अकोले (नगर) : टोमॅटोचे दर कोसळल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. या शेतकऱ्यांना सरकारने एकरी किमान ५० हजार रुपयांचे अनुदान तातडीने द्यावे, या मागणीसाठी किसान सभा व समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी येथील समशेरपूर बाजार समितीत आंदोलन केले.
टोमॅटो दराचा प्रश्न सुटावा, यासाठी नेपाळ, पाकिस्तान व बांगलादेश या शेजारील राष्ट्रांना निर्यात करताना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांत टोमॅटोची कोठे मागणी आहे, याचा शोध घेऊन, त्या राज्यांना टोमॅटो पुरविण्यासाठी पणन विभागाने तातडीने पावले उचलावीत. लॉकडाउनमुळे अनेक ठिकाणी टोमॅटो प्रक्रिया उद्योग बंद आहेत. विशेष प्रोत्साहन व सवलती देऊन ते सुरू करण्याबाबत सरकारने पावले टाकावीत. बाजार समित्यांत शीतगृहांची उभारणी करावी, तसेच टोमॅटोउत्पादकांना माल तारण कर्ज उपलब्ध करून द्यावे. सर्व निविष्ठा, खते, कीटकनाशके योग्य दरात मिळतील यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा, अशा मागण्या यावेळी टोमॅटोउत्पादकांनी केल्या.
राज्यात सध्या टोमॅटोउत्पादकांवर संकट आले असताना, राज्यातील सत्ताधारी व विरोधक भलत्याच विषयांवर एकमेकांवर चिखलफेक करीत आहेत, ही संतापजनक बाब आहे. राज्यकर्त्यांनी व विरोधकांनी या संकटाच्या काळात तरी एकमेकांवरील चिखलफेक थांबवावी व टोमॅटोउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याबद्दल गांभीर्याने पावले टाकावीत. असे न झाल्यास सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या दारात टोमॅटो ओतण्याचे आंदोलन हाती घ्यावे लागेल, असा इशारा आंदोलकांनी दिला. डॉ. अजित नवले, संदीप दराडे, महेश नवले, सुरेश नवले, एकनाथ मेंगाळ, तुळशीराम कातोरे, पांडुरंग कातोरे, अविनाश धुमाळ, शंकर चोखंडे, तुकाराम मेंगाळ, दगू एखंडे, निवृत्ती बेनके, सुनील दराडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.