Guava-farming 
अ‍ॅग्रो

‘वसुंधरा‘ ब्रॅंडने दिली फळबागेला नवी ओळख

माणिक रासवे

सेलू- देवगाव राज्य मार्गावर सेलू शहरापासून चार किलोमीटरवरील डिग्रस बुद्रुक गावातील विजय बरसाले हे बी.ए. पदवीधर प्रयोगशील शेतकरी. डिग्रस शिवारातून वाहणाऱ्या दुधना नदीकाठी आठ एकर तसेच अन्य सहा ठिकाणी मिळून बरसाले कुटुंबाची ५० एकर शेती आहे. सिंचनासाठी विहीर, कूपनलिकेची व्यवस्था आहे. विजय बरसाळे यांचे वडील प्रल्हादराव हे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते. शरद जोशी यांच्या समवेत शेतीप्रश्नांसंबंधी काम करत असताना त्यांना विविध राज्यांमध्ये जाण्याचा योग आला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रयोग, विविध पीकपद्धती, आधुनिक तंत्रज्ञान, बाजारपेठा याची माहिती झाली. प्रल्हादराव आणि त्यांच्या भावांचे एकत्र कुटूंब होते, त्या वेळी ऊस हे प्रमुख पीक होते. मात्र १९८० मध्ये त्यांनी सहा एकरांवर मोसंबी लागवड केली. विजय यांनी पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९९८ पासून पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला.

पीकबदलाला सुरुवात 
 विजय बरसाले हे सुरुवातीच्या काळात खरिपामध्ये सोयाबीन, कपाशी, तूर, मूग तर रब्बी मध्ये हरभरा, ज्वारी, गहू लागवड करत होते. परंतु, गेल्या काही वर्षांत पावसाचे कमी झालेले प्रमाण तर कधी अतिवृष्टी, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तीमुळे हंगामी पिकांचे नुकसान होत होते. प्रतिकूल परिस्थितीत खात्रीशीर उत्पन्न मिळावे, यासाठी बरसाले यांनी टप्प्याटप्प्याने फळबाग लागवडीचे नियोजन केले. तुलनेने कमी पाण्याची गरज असलेल्या पेरू, सीताफळाची निवड केली. सध्या त्यांच्याकडे ११ एकर पेरू, ८ एकर सीताफळ, ७ एकर लिंबू आणि ५ एकरावर मोसंबी लागवड आहे. राज्य, परराज्यात सर्व फळांची विक्री ‘वसुंधरा ब्रॅंड'ने होते.  

फळबागेचे योग्य नियोजन 
फळबाग व्यवस्थापनाबाबत विजय बरसाले म्हणाले की, दर वर्षाआड दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे फळबागेसाठी पाणी कमी पडते. गतवर्षीच्या शेजारच्या शेतकऱ्याकडून पाणी विकत घ्यावे लागले होते. पाणी बचतीसाठी गहू, हरभरा भुश्याचे आच्छादन करतो. गेल्यावर्षी बाग जगविण्यासाठी फळे तोडून टाकावी लागली. भारनियमनाच्या काळात सिंचनासाठी अडचणी येतात. हे लक्षात घेऊन पाच हजार लिटर क्षमतेची टाकी बसवली आहे. वीजपुरवठा खंडित असताना टाकीतील पाणी ठिबक संचाद्वारे फळबागेला दिले जाते. जमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशीनुसार मुख्य, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापर करतो. सूक्ष्म सिंचन पद्धतीनेच फळबागेला पाणी दिले जाते. ठिबकद्वारे विद्राव्य खतांच्या मात्रा दिल्या जातात. एकात्मिक पद्धतीने कीड, रोग नियंत्रणावर भर आहे. त्यामुळे खर्चात बचत होते.

नवीन तंत्रज्ञानाकडे ओढा 
बरसाले यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे, तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे, मंडळ कृषी अधिकारी आर. जी. मगर यांचे नेहमी सहकार्य असते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्तार कृषीविद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे त्यांना शेतावर येऊन मार्गदर्शन करतात. विजय यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेण्याची आवड आहे. परभणी सह राहुरी, दापोली येथील कृषी विद्यापीठ, बारामती कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांच्या संपर्कात असतात. विविध कृषी मेळावे, प्रदर्शनांना भेटी देऊन कृषी विषयक ज्ञान अद्ययावत करून त्यानुसार पीक व्यवस्थापन करतात.

एकत्रित कुटुंबपद्धतीत कामाचे नियोजन 
विजय बरसाले यांच्या कुटुंबात आई, वडील, बंधू, मुले मिळून दहा सदस्य आहेत. शेतीकामाचे व्यवस्थापन बंधू उद्धवराव पाहतात. विजय यांच्याकडे पीक नियोजन, फळांची विक्री, रोपवाटिकेची जबाबदारी आहे. बरसाले यांच्याकडे दोन ट्रॅक्टर, बैलजोडी आणि चार सालगडी आहेत. फळपीक काढणी तसेच अन्य कामांसाठी रोजंदारीवर मजूर घेतले जातात. फळबागेमुळे उत्पन्नाची शाश्वती मिळाली. निविष्ठा, मजुरी, वीजबिल, वाहनभाडे, यावरील खर्च जाता वर्षाकाठी एकरी एक ते दीड लाखाचे उत्पन्न मिळते. शेतीतील उत्पन्नावर बरसाले यांनी दहा एकर जमीन खरेदी केली आहे.

