Grape crop insurance 
अ‍ॅग्रो

पीकविम्याने ‘द्राक्ष कोंडी’

टीम अॅग्रोवन

पुणे : हवामान आधारित पीकविम्यात द्राक्षाकरिता किमान १६ ऑक्टोबरपासून पीकविमा ग्राह्य धरणे अपेक्षित असताना ८ नोव्हेंबरपासून तो ग्राह्य धरण्यात आल्याने बागायतदारांची मोठी कोंडी झाली आहे. याच कालावधीत मोठे नुकसान झाल्याने आणि हंगाम पुरता गेल्याने द्राक्ष उत्पादकांसाठी आता पीकविमा ‘बैल गेला आणि झोपा केला’चा ठरला असून, याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच ‘आंबिया बहरा’त द्राक्ष पीक व्यवस्थापन मोडत नसताना या कालावधीसाठी द्राक्षाकरिता पीकविमा जाहीर करण्यामागील गौडबंगाल काय असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

राज्य सरकारने नुकताच ३१ ऑक्टोबरला हवामान आधारित पीकविमा जाहीर केला. यात द्राक्षाचा समावेश करण्यात आला असून, ७ नोव्हेंबर (आज) ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिली आहे. पाऊस, तापमान, सापेक्ष आर्द्रता, गारपीट व वेगाचे वारे यांच्या मुळे पिकात निर्माण होणारे जोखीम स्तर विम्यात विविध टप्प्यांत ग्राह्य धरण्यात आले आहेत. 

द्राक्षाकरिता यातील अवेळी पाऊस, दैनंदिन कमी तापमान आणि गारपीट हे तीनच धोके समाविष्ट आहेत. अवेळी पावसासाठी ४ मिलिमीटरपासून पुढील पावसाचा सहा टप्प्यांत नुकसानभरपाई ग्राह्य धरली असून, दैनंदिन कमी तापमान प्रकारात ३.५१ अंश सेल्सिअसपासून कमी तापमान ग्राह्य धरण्यात आले आहे आणि १ जानेवारी ते ३० एप्रिल दरम्यानचा कालावधी गारपीट प्रकारात ग्राह्य धरला आहे. मात्र, योजना लागू करताना आंबिया बहरातील फळपिकांसाठी असा उल्लेख केला आहे. तसेच ७ नोव्हेंबरला अंतिम मुदतीत अर्ज भरल्यानंतर ८ नोव्हेंबरपासून नैसर्गिक जोखीम ग्राह्य धरण्यात आली आहे. वास्तवात सर्वसाधारणपणे १५ ऑक्टोबरपूर्वी आपल्याकडे पावसाळा संपत असताना, येथून पुढील कालावधी तरी योजनेत ग्राह्य धरण्यात येणे अपेक्षित होते. गेल्या वर्षी याप्रमाणेच कालावधी ग्राह्य धरण्यात आला होता. मात्र, तसे न होता महाराष्ट्रातील ६० टक्के बागांचे नुकसान १५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरदरम्यान झाल्याने वेळेत पीकविमा जाहीर झाला असता, तर द्राक्ष बागायतदारांना सर्वांत मोठा दिलासा ठरला असता, मात्र तसेच न झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. पीकविमा जाहीर करण्यात मागे वेळकाढू धोरणामागील गौडबंगाल काय आहे, यामागे कंपन्यांचे हित जोपासण्याचेच कृषी विभागाचे धोरण कारणीभूत आहे का, असे अनेक प्रश्‍न शेतकऱ्यांनी उपस्थित केले असून, या दिरंगाईची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

फळछाटणीनंतर पाच ते सात दिवसांनी जोखीम सुरू...
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुंवर म्हणाले, ‘‘द्राक्ष पिकात आंबिया बहर ही संकल्पना नाही. ही संकल्पना संत्रा, मोसंबी तसेच अन्य फळांना लागू होते. द्राक्षात खरड छाटणी व फळछाटणी असे दोन मुख्य हंगाम आहेत. विम्याच्या अनुषंगाने बोलायचे झाल्यास फळछाटणीनंतर पाच ते सात दिवसांनी या पिकात हवामानाची जोखीम सुरू होते. द्राक्षांची काढणी होईपर्यंत ही जोखीम कायम राहते. अवस्थानिहाय बोलायचे झाल्यास पोंगा अवस्था हवामानाच्या अंगाने जोखमीची ठरू शकते. त्याचबरोबर घड निघण्याची अवस्था, फुलोरा, बेरी (मणी) सेटिंग, मणी विकसित होण्याची अवस्था, मण्यात पाणी उतरण्याची अवस्था अशा काढणीपर्यंतच्या सर्वच अवस्था महत्त्वाच्या आहेत. पाऊस अवस्थेत डाऊनी मिल्ड्यूचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.’’

 ‘ऑक्टोबर फळछाटणीनंतरची द्राक्षबाग’ असा शब्द प्रयोग योग्य...
द्राक्षातील जोखीम व्यवस्थापनाबाबत बोलताना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत म्हणाले, की आपल्या नियमितच्या पाऊसमानाप्रमाणे साधारणतः १५ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता असते. यानंतरही पाऊस पडला, तरी फारसा पडत नाही, मोठा पडत नाही आणि पडलाच तर चक्रीवादळासारखी कारणे त्यास असतात. विमा कंपन्या केवळ ‘अनपेक्षित जोखीम’ (अन्‌एक्सपेक्टेड रिस्क) ग्राह्य धरतात. मग, सप्टेंबरच्या प्रारंभापर्यंत फळछाटणी केलेल्या द्राक्षबागा आहेत, त्यांचा अंतर्गत जोखीम स्तर जास्त असतो. त्यांचे फळ पावसामुळे अधिक बाधित होण्याचे, तसेच उत्पादन खर्च वाढविणारे असू शकेल, अशा कालावधीतील जोखीम स्तर आम्ही ग्राह्य धरणार नाही, असे कंपन्या म्हणतात. नियमित स्वरूपात सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून जे फळछाटणी करतात, त्यांचा जोखीम स्तर विमा कंपन्या साधारणतः ग्राह्य धरतात. द्राक्षाकरिता आंबिया बहर हा शब्द वापरत नाही. लिंबाकरिता मुख्यतः हा शब्द वापरतात. ‘ऑक्टोबर फळछाटणीनंतरची द्राक्षबाग’ असे ‘आंबिया बहर’ऐवजी शब्द प्रयोग करणे योग्य ठरेल. आज ४० ते ४५ टक्के अर्ली फळछाटणीत होत्या त्या सर्व खराब झाल्या आहेत. ऑक्टोबर छाटणीतही बागा पावसात सापडल्या. यानंतरही पुढेही सामान्यतः बागांची स्थिती चांगली राहिलेली नाही, ३० ते ४० टक्के बागा आहेत, ज्या उशिरा फळछाटणी करतात, अशातही सध्याचा विमा उपयोगी ठरेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT