अ‍ॅग्रो

फुलांच्या शेतीला हवा ‘एकी’चा दरवळ

विलास शिंदे

कमीत कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न देणारी शेती म्हणून फुलशेती ओळखली जाते. एका एकरातून २० लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न हे फुलशेतीतूनच शक्य आहे. इतकी क्षमता असूनही ही शेती अडचणीत का? वाढता उत्पादन खर्च, पेटंट वाणांची अनुपलब्धता, मार्केटिंगकडे दुर्लक्ष ही त्यामागची कारणे आहेतच; त्या सोबत फुलशेतीतील सर्व संबंधित घटकांत नसलेली एकवाक्यता हेही तितकेच महत्त्वाचे कारण आहे. पोल्ट्रीसारखे फुलशेती उद्योगातही ‘इंटिग्रेशन’ आले, तर महाराष्ट्रातील फुलशेती उद्योगासमोरील प्रश्‍न सुटायला वेळ लागणार नाही. त्यासाठी राज्यभरातील फुलोत्पादकांना एकत्र येऊन मूल्यसाखळीची उभारणी करावी लागेल. क्लस्टरनिहाय कंपन्यांची उभारणी करून ही मूल्यसाखळी मजबूत करावी लागेल. 

फुलशेतीचे ढोबळमानाने दोन प्रकार पडतात. पारंपरिक फुलशेती आणि कट फ्लॉवर्स. पारंपरिक शेतीत झेंडू, गुलाब, मोगरा तर कट फ्लॉवर्समध्ये गुलाब, जरबेरा, शेवंती, लिली, कार्नेशन या पिकांचा प्रामुख्याने समावेश होतो. फुलशेती म्हणजे कमी जागेत जास्त उत्पन्न. एकरी २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवलेली उदाहरणंही फुलशेतीत सापडतात. मोगऱ्यासारख्या पिकाच्या उत्पादनातून खूप कमी जागेत एक ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची उदाहरणे आहेत. फुलशेतीमध्ये मोठी क्षमता असूनही तिला अनेक अडथळ्यांच्या शर्यतीचा सामना करावा लागत आहे. 

महाराष्ट्रातील फुलशेतीने मागील २५ वर्षांत बरेच चढ-उतार पाहिले आहेत. वैयक्तिक शेतकरी ते काही कार्पोरेट कंपन्या या क्षेत्रात फुलांचे उत्पादन घेत आहेत. फुलशेतीतील या सगळ्या घटकांना आजही मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. राज्यात काही मोठ्या कंपन्यांनी स्वत:च्या शंभर एकर क्षेत्रामध्ये मोठे प्रकल्प उभे केले. तेही अडचणीत आलेले दिसत आहेत. फुलशेतीची यंत्रणा एखाद्या उद्योगासारखी उभी राहावी, अशा व्यापक उद्देशाने पुणे जिल्ह्यात तळेगाव येथे फ्लोरिकल्चर पार्क सुरू करण्यात आला. आज या पार्कची अवस्था फार काही चांगली नाही. तेथील बरेचसे पॉलिहाउस अडचणीत आहेत. मूळ मालक सोडून दुसरे कुणीतरी ते चालवत आहेत. त्यांचेही यशस्वी होण्याचं प्रमाण खूप कमी आहे. नाशिक जिल्ह्यातील जानोरी मोहाडी येथील फ्लोरिकल्चर क्लस्टरमधील जवळपास दोनशे पॉलिहाउसधारक फुलशेतीत कार्यरत आहेत. त्यापैकी ९० टक्के फुलोत्पादक शेतकरी बँकेचे कर्जाचे हप्ते वेळेवर भरू शकले नाहीत. खर्च, नैसर्गिक आपत्ती आणि भांडवलाची अडचण यामुळे त्यांचे अर्थकारण बिघडून गेले  आहे.

