अहमदनगर : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागास लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयाने डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार आणि आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांना, आग लागल्यानंतर ती आटोक्यात कशी आणावी, याबाबत प्रात्यक्षिक दाखविले. महापालिका अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्या नेतृत्वाखालील कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिली.
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातील जुने परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृहात शनिवारी (ता. २०) सकाळी ११ वाजता प्रात्यक्षिक झाले. प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जमदाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली बांगर यांच्यासह डॉक्टर, परिचारिका, प्रशिक्षणार्थी परिचारिका, सफाई कामगार, आस्थापना विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
मिसाळ यांनी आगीचे वेगवेगळे प्रकार आणि ते आटोक्यात आणण्याच्या शास्त्रीय पद्धती सांगितल्या. कार्बनडायऑक्साईड सिलिंडर हे सर्व प्रकारची आग विझविण्यासाठी वापरतात. कोरडी रासायनिक पावडर ही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची आग विझविण्यासाठी वापरावी. वाळू ही इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅसची आग विझविण्यासाठी उपयुक्त ठरते. हायड्रो सिस्टीममध्ये इमारतीच्या चारही बाजूंनी पाइपद्वारे प्रत्येक मजल्यावर पाण्याचा पाइप काढला जातो. आग कोणत्या प्रकारची आहे यावरून, आग विझविण्यासाठी योग्य त्या साधनांचा वापर करणे आवश्यक असते.
दुर्घटनेतील व्यक्तींवर प्राथमिक उपचार कोणते करावेत, त्यांना बाहेर कोणत्या पद्धतीने काढावे, याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. अग्निशामक दलाचे बाळासाहेब घाटविसावे, भरत पडगे, बाळासाहेब वाघ, नानासाहेब सोलट, शाकीर रंगारी, मच्छिंद्र धोत्रे यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले.
भीती, उत्कंठा, कुतूहल आणि यशाचे हास्य
जिल्हा शासकीय रुग्णालयात आगीचे प्रात्यक्षिक दाखविण्याकरिता जुन्या परिचारिका प्रशिक्षण संस्थेसमोरील मोकळ्या जागेत लहान स्वरूपाची आग लावण्यात आली. ती आटोक्यात आणण्याचे धाडस दाखवावे लागते. प्रात्यक्षिकात सहभागी झालेल्यांच्या चेहऱ्यावर यावेळी थोडा तणाव होता. प्रात्यक्षिक पूर्ण झाल्यावर तो हास्यात बदलला, कारण आगीसोबत खेळून त्यांनी तिच्यावर मात केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.