अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत बापूसाहेब तांबे यांच्या गटावर रावसाहेब रोहकले गटाने मात करून बँकेतील सत्तेच्या चाव्या आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत. यामुळे आता बँकेतील सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही गटांवर सभासदांमधून टीकेची झोड उठविली जात आहे. सत्तेसाठी या दोन्ही मंडळांची रस्सीखेच सुरू आहे.
कोरोना संसर्गामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाला झाला आहे. बापूसाहेब तांबे गटाने या संधीचा फायदा उठवत आपल्या संचालकांना अध्यक्ष व उपाध्यक्ष होण्याची संधी दिली. त्यासाठी चार महिन्यांतून अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडप्रक्रिया राबविली.
एकूण पाच वेळा त्यांनी ही प्रक्रिया यशस्वी राबविली. मात्र, सहाव्या वेळी त्यांना अपयश आले. वारंवार अध्यक्ष बदलल्यामुळे तांबे गटातील संचालक वैतागले होते. त्यामुळे त्यांनी रोहकले गटाशी हातमिळवणी करीत अध्यक्षपदाच्या बाजूने आपल्या मताचे पारडे टाकून, रोहकले गटाच्या अविनाश निंभोरे यांना अध्यक्षपदाची संधी उपलब्ध करून दिली.
बँकेत अचानक झालेल्या या सत्ताबदलामुळे रोहकले गटात उत्साहाचे व बापूसाहेब गटात नाराजीचे वातावरण झाले. या दोन्ही गटांनी एकमेकांशी न भांडता सभासदहितासाठी बँकेत कारभार करणे आवश्यक होते. मात्र, सत्तेसाठी हे एकमेकांशी भांडत असून, सत्तेची खुर्ची एकमेकांकडेठेवण्यासाठी डाव-प्रतिडाव टाकत असल्याची टीका आता सभासदांमधून केली जात आहे.
बँकेच्या अध्यक्ष निवडीत झालेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. स्वच्छ चेहऱ्याच्या गप्पा मारणाऱ्यांनी गैरमार्गाचा अवलंब करून सत्ता मिळविली आहे. दोन दिवसांत आमसभा घेऊन पुढील निर्णय होईल.
- दत्ता पाटील कुलट, उपाध्यक्ष, राज्य संघ
बँकेत सुरू असलेल्या, वारंवार अध्यक्षबदलाच्या पद्धतीला लगाम लावण्यासाठी बँकेतील सत्ताधाऱ्यांच्या ताब्यातून सत्ता रोहकले गटाने ताब्यात घेतली आहे. आता निवड झालेले अध्यक्ष निवडणुकीपर्यंत कायम राहणार आहे.
- संजय शेळके, राज्य उपाध्यक्ष, शिक्षक परिषद
कोरोनामुळे संचालकांना मुदतवाढ मिळाली होती. त्यांनी जबाबदारीने वागणे अपेक्षित होते. मात्र, सत्तेच्या मलिद्यासाठी, नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्यांनीही आपली पातळी सोडली आहे. सत्ताधाऱ्यांना विरोध करणारेच पुन्हा सत्तेत आले. आता विरोध केलेले निर्णय ते फिरवतात का, यावर त्यांची विश्वासार्हता अवलंबून आहे.
- डॉ. संजय कळमकर, शिक्षक नेते
प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभासदांनी मोठ्या विश्वासाने एकाच गटाला संपूर्ण सत्ता दिली होती. मात्र, केवळ सत्तेच्या लालसेपोटी त्यामध्ये दोन गट निर्माण करून पुनश्च संपूर्ण सत्ता मिळविण्यासाठीच ते एकत्र आले आहेत.
- राजेंद्र निमसे, राज्य संघटक, अखिल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.