मार्केटिंग गरजेचे
कट फ्लॉवर्सची म्हणजे पॉलिहाउसच्या नियंत्रित वातावरणातील शेती ही महागडी शेती बनली आहे. एकरी ४० लाख रुपयांपर्यंत भांडवली गुंतवणूक करावी लागते. उत्पादनासाठी जो खर्च व वेळ दिला जातो, त्या तुलनेत मार्केटिंग किंवा काढणीनंतरच्या हाताळणी व्यवस्थापनाकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. एकीकडे फुलशेतीची एक एकरापुरती यंत्रणा उभी करणे अवघड असतानाच दुसरीकडे मार्केटची यंत्रणा उभी करणे ही जणू अशक्यप्राय गोष्ट बनली. त्यामुळे यातील बरेच जण वाढलेला खर्च आणि कर्ज यात अडकून पडले. त्या तुलनेत उत्पन्न काढू शकले नाहीत. बाजारही नियंत्रणात नसल्यामुळे स्थिती अधिक बिकट होत गेली. आपल्या फुलांची विक्री १० रुपये प्रति नग होण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात २ रुपये दर मिळाल्याचे अनुभव अनेकदा येतात. कधी कधी फुले फेकून देण्याची वेळ येते.

दुसरीकडे पारंपरिक फुलांबरोबरच नवीन फुलांची मागणी वाढत आहे. फुलांचा वापर धार्मिक कार्ये, लग्नसमारंभांसाठी होतो. पण त्या व्यतिरिक्त रोज जसे दूध घेतो तसे घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी आपल्या घरामध्ये फुले असली पाहिजेत, या दृष्टीने फुलांचे मार्केटिंग होणे गरजेचे आहे. खप वाढला तरच मागणी वाढेल. त्यासाठी संघटित प्रयत्न करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. त्यातून फुलोत्पादकांसाठी हक्काची बाजारपेठ उभी राहू  शकते.

अॅग्रोवनच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

  यंत्रणा उभारणी महत्त्वाची
नाशिकमधील मोहाडी क्लस्टरचे उदाहरण घेतले, तर दोनशे एकर पॉलिहाउसेससाठी जवळ जवळ ८० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ही गुंतवणूक फक्त उत्पादनासाठी झाली. मार्केटिंगसाठी आठ लाखांची सुद्धा तरतूद केली गेली नाही. संघटित पद्धतीने मार्केटिंगची यंत्रणा उभी राहणे, त्या तुलनेतच तिचे बजेट उभे करणे शक्य आहे. दोनशे एकरांसाठी पाच कोटींचे बजेट उभे करायचे म्हटले तरी प्रत्येक शेतकऱ्यामागे ६० ते ७० हजार रुपयांचा खर्च येतो. एवढ्या तरतुदीतून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची मार्केटिंग व्यवस्था उभी राहू शकते.

नवीन वाण हवेत
फुलांचे पेटंटेड वाण हा एक महत्त्वाचा विषय आहे. बाजारात मागणी असलेले, वेगळेपण असलेले फुलांचे वाण तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला बाजारात टिकण्याची संधी आहे. त्यासाठी सुद्धा संघटित यंत्रणा असेल तर त्या उत्पादकांपर्यंत वाण पोहोचू शकतील. 

इंटिग्रेशनची गरज 
इंटिग्रेशन म्हणजे उद्योगाच्या फक्त एका भागाचाच विचार न करता उत्पादन ते ग्राहक असे सर्व घटक एका साखळीने परस्परांना जोडणे. एखादे पीक जितके अधिक मूल्याचे असते, तितकी त्यात इंटिग्रेशनची गरज असते. आपण सगळा फोकस उत्पादनावर ठेवला आणि मार्केटिंगकडे अजिबात लक्ष दिले नाही तर त्या उद्योगाचे काय होणार? आपल्या शेतीची हीच अवस्था आहे. फुलशेतीत आपण उत्पादनावर एकरी ४० लाख रुपये खर्च केले; मात्र त्याच्या मार्केटिंगसाठी आपण दहा टक्केही बजेट ठेवले नाही. एखाद्या शेतकऱ्याने आपल्यापुरते, एखाद्या एकरापुरते बजेट ठेवूनही उपयोग नाही. फुलोत्पादक म्हणून आपल्याला एकत्र यावे लागेल. किमान एका क्लस्टरमधील फुलोत्पादकांनी एकत्र यावे. एकत्रित मूल्यसाखळी उभारून आपल्या फुलांच्या मार्केटिंगचा प्रश्‍न सोडवणे हाच एक प्रभावी मार्ग आहे.