अॅग्रोवन मार्गदर्शक...
विजय बरसाले हे अॅग्रोवनचे सुरुवातीपासूनचे वाचक. फळबाग लागवड करण्यापूर्वी त्यांनी अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या यशकथा वाचून संबंधित शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी दिल्या. त्यांच्याकडून पीक व्यवस्थापनाची माहिती, अनुभव जाणून घेतले. यशोगाथेसोबत तांत्रिक लेखातील माहिती, बाजारभाव, हवामान सल्ला त्यांना मार्गदर्शक ठरतो आहे. 

पेरूला नेट, बॉक्स पॅकिंग
लखनौ - ४९ (सरदार) या जातीची २००० मध्ये पाच एकरावर आठ बाय दहा फूट अंतरावर लागवड. २०११ मध्ये तीन एकरावर अलाहाबाद सफेदा जातीची दहा बाय दहा फूट अंतरावर लागवड.२०१२ मध्ये तीन एकरावर व्हीएनआर जातीची दहा बाय दहा फूट अंतरावर लागवड. 

लखनौ-४९चे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत एकरी सरासरी १०० ते १२० क्विंटल उत्पादन.

नांदेड तसेच तेलंगणा राज्यातील निजामाबाद आणि गुजरातमधील सुरत बाजारपेठेत विक्री. प्रति क्विंटल सरासरी अडीच ते तीन हजार रुपये दर.यावर्षी निजामाबाद मार्केटमध्ये क्विंटलला साडेतीन हजार रुपये दर.

पॅकिंगवर भर 
व्हीएनआर जातीची फळे परिपक्व झाल्यानंतर नेट पॅकिंगमध्ये झाडावर एक ते दीड महिना राहू शकतात. तोडणी नंतरही २१ दिवसांपर्यंत टिकतात. या जातीचे एकरी १५० क्विंटल उत्पादन.

फळे तोडल्यानंतर ए आणि बी ग्रेड प्रतवारी. नेट पॅकिंग करून बॉक्समध्ये दहा किलो पेरू पॅकिंग.

रेल्वेव्दारे पंजाबमधील अमृतसर आणि गाडीद्वारे कर्नाटकातील बंगळुरू, गुजरातमधील अहमदाबाद, सुरत बाजारपेठेत पेरू पाठविले जातात. प्रति दहा किलो बॅाक्सला एक हजार ते १४०० रुपये दर. 

सुरत, बंगळुरूला सीताफळांची मागणी

तीन एकर क्षेत्रावर २००५ मध्ये बालानगर जातीची पंधरा बाय पंधरा फूट अंतरावर लागवड. २०१४ मध्ये पाच एकर क्षेत्रावर गोल्डन (एनएमके १) जातीची लागवड.

फळांच्या वाढीसाठी योग्य पद्धतीने खत, पाणी व्यवस्थापनावर भर.

गोल्डन जातीची फळे परिपक्वतेनंतर झाडावर २१ दिवस तर तोडणीनंतर सात दिवस टिकतात. फळाचे वजन ४०० ते ६०० ग्रॅम.

गोल्डन जातीचे एकरी १५० क्विंटलपर्यंत उत्पादन. प्रतवारीकरून १५ किलो वजनाचे बॅाक्स पॅकिंग करून औरंगाबाद, पुणे, मुंबई, बंगळुरू, सुरत बाजारपेठेत विक्री. प्रति किलोस १०० ते १२० रुपये दर.

सेलू बाजारपेठेत बालानगर फळांची विक्री. प्रति किलो २० ते ३० रुपये दर.

मोसंबीची थेट विक्री 
२००३ मध्ये मोसंबीची पाच एकरांवर लागवड. लागवडीनंतर पाच वर्षांनी उत्पादनास सुरुवात.

सुरुवातीच्या काळात मृग बहराचे नियोजन. अलीकडच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन आंबे बहराचे नियोजन. 

यंदा मृग बहराचे एकरी १० ते १५ टनांपर्यंत उत्पादन. बागेमध्ये व्यापाऱ्यांकडून फळांची खरेदी. यंदा सरासरी एक ते दीड हजार रुपये प्रति क्विंटल तर आंबे बहराच्या फळांना अडीच ते तीन हजार रुपयापर्यंत दर.

दर्जेदार लिंबू उत्पादन 
२०१५ मध्ये सात एकरांवर लागवड. प्रामुख्याने साई सरबती, एनआरसीसी ७ आणि एनआरसीसी ८ जातींची निवड.
सोळा बाय वीस फुटांवर लागवड.
हस्त बहराचे मार्च ते जून या कालावधीत एकरी १०० ते १५० क्विंटल उत्पादन. 
नांदेड मार्केटमध्ये विक्री, सरासरी प्रति किलोस ४० ते ५० रुपये दर.

विजय बरसाले - ९४२३६८१८४४, ९४२२३३८७१४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT