Ahmednagar Wife Killed Husband: सासरी नांदत असताना गावातीलच तरुणासोबत प्रेमसंबंध ठेवले. पती अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने आणि पती मारहाण करत असल्याने त्याचाच काटा काढण्याचा प्रियकरासोबत मिळून कट रचला अन सुपारी दिली. प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करण्याची सुपारी देणारी पत्नी, प्रियकर व इतर पाच आरोपींना एलसीबीने बेड्या ठोकल्या. कोथूळ (ता. श्रीगोंदे) येथील योगेश शेळके (वय ३२) या तरुणाच्या खुनाची उकल झाली.
योगेशची पत्नी आरती शेळके (वय २६), तिचा प्रियकर रोहीत साहेबराव लाटे (वय २३, दोन्ही रा. कोथूळ, ता. श्रीगोंदा) व सुपारी घेणारे शोएब महमंद बादशाह (वय २२, मुंबई), विराज सतीश गाडे (वय १९, रा. पुणे), आयुष शंभु सिंह (वय १८), पृथ्वीराज अनिल साळवे (वय १९), अनिश सुरेंद्र धडे (वय १९ तिन्ही, रा. घोरपडे पेठ, पुणे) अशा सात आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या.
३० जानेवारीच्या पहाटे चार जणांनी घरात घुसून योगेशवर कोयत्याने वार करुन खून केला होता. तपासाला कोणतीही दिशा मिळत नसल्याने योगेश सोबत राहणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरती हिने चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्यांवरच वारंवार संशय घेतला. तपास सुरु असताना पोलिसांना एक धागा मिळाला. योगेशचा भाचा शुभम लगड हा कोथूळला घटनेच्या दिवशी थांबलेला होता.
शुभमच्या मोबाईलवरून आरती आणि आरोपी रोहीत लाटेचा फोन झाला होता. हा धागा पकडून पोलिसांनी रोहीत याला पुण्यातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच रोहीतने कबुली दिली. योगेश आरतीला मारहाण करीत असल्याने कट रचून पाच जणांना सुपारी दिली व खून केल्याचे पोलिसांना सांगितले. पुरावे हाती लागू नयेत म्हणून आरती ‘स्नॅपचॅट’वरुन रोहीतशी बोलत होती.
पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, बबन मखरे, बापुसाहेब फोलाणे, रवींद्र कर्डिले, फुरकान शेख, रवींद्र घुगांसे, मच्छिंद्र बर्डे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, देवेंद्र शेलार, आकाश काळे, भाग्यश्री भिटे या पथकाने ही कामगिरी पार पाडली.
मेहनत झाली फलद्रूप
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांच्या पथकाला ३५ हजारांचे बक्षिस जाहीर केले. राहुरीतील वकिल दाम्पत्याचा खून व कोथूळ येथील खून या दोन्ही घटनांचा छडा लावून कामाची चमक दाखविल्याने ओला यांनी एलसीबीचे कौतुक केले.
फोन कॉलने तपासाला दिशा
आरती हिने तपासात पोलिसांची वेळोवेळी दिशाभूल केली. कोणतेही पुरावे हाती लागू नयेत यासाठी थंड डोक्याने तिने कट रचला. मोबाईल कॉल, व्हॉटस्ॲपचा वापर केला नाही. ‘स्नॅपचॅट’वरचे चॅट डिलीट होते हे माहित असल्याने रोहीतसोबत बोलायची. मात्र, भाचा शुभम याच्या मोबाईलवर आलेल्या फोन कॉलने गुन्ह्याची उकल झाली. योगेशला संपविण्यासाठी दीड लाखांत सुपारी दिल्याची कबुली आरोपींनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.