 मूल्यसाखळी हाच पर्याय
फुलशेती उद्योगात आतापर्यंत संघटित काम झाले नाही. जे काम झाले ते तुटक तुटक आणि विस्कळीत स्वरूपातच झाल्यामुळे सगळेच अडचणीत आले. याकडे आता लक्ष देण्याची गरज  आहे. फुलशेती खरोखर फायदेशीर आणि शाश्‍वत करायची असेल तर संघटितपणे मूल्यसाखळीच उभी करणे गरजेचे  आहे.

नवीन तंत्रज्ञान, नवीन वाण या बरोबरच मार्केटिंगसाठी संघटित प्रयत्न ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने आपण पावले टाकली तरच फुलशेतीला पर्यायाने फुलोत्पादकांना चांगले दिवस येतील.

भारतातील फुलशेतीचे मार्केट
    ग्लोबल न्यूज वायरच्या आकडेवारीनुसार भारतात २०१८ मध्ये फुलशेतीची बाजारपेठ १५,७०० कोटी रुपयांची होती. सन २०२४ पर्यंत त्यात २० टक्के वाढ होण्याचा अंदाज.
    भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक परिप्रेक्ष्यात फुलांचे महत्त्व अनन्यसाधारण. पारंपरिक फुलांच्या तुलनेत शोभिवंत फुले, फुलझाडे व त्याच्याशी संबंधित वनस्पतींचे मार्केट सातत्याने वाढत आहे.
    देशांतर्गत बाजारात विशेषत: मोठ्या शहरात फुलांना मोठी मागणी असते. त्यातही निर्यातीचे मार्केट हाच फुलशेती उद्योगातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे.
    समाजात आधुनिकता आणि पाश्‍चिमात्य जीवनशैलीचा प्रभाव वाढला आहे. त्यातून  व्हॅलेंटाइन डे, विवाह समारंभ, वाढदिवस, वर्धापन दिन, मैत्रीदिन, मातृदिन, पितृदिन यांसह आपल्याकडील सर्व पारंपरिक व धार्मिक विधींतही फुलांची गरज नेहमीच भासते.
    केवळ शोभेसाठीच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे गंध, अत्तरे, औषधे, नैसर्गिक रंग यांच्या निर्मिती उद्योगातही फुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

फूल उत्पादनातील  प्रमुख राज्ये 
 महाराष्ट्र
 कर्नाटक
 आंध्र प्रदेश
 हरियाना
 तमिळनाडू
 राजस्थान
 प. बंगाल

 फुलशेतीची क्षमता
 फुलशेती हा वेगाने वाढणारा उद्योग असून, यात शंभर टक्के निर्यातीची क्षमता.
मागील काही वर्षांत फुलांच्या मागणीत स्थिर आणि वाढती मागणी.
फुलशेतीत आधुनिक संरक्षित शेती तंत्रज्ञानाचा वापर. कट फ्लॉवर्ससाठी जगाच्या मार्केटचे क्षितिज खुले. अनुकूल सरकारी धोरणांमुळे जागतिक दर्जाचे वाण उपलब्ध होणे शक्य.
इतर पिकांच्या तुलनेत कमी क्षेत्रात होणाऱ्या फुलशेतीत क्षमता अधिक.

या देशांत होते फुलांची निर्यात 
अमेरिका
नेदरलँड
जर्मनी
इंग्लंड
संयुक्त अरब
(स्रोत ः अपेडा)

 : info@sahyadrifarms.com.
(लेखक ‘सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत.) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT