उर्वरित खर्चासाठी मागील पिकातून पैशांचे नियोजन केले जाते. प्रत्येक गोष्टीचा ताळेबंद योग्यरीत्या मांडून नियोजन होते. नवीन बाबींसाठी भांडवल वेगळे काढले जाते. दर आठवड्याला तिन्ही भाऊ एकत्र बसून निर्णय घेतात. प्रत्येकाचे मत विचारात घेतले जाते.  

अडचणीत कष्ट आणि एकी आली कामी
सन २०१३ ते १५ या काळातील दुष्काळी स्थिती, त्यानंतर २०१५-१६ व १६-१७ मध्ये गडगडलेले द्राक्ष व भाजीपाल्याचे दर, गारपीट अशा समस्यांमुळे शेतीतून उत्पन्नच हाती आले नाही. संपूर्ण घर शेतीवर अवलंबून. अशा स्थितीवर चेळकर कुटुंबीयांनी एकी, कष्ट आणि एकमेकांवरील विश्वासाने मात केली. त्यात उपवर मुलीचे लग्न दोन वर्षे पुढे ढकलावे लागले. अर्धे मजूर कमी करून घरातील व्यक्तींनी दहा-बारा तास कामे केली. द्राक्ष छाटणी, डिपिंग, विरळणी, मणी काढणे अशा कामांसाठी आवश्यक तेवढेच मजूर वापरले. अन्य शेतकऱ्यांची ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, मोगडा अशी कामे करत दोन पैसे जोडले. सर्वांनी आपणहून अनेक खर्चांवर मर्यादा आणल्या. अगदी त्या काळात विम्याचे हप्तेही भरता आले नाहीत. पुढे उत्पादन व बाजारभाव चांगले मिळाल्याने नवसंजीवनी मिळाली. 

वाहतूक, पॅकहाउस, गोठा यांच्या सोयी
एकत्रित कुटुंब आणि शेती म्हटले की वाहतुकीच्या सोयीकडे लक्ष द्यावे लागते. त्यासाठी एक कार, जीप, दोन ट्रॅक्‍टर, चार बाइक आहेत.
 शेतात पॅकहाउस बांधले आहे.
 चार गाई, दोन म्हशी, दोन बैल, वासरे आहेत. त्यांच्यासाठी २००९ मध्ये चार लाख रुपये खर्चून आधुनिक गोठा बांधला आहे. 
 त्यासोबतच द्राक्षशेतीसाठी बाहेरील राज्यांतील २० मजूर आणले असून, त्यांच्यासाठी घरे बांधली आहेत. एकरी साधारणपणे ४० ते ४५ हजार मजुरांवरील खर्च होतो.  
 भूकंपामध्ये पडलेले गावातील घरही बांधून काढले आहे. 
मुलांच्या शिक्षणासाठी तजवीज करतो
तिघाही भावंडांची मिळून आठ मुले-मुली शिकत आहेत. त्यातील एक इंजिनिअर होऊन नुकताच नोकरीला लागला, तर एका मुलीचे पदव्युत्तर शिक्षणानंतर लग्न करून दिले. दोघांचे इंजिनिअरिंग निलंगा आणि लातूर येथे सुरू आहे. अन्य चौघे लातूरमध्ये शाळा- कॉलेज करत आहेत. या मुलांच्या शिक्षणाचा विचार करून लातूर येथे मध्य वस्तीमध्ये बंगला विकत घेतला आहे. मुलांना सांभाळण्यासाठी अनिल यांच्या पत्नी सौ. ललिता लातूरलाच राहतात. सर्वांसाठी होणाऱ्या खर्चाची वार्षिक चार ते पाच लाख रुपयांची तजवीज दरवर्षी आर्थिक ताळेबंदात केली जाते.

खर्च वाचवण्यासाठी नियोजन 
 मजुरांवरील खर्चात बचतीसाठी इंपोर्टेड डीप मशिन आठ लाख रुपयांना घेतले आहे. सोबतच २४ एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर असून, स्वतःच्या शेतीतील कामानंतर अन्य शेतकऱ्यांची कामे केली जातात. त्यातून आर्थिक प्राप्तीही होते. 
 रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांवर भर दिला. शेणखत, गांडूळ खत, व्हर्मिवॉश, स्लरी यांचा वापर वाढवला. 
 हिरवळीची खते, पाचट, पालापाचोळा मल्चिंगवर भर दिला. 
 पिकांची सशक्त वाढ केल्यास रोग-किडींवरील फवारणीचा खर्च वाचतो. प्रतिबंधात्मक फवारण्या दिल्या जातात. 
 मजुरांवरील खर्च कमी करण्यासाठी घरातील आठ-दहा जण आठ ते सोळा तास शेतात राबतात. या साऱ्यातून शेतीवर अवलंबून असूनही केवळ तग धरला असे नाही, तर प्रगतीही केली असल्याचे  अनिल चेळकर यांनी अभिमानाने सांगितले.

केवळ शेती व्यवसायातूनच आमच्या कुटुंबाची प्रगती झाली आहे. यश- अपयश, नफा- तोटा होतच असतो, त्यासाठी शेतीला नावे ठेवणे आम्हा तिघा भावंडांना आवडत नाही. तोटा झाला तर कशामुळे, याचा विचार करतो. त्यातील टाळण्यासारखा भाग पुढील नियोजनात कटाक्षाने टाळतो आणि पुढे जातो. नवीन काय करायचे, याविषयीचे प्रत्येकाचे मत महत्त्वाचे मानले जाते. 
- अनिल चेळकर

-  अनिल काशिनाथ चेळकर, ८४२१९४२१०७, ९४२११८४२४१, (मु.पो. किल्लारी, ता. औसा, जि. लातूर) (लेखक सेवानिवृत्त कृषी अधिकारी आणि शेती-पